Saturday, July 18, 2026

दिलमें जुनून चाहिये...

दिलमें जुनून चाहिये...

स्पंदन-अश्विनी भोईर

झटपट यश कसं मिळेल, यशाचा मूलमंत्र असे सांगणारी अनेक पुस्तकं आपल्याला बाजारात विक्रीला मिळतात. वरवर पाहता या पुस्तकांच्या शीर्षकांच्या धाटणीचच पण यश कशाला म्हणावं, याचा मूलभूत विचार करायला लावणारं लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खेर लिखित ‘यश म्हणजे काय?’ या पुस्तक मालिकेतील मराठी व हिंदी भाषेतील तिसरा खंड ग्रंथालीने प्रकाशित केला.शालेय,महविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचावं असं हे पुस्तक आहे. या पुस्तकात यश प्राप्त करण्यासाठी थेट हे ‘फंडे’ वापरा अशी माहिती नाही आहे, तर लेखिकेने विविध क्षेत्रात यशस्वीपणे काम करणाऱ्या मान्यवरांशी संवाद साधून त्यांच्या जीवनानुभवाच्या अंगाने यश म्हणजे काय, याची साधक-बाधक चर्चा केली आहे. ती चर्चा विद्यार्थ्यांना भौतिक यशाच्या पलीकडे जाऊन व्यापक दृष्टिकोन देते. याविषयी स्वतः लेखिका शिल्पा खेर म्हणतात,‘यश म्हणजे काय या पुस्तकातील मुलाखती यश आणि आंतरिक समाधान, परिपूर्णत्व, खऱ्या ध्येयाची जाणीव याविषयी विचार करायला लावतात.’

‘यश म्हणजे काय?’ या पुस्तकात लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर,न्यायमूर्ती मृदुला भाटकर,खासदार सुमित्रा बाल्मिक, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अाश्विनी भिडे, शास्त्रीय गायिका पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे, सुप्रसिद्ध डॉ. पद्मश्री तात्याराव लहाने, शास्त्रज्ञ पद्मश्री शरद काळे, एमकेसीएलचे विवेक सावंत, विडो वॉर असोसिएशन्च्या अध्यक्ष दमयंती तांबे, हरीश कापडिया, पद्मश्री रवींद्र कोल्हे अशा एकूण अकरा मान्यवरांच्या मुलाखती समाविष्ट आहेत. वाचकांना यश म्हणजे काय या प्रश्नाचा मूलभूत विचार करायला लावणारी चर्चा या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते. जसे लेफ्टनंट जनरल डॉ. दत्तात्रय शेकटकर म्हणतात, की प्रगती पुस्तकावरील मार्कांपेक्षा आपल्याकडील ज्ञानाचा योग्यप्रकारे व्यवहारात उपयोग करणे आवश्यक आहे. ज्ञानाचा जर व्यवहारात उपयोग करता आला नाही, तर त्या व्यक्तीकडील ज्ञान हे केवळ कागदावरील माहिती ठरते.

पद्मश्री प्राप्त शास्त्रज्ञ डॉ. शरद काळे सांगतात,‘माझ्याकडे गाडी नाही. मी बसने कुठेही जाऊ शकतो. माणसाला जर खरं समाधान हवं असेल तर त्याने शेअरिंग शिकलं पाहिजे. मला चार शर्ट, दोन पॅन्ट आणि एक चपलांचा जोड, एवढंच पुरतं. आपल्या गरजा जर आपण वाढवून ठेवल्या तर आपण शेअरिंग करू शकत नाही. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अाश्विनी भिडे म्हणतात की तुम्ही आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला कसे स्वीकारता, प्रत्येक घटनेला कसे स्वीकारता, नकारात्मक गोष्टींवर तुम्ही कशाप्रकारे मात करता या सर्व पैलूंमुळे आयुष्याला अर्थ प्राप्त होतो. यश – अपयशाच्या मोजमापाने आयुष्य अर्थपूर्ण होत नाही. कित्येकदा जे हवे ते मिळाल्यानंतर सुद्धा पुढे काय, हा प्रश्न अनेकांना पडतो. यामुळे केवळ यशाच्या मागे धावण्यापेक्षा आयुष्य अर्थपूर्ण करण्यावर भर द्या.‘यश म्हणजे काय या पुस्तकातील प्रत्येक मुलाखत वाचकांना जगण्याचा सकारत्मक दृष्टिकोन देते आणि यशाची व्यापक कल्पना डोळ्यांसमोर ठेवते. आजच्या काळात पैसे कमावणे, त्यातून सुख आनंद उपभोगणे हे चुकीचे नाही. पण पैसा, भौतिक सुख याबरोबरच जेव्हा माणसाचे आयुष्य मूल्याधिष्ठित, विवेकी, नैतिकतेला धरून असते तेव्हाच माणसाला यशाचा खरा आनंद गवसतो, हा दृष्टिकोन हे पुस्तक आपल्याला देते.

भरपूर पैसा आहे,सगळी सुखं पायाशी आहेत पण घरात सुख – समाधान, शांती नाही, अशी अनेक कुटुंबं आपण आज पाहतो. पैशांची चणचण नाही पण माणसांची चणचण आहे, ही परिस्थिती आपल्या आजूबाजूला दिसत आहे. नेमकं चुकत कुठे, हे कळत नाही. अशा विस्कटलेल्या घरांना आणि मनांना हे पुस्तक नक्कीच अंतर्मुख करून आपल्यात असलेला आनंद शोधण्याची दृष्टी देईल. यश म्हणजे काय हे पुस्तक जेवढे प्रेरणादायी आहे, तेवढाच या पुस्तकाचा मी अनुभवलेला प्रकाशन सोहळा प्रेरणादायी होता. कार्यक्रमात मान्यवरांनी मांडलेले विचारकण प्रेरणा देणारे होते. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात यशाचे टाईमटेबल या विषयवार बोलताना शास्त्रज्ञ डॉ. ज्येष्ठराज जोशी खूप छान म्हणाले, की यश प्राप्त करण्यासाठी मनाची एकाग्रता, संयम, चिकाटी आणि नम्रता हे गुण आवश्यक आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनाची कटकट करायचं थांबवा, मन शांत ठेवा, तर डॉ. शरद काळे म्हणाले की ज्ञानासोबत शहाणपण हवं, यशासोबत जबाबदारीचं भान हवं आणि राक्षसी महत्त्वाकांक्षा असता कामा नये तर महत्त्वाकांक्षेसोबत संवेदनशीलता हवी.

मनाचा ठाव घेणाऱ्या भाषणांमध्ये जबलपूरमधील गरीब शेतकरी कुटुंबात लहानाच्या मोठ्या होऊन कष्टाने, मेहनतीने खासदारकीपर्यंत प्रवास करणाऱ्या खासदार सुमित्रा बाल्किम यांचं यश प्राप्त करण्यासाठी ‘दिलमें जुनून चाहिये’ हे वाक्य मनावर कोरलं गेलं. या कार्यक्रमात न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी मुंबईच्या आयुक्त अाश्विनी भिडे यांची अतिशय सुंदर मुलाखत घेतली. या मुलाखतीत आजच्या काळाला अनुसरून जीवनात पैशांचे महत्त्व काय हा मार्मिक प्रश्न त्यांनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना अाश्विनी भिडे म्हणाल्या की ‘easy money is not real money’ चुकीच्या मार्गाने पैसे कमवू नका, कष्ट करून स्वतःच्या क्षमतेवर भरपूर पैसा मिळवा आणि मिळालेल्या पैशांचे योग्यप्रकारे नियोजन करा. रोजच्या धकाधकीच्या जीवनात काही पुस्तकं, काही कार्यक्रम मनाला ताजेतवाने करून जातात. त्यापैकीच एक शिल्पा खेर लिखित ‘यश म्हणजे काय?’ हे पुस्तक आणि या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ..’ दिल में जुनून ’ जागवणारा.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा