Sunday, July 12, 2026

बालपणाचा बदलता चेहरा

बालपणाचा बदलता चेहरा

मागोवा-वैष्णवी भोगले

 

एखाद्या समाजाचे भविष्य काय असेल, याचा अंदाज त्या समाजातील मुलांच्या बालपणाकडे पाहून येतो. कारण बालपण ही केवळ आयुष्यातील एक अवस्था नसते; ती व्यक्तिमत्त्व घडविण्याची, मूल्ये रुजविण्याची आणि संस्कारांची पेरणी करण्याची वेळ असते. बालपण बदलत आहे, हे वास्तव आहे; पण हा बदल विकासाच्या दिशेने आहे की संवेदनांच्या ऱ्हासाकडे याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय कुटुंबव्यवस्थेत मोठे बदल झाले आहेत. आई-वडील दोघेही नोकरी किंवा व्यवसायात व्यस्त आहेत. संयुक्त कुटुंबांची जागा विभक्त कुटुंबांनी घेतली आहे. मुलांसोबत वेळ घालवणारी आजी-आजोबांची पिढी अनेक घरांत उरलेली नाही. परिणामी, मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी मोबाईल हा सर्वात सहज उपलब्ध पर्याय बनला आहे. डे-केअर, प्ले-स्कूल आणि अॅक्टिव्हिटी क्लासेस यांची चलती वाढत आहे. ही या बदलत्या जीवनशैलीचीच परिणती आहे. या सगळ्यात मुलांच्या हातात आलेला स्मार्टफोन हा केवळ एक साधन राहिलेला नाही; तो त्यांच्या बालविश्वाचा केंद्रबिंदू बनत चालला आहे.

आज अनेक घरांमध्ये सकाळचा दिवस एकाच दृश्याने सुरू होतो. आई-वडील दोघेही कामावर जाण्याच्या तयारीत असतात. मुलाला शाळेत सोडायचे, स्वतः ऑफिसला वेळेत पोहोचणे, वाहतुकीचा ताणतणाव, वेळेची धावपळ या सगळ्यात मुलांना काही वेळ शांत बसवायचे असेल, तर सर्वात सोपा उपाय म्हणजे मोबाईल. मुलगा किंवा मुलगी क्षणात स्क्रीनमध्ये रमतात आणि घरात शांतता पसरते. ही शांतता मात्र वरवरची आहे. कारण त्या शांततेत हळूहळू कोवळ्या पिढीचा संवाद हरवत आहे.

आज दोन-तीन वर्षांचे मूल स्मार्टफोन इतक्या सहजपणे वापरते, की अनेकदा मोठ्यांनाही आश्चर्य वाटते. कोणते कार्टून कुठे आहे, कोणता गेम कसा सुरू करायचा, जाहिरात कशी बंद करायची, पुढचा व्हिडीओ कसा लावायचा, हे त्यांना कोण शिकवत नाही; ते स्वतः शिकतात. आजची मुले अत्यंत बुद्धिमान, जिज्ञासू आणि तंत्रज्ञानाशी मैत्री करणारी आहेत. अलीकडे आठ वर्षांच्या एका मुलाने तब्बल १०६ भाषा शिकल्याची बातमी चर्चेत होती. ही घटना मुलांच्या अफाट ग्रहणक्षमतेचे उदाहरण आहे. पण याच ग्रहणक्षमतेमुळे दुसरे वास्तवही समोर येत आहे. विविध स्टोऱ्या स्क्रोल करताना समोरची भावणारी भाषा म्हणजे हॅलो गाईज..., लाईक करा..., सबस्क्राईब करा... ही भाषा मुले सहज आत्मसात करतात. ही केवळ भाषेची नक्कल नाही; तर त्यांच्या बालविश्वावर डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव आहे. मुले यूट्यूबची भाषा का शिकत आहेत, याचे उत्तर शोधताना केवळ मुलांकडे किंवा पालकांकडे बोट दाखवून चालणार नाही. हा बदल सामाजिक आहे. आई-वडील दोघेही नोकरी करत असतील, तर त्यांना दोष देता येणार नाही. आर्थिक गरजा, वाढती महागाई आणि बदललेली जीवनशैली यामुळे अनेक कुटुंबांसाठी दोघांनीही काम करणे अपरिहार्य झाले आहे. पूर्वी संयुक्त कुटुंबात आजी-आजोबा, काका-काकू, मावशी, आत्या यांच्यात मुलांचे बालपण फुलायचे. आज विभक्त कुटुंबांमध्ये तो आधार कमी झाला आहे. त्यामुळे डे-केअर, प्ले-स्कूल आणि मुलांना काही तास सांभाळणारे वर्ग वाढत आहेत. ही काळाची गरज आहे; परंतु त्या रिकाम्या वेळेत मुलांचा सर्वात जवळचा साथीदार बनतो तो मोबाईल. ही वस्तुस्थितीही नाकारता येत नाही. प्रश्न मोबाईलचा नाही; प्रश्न त्याने घेतलेल्या जागेचा आहे. पूर्वी मुलांना रडणे थांबवण्यासाठी आई अंगाईगीत म्हणायची. आज मोबाईलवर कार्टून सुरू केले जाते. पूर्वी जेवताना आजी गोष्ट सांगायची; आज जेवण भरवताना यूट्यूबवरील व्हिडीओ दाखवला जातो. पूर्वी झोपताना रामायण, महाभारत, पंचतंत्र, इसापनीती किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकवल्या जायच्या; आता झोपेपर्यंत स्क्रीन समोर असते. या बदलाकडे भावनिक नजरेने नव्हे, तर सामाजिक वास्तव म्हणून पाहिले पाहिजे.

भाषा हा मुलांच्या विकासाचा पाया असतो. मूल पहिली भाषा केवळ शब्द म्हणून शिकत नाही; ती भावनांसह शिकते. ‘आई’ हा शब्द उच्चारताना त्यात सुरक्षिततेची भावना असते. ‘आजी’ म्हणताना मायेचा स्पर्श असतो. पण लाईक करा किंवा सबस्क्राईब करा हे शब्द कोणती भावना निर्माण करतात? ते संवाद शिकवतात की फक्त अनुकरण? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आजची मुले डिजिटल जगात वाढत आहेत. त्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, कोडिंग आणि जागतिक माहिती यांची ओळख असणे आवश्यकच आहे. भविष्यात या कौशल्यांशिवाय प्रगती करणे कठीण होईल. त्यामुळे तंत्रज्ञानापासून मुलांना पूर्णपणे दूर ठेवणे हा उपाय असू शकत नाही. उलट त्यांना तंत्रज्ञानाचा सुजाण वापर शिकवणे ही काळाची गरज आहे. पण त्याचवेळी त्यांना संवाद, सहानुभूती, संयम, वाचन, कल्पनाशक्ती, मैदानी खेळ आणि कुटुंबातील नाती यांचाही अनुभव मिळाला पाहिजे.

आजच्या मुलांची आवड बदलली आहे. त्यांना वेगवान दृश्ये, सतत बदलणारे व्हिडीओ, गेम्स आणि तत्काळ मनोरंजन आवडते. पण हे वातावरण त्यांच्या एकाग्रतेवर, संयमावर आणि प्रत्यक्ष संवादाच्या क्षमतेवर परिणाम करत नाही ना, याचाही अभ्यास आवश्यक आहे. अनेक मानसशास्त्रज्ञांचे मत आहे, की मुलांच्या आयुष्यातील पहिली काही वर्षे प्रत्यक्ष संवादासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. स्क्रीन संवादाची जागा घेऊ लागली, तर भाषिक आणि भावनिक विकासावर परिणाम होऊ शकतो. या सगळ्यात पालक कुठे मागे पडत आहेत? कदाचित पालक मुलांसाठी सर्व काही देण्याच्या प्रयत्नात त्यांना स्वतःचा वेळ देऊ शकत नाहीत. म्हणूनच पालकांनी स्वतःही डिजिटल शिस्त पाळणे आवश्यक आहे. मुलांसोबत असताना मोबाईल बाजूला ठेवणे, दररोज एकत्र जेवणे, गोष्टी सांगणे, पुस्तक वाचणे, मैदानी खेळांना प्रोत्साहन देणे आणि आठवड्यातील काही वेळ ‘स्क्रीन-फ्री’ ठेवणे, हे छोटे बदल मोठा फरक घडवू शकतात. या प्रश्नाचे उत्तर टोकाच्या भूमिकेत नाही. तंत्रज्ञानाला शत्रू मानण्यात अर्थ नाही आणि त्याला मुलांचे संगोपन सोपवण्यातही शहाणपणा नाही. दोन्ही टोकं टाळून समतोल साधण्याची गरज आहे. आजची मुले उद्याच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात जगतील; पण त्यांना माणसांसोबतही जगायचे आहे. त्यांनी शंभर भाषा शिकल्या तरी चालतील; पण आईच्या डोळ्यांतील माया, वडिलांच्या आवाजातील काळजी, आजीच्या गोष्टीतील संस्कार आणि समाजातील माणुसकीची भाषा समजली नाही, तर त्या शिक्षणाचे मूल्य अपुरे राहील. कदाचित आजच्या बदलत्या बालपणासमोर उभा असलेला हाच सर्वात मोठा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तरही. त्यामुळे दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांकडे डोळेझाक करून चालणार नाही. वास्तव कधी ना कधी स्वीकारावचं लागतं.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा