मनस्विनी-पूर्णिमा शिंदे
खरंच हरवले ना! पत्र!! कारण संवाद हरवला आहे. मोबाईलच्या या नेट युगामध्ये नात्यांचं जाळंच राहिलं नाही. राहीलं पण नेटच. पोस्टमनला सरकारी चेहरा म्हणून मोठी ओळख होती. टपाल येणं किंवा टपाल खातं. पोस्टाचं खातं.फार पूर्वी पोस्टाची स्थापना झाली. कोणतीही माहिती पोहोचवण्याचं पार्सल किंवा पुस्तकं किंवा वस्तू पोहोचवण्याचं, निरोप पोहोचवण्याचा, संदेश पोहोचवण्याचा ते एक मोठं साधन होतं. पूर्वीपासून लोकप्रिय असलेलं, अत्यंत उपयुक्त आवश्यक आणि मूलभूत गरजांमधील यादीमध्ये मनिऑर्डर ही आली. बऱ्याच वेळेला माणूस जिथे पोहोचू शकत नाही, तिथपर्यंत पोस्टाने पोहोचता येतं. निरोप पोहोचवता येतो. आपली वस्तू पोहोचवता येते आणि हृदयातील भावना सुद्धा. तसं पाहिलं तर १ ऑक्टोबर १८५४ मध्ये आधुनिक भारतीय टपाल विभागाची अधिकृत स्थापना झाली. १९४७ नंतर इंडिया पोस्ट नावाने ही सेवा सुरू झाली.
पत्रव्यवहार, बचत खाती, मनिऑर्डर, विमा, पार्सल, पेन्शन वितरण, संदेश असे विस्तार झाले. पत्र, पार्सल, मनिऑर्डर इत्यादी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणारी सरकारी यंत्रणा म्हणजे डाक. पोस्ट ऑफिस, टपाल यंत्रणा. पूर्वी पोस्ट म्हणजे घोड्यांनी संदेश देण्याचे ठाणे किंवा चौकी घोडे बदलण्यासाठी ठरावीक अंतरावर पोस्ट असत. फार पूर्वीच ते घोडे गेले आणि गाड्या आल्या. तिथून हा शब्द वापरला गेला. दोन मुख्य अर्थ पोस्ट म्हणजे कार्य, जबाबदारी पद, पोस्ट मॅनेजर म्हणजे व्यवस्थापक पदावरील पोस्टमास्टर.
पूर्वी एखाद्या गावात पोस्टमन सायकलवर यायचा. आपल्या घरातील माणसं परगावी, बाहेरगावी नोकरीधंदा कामानिमित्ताने कुठे स्थायिक झालेली असतील, तर गावच्या माणसांना आपल्या संदेश माहिती किंवा आपली खुशाली कळविण्याचे एक सुंदर माध्यम म्हणजे पोस्ट. आता पोस्ट म्हटलं की मोबाईलची पोस्ट दिसते पण ते नाही बरं का. आंतरदेशीय कार्ड, पोस्ट कार्ड, लिफाफा त्यामध्ये चिठ्ठी असायची. इतक्या वर्षांनी मागे वळून पाहताना आमच्या बालपणीसुद्धा आम्ही पत्र लिहिली आहेत. पण आता ती पत्र हरवली आहेत. कुठे बरं गेली असतील ती पत्रं...
बदलत्या तांत्रिक आधुनिक युगामध्ये लोप पावत चाललेली ही पत्रं. आमच्या काळात एक गाणं पण होतं आईचं पत्र हरवलं ते मला सापडलं... आता पत्रच काय सगळ्यांच्या भावना हरवल्या आहेत. गुगलवर सर्च मारून शोधत असतात सगळी. पण भावनेचा ओलावा मिळतो का तिथे? नाही ना? धकाधकीच्या युगामध्ये माणसं इतकी व्यस्त झाली आहेत, की आता त्यांना पत्र लिहिणे, पोस्टामध्ये टाकणं फार मोठं काम वाटतं. काही अगंतुक कोसळल्यासारखं वाटतं! आमचे रिझल्ट सुद्धा पोस्टाने यायचे. पप्पांचा पगार झाला की, आम्हाला मनिऑर्डर सुद्धा! पोस्टमनचं आमचं नातं घरातल्या माणसासारखं. काका, मामा म्हणून त्याला ग्लासभर पाणी आणि जेवायला सुद्धा द्यायचं! अगदी घरातल्या माणसासारखं. पण आता फक्त पोस्टमन दिवाळी इतकाच दिसतो. याचे कारण आहे कोणीही आता एकमेकांना पत्र पाठवत नाहीत. बरेचसे व्यवहार मोबाईलद्वारे, ऑनलाईन केले जातात. ई-मेल सुद्धा ऑनलाईन संदेश देतात. ऑनलाईन मेसेज, डीएम, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण नेमकं कुठे चाललो आहोत? खूप विक्रम करून आधुनिकतेमध्ये की रसातळाला? तुमच्या मनाला एक प्रश्न विचारा? आपण जे आहोत ते यंत्र होतं. महायंत्रामध्ये ना माणुसकी, जिव्हाळा न प्रेम, ना आपुलकी राहिली आहे! उरला आहे तो फक्त व्यवहार.... बेगडी! मृत मेलेल्या भावनांसारखा.
परवा मी एका पोस्टमध्ये माझी पुस्तके पोस्ट करायला गेली होती. अजिबात गर्दी नव्हती. पोस्टाचे अधिकारी मला नवीन योजनेची माहिती देत होते. गुंतवणुकीची योजना होती. दरमहा इतकी रक्कम गुंतवली तर इतक्या इतक्या व्याजाने, आपल्याला पाच वर्षांनी इतके मिळतात. वगैरे वगैरे... त्यांचे बोलणे पूर्ण झाल्यानंतर मी म्हटलं पूर्वीसारखे पोस्टमन सुद्धा दिसत नाहीत. अहो आहेत ना काम सुरूच आहे. पूर्वीसारखं नाही. पूर्वी काळच वेगळा होता. माणसे वेगळी होती. परिस्थिती वेगळी होती. म्हटल्यानंतर माझ्या मनात सहज प्रश्न उत्पन्न झाला, आताची माणसं वेगळी आहेत म्हणजे माणसं नाहीत का? आहेत पण त्यांच्यातही यंत्रासारखी अत्याधुनिक पणाची कृत्रिमता आलेली आहे. त्यावेळी गरजा कमी होत्या. आता गरजा, चैनी वाढल्या आहेत. जीवनात दिखावा, सोंगंढोंगं, जगण्याचे प्रश्न वाढले आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगळेपण, डामडौल, चैन, मस्ती, फॅशन, दिखावा ढोंगीपणा, बनावटपणा वाढत गेला. याचे उत्तर आहे माणसाचा दृष्टिकोन बदलला. म्हणून माणसाच्या भावना बदलल्या. विचार बदलला. आजवर माणूस माणसाशी प्रेमाने वागत होता. ती जागा आता कोर्टाच्या नोटिसा, कर्जाच्या नोटिसा, पोलीस स्टेशनचे पत्र, चेकबुक, पार्सल, शासकीय, निमशासकीय दंड, अटी-शर्ती, फॉर्म यांचे निर्देश वाढले आहेत आणि जिव्हाळ्याचे, आपुलकीचे, प्रेमाचे संदेश लोप पावले आहेत.
आज कोणीही गावी मोबाईलवर लगेच फोन लावून दोन शब्द विचारपूस करायला फोन करतात. बोलता बोलता भांडू लागलेत. अंतर किती असो. वय किती असो. कारण असो नसो. चक्क मोबाईलवर भांडण, वाटण्या, वाटाघाटी, झगडे, तंटे असे ताणतणाव वाढले आहेत. भावना विस्कटल्या. जवळ जाऊन प्रेमाने चार गोष्टी समजावून सांगण्याचे दिवस गेले आता किंवा आज्ञाधारकपणे नम्रपत्रात शांतपणे नमूद करण्याचे दिवस गेले आता... आता उरलाय तो उन्माद, उच्छाद. आक्रस्थळेपणा, आक्रमक, दमदाटी, दादागिरी, बडेजाव आणि दिखावा... हेच कारण होतं. तेथील जुने पोस्टमन सांगत होते की, बाई आता पहिल्यासारखे काहीच राहिले नाही. अगदी निसर्ग बदलला, सृष्टी बदलली आणि माणसं बदलली. म्हणूनच निसर्ग बदलला! नाहीतर मार्चमध्ये कधी पाऊस ऐकला होता का? आणि जूनमध्ये नाही? मीही विचारातच पडले! किती ना काळ बदलला. ५०, २५ वर्षांपूर्वीच्या गोष्टी काही उरल्यास नाहीत. त्याची जागा आता भलतीच कोणी घेत चाललाय. एक काळ असा होता की, पंधरा माणसांचे कुटुंब एक पत्र आलं की एकत्र वाचणारा आणि बाकी सारे कानात प्राण आणून ऐकणारे! आता सगळे साहेब झाले. सगळे बदललेत. म्हणून असं वाटतं आईचं पत्र हरवलं... तुम्हाला सापडलं तर मला नक्की सांगा! त्या पत्रातील सुंदर भाषा, स्वगत, प्रेमळ, लाडीक, हट्ट, काळजी, अर्जव, करुणा, आज्ञा, स्नेह आणि जिव्हाळा... बरं का मंडळी!






