Saturday, July 11, 2026

फक्त पुस्तकी पंडित बनू नका

फक्त पुस्तकी पंडित बनू नका

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर

 

ज्ञान हे माणसाच्या जीवनाला दिशा देणारे सामर्थ्य आहे; परंतु केवळ पुस्तके वाचून मिळवलेले ज्ञान पुरेसे नसते. त्या ज्ञानाचा योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य पद्धतीने उपयोग करता आला, तरच ते ज्ञान अर्थपूर्ण ठरते. म्हणूनच “फक्त पुस्तकी पंडित बनू नका” हा संदेश प्रत्येक विद्यार्थ्याने आणि प्रत्येक व्यक्तीने लक्षात ठेवला पाहिजे. पुस्तके आपल्याला माहिती देतात, विचार करायला शिकवतात आणि जीवन समृद्ध करतात. मात्र जीवनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर पुस्तकात सापडतेच असे नाही. अनेक गोष्टी अनुभवातून, निरीक्षणातून आणि प्रत्यक्ष कृतीतून शिकाव्या लागतात. त्यामुळे पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारज्ञानही तितकेच महत्त्वाचे आहे.आज अनेक विद्यार्थी परीक्षेत चांगले गुण मिळवतात; परंतु प्रत्यक्ष जीवनातील साध्या-साध्या समस्या सोडवताना अडचणीत पडतात. याचे कारण म्हणजे त्यांनी पाठांतरावर भर दिलेला असतो; पण विचारशक्ती, निर्णयक्षमता, संवादकौशल्य, सहकार्याची भावना आणि आत्मविश्वास यांचा पुरेसा विकास झालेला नसतो. खरे शिक्षण म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होय.महात्मा गांधी म्हणायचे, “शिक्षण म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याचा सर्वांगीण विकास.” तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश दिला. या विचारांचा अर्थ केवळ पुस्तके वाचणे एवढाच नसून, शिकलेल्या ज्ञानाचा समाजहितासाठी उपयोग करणे हा आहे.

विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच विज्ञान प्रयोग, क्रीडा, वाचन, वक्तृत्व, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा. अशा अनुभवांमुळे आत्मविश्वास वाढतो, नेतृत्वगुण विकसित होतात आणि जीवनाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन तयार होतो.आजच्या स्पर्धेच्या युगात माहिती सहज उपलब्ध होते; पण त्या माहितीचे ज्ञानात आणि ज्ञानाचे कृतीत रूपांतर करणारेच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतात. पुस्तकी पंडित होण्यापेक्षा जीवन पंडित होणे अधिक महत्त्वाचे आहे.चला, आपण केवळ गुणांसाठी नव्हे, तर गुणांसोबत संस्कार, कौशल्य, चारित्र्य आणि सामाजिक जबाबदारी यांचाही स्वीकार करूया. पुस्तकी ज्ञानाला अनुभवाची जोड देऊन जीवन समृद्ध करूया. कारण ज्ञानाला कृतीची जोड मिळाली, तरच ते समाजासाठी उपयुक्त ठरते आणि व्यक्तीच्या यशाचा खरा पाया बनते. विद्या उदंड शिकला। प्रसंगमान चुकतची गेला।। आता तया विद्येला। कोण पुसे।।

इंग्रजी भाषेत एक म्हण आहे “Knowledge comes, but wisdom lingers.” याचा अर्थ माणसाला ज्ञान येते, पण शहाणपण येत नाही. जर शिक्षणाचा व्यवहारात वापर करता येत नसेल तर काय उपयोग? अनेकदा एखादा अडाणी शेतकरी मोठ्या आनंदाने संसार करतो. याउलट उच्च विद्याविभूषित माणसे आत्महत्येसारखा किंवा टोकाचा निर्णय घेताना पाहायला मिळतात. समृद्धीपेक्षा शहाणपण जास्त महत्त्वाचे आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यवहारज्ञान किंवा चातुर्य जास्त महत्त्वाचे आहे. फारसे शिक्षण नसलेली अनेक माणसे जीवनामध्ये यशस्वी झालेली पाहायला मिळतात. एकदा एक विद्वान मनुष्य नावेत बसून पैलतीरावर चालला होता. त्याने त्या नावाड्याला विचारले, “तुला खगोलशास्त्राचे ज्ञान आहे की नाही?” त्या नावाड्याने खगोलशास्त्र हा शब्द पहिल्यांदाच ऐकला. त्याच्या अज्ञानाची कीव करीत ते विद्वान गृहस्थ म्हणाले, “तुला साधे खगोलशास्त्र माहिती नाही. तुझे २५ टक्के आयुष्य वाया गेले.”

थोड्याच वेळाने त्या पंडिताने नावाड्याला विचारले, “तुला गणित तरी येतं की नाही?” त्या नावाड्याला गणितदेखील येत नाही हे पाहून तो विद्वान पंडित म्हणाला, “छे! छे! तुझे आणखी २५ टक्के आयुष्य वाया गेले.”त्या विद्वान पंडिताला त्याच्या ज्ञानाचा अहंकार गप्प बसू देत नव्हता. त्याने थोड्या वेळाने त्या नावाड्याला पुन्हा विचारले, “तुला ज्योतिषशास्त्र तरी माहिती आहे की नाही?” तो नावाडी म्हणाला, “कसलं ज्योतिष आणि कसले भविष्य! मी माझ्या आजोबांचा नावाडी आहे.” ते ऐकून तो विद्वान गृहस्थ म्हणाले, “आता तुला काय म्हणावे? आतापर्यंत तुझे ७५ टक्के आयुष्य वाया गेले आहे.”थोड्याच वेळाने नदीला एकदम पूर आला. नौका खूप हलू लागली. हळूहळू नौकेत पाणी शिरू लागले. त्या नावाड्याने त्या विद्वान गृहस्थाला विचारले, “महाराज, तुम्हाला पोहता येते का?”तेव्हा ते पुस्तकी पंडित नाही म्हणाले. त्यावर तो नावाडी म्हणाला, “महाराज, मला ज्योतिषशास्त्र कळत नाही. पण देवाच्या दयेने भविष्य दिसते आणि थोड्याच वेळात तुम्हीही या नौकेसह या नदीत बुडून मरणार असे दिसते.”माणसे आयुष्यभर नुसती माहिती गोळा करीत राहतात; पण त्या माहितीचा व्यवहारात जसा उपयोग करायला पाहिजे तसा करत नाहीत. अशा माणसाला समर्थ ‘पढतमूर्ख’ म्हणतात. ज्या शिक्षणाचा व्यवहारात उपयोग नाही, ते शिक्षण एक प्रकारचे ओझे असते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा