Wednesday, July 1, 2026

Nashik Crime : फेसबुकवर मैत्री झाली , WhatsAppवर जवळीक वाढली; 'महिला CEO'ने आधी विश्वास जिंकला, मग सेवानिवृत्तासह तिघांना....

Nashik Crime : फेसबुकवर मैत्री झाली , WhatsAppवर जवळीक वाढली; 'महिला CEO'ने आधी विश्वास जिंकला, मग सेवानिवृत्तासह तिघांना....

Nashik Crime : सेवानिवृत्तीनंतर निवांत आयुष्य जगत असताना सोशल मीडियावर आलेली एक फ्रेंडशिप रिक्वेस्ट आयुष्यभराची कमाई गमावण्याचे कारण ठरली. फेसबुकवर झालेली ओळख, व्हॉट्सॲपवर वाढलेली मैत्री आणि त्यानंतर 'नंबर ट्रेडिंग'मधून भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष... या सगळ्या जाळ्यात अडकलेल्या नाशिकमधील एका सेवानिवृत्त व्यक्तीसह तिघांची तब्बल ३७ लाख ९१ हजार ३६४ रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

'सायबर हनी ट्रॅप'चा बळी

सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची फसवणूक करण्यासाठी दिवसेंदिवस नवनवीन आयडिया वापरल्या जात आहेत. कधी गुंतवणुकीवर मोठा परतावा, तर कधी मैत्री आणि प्रेमाच्या नावाखाली नागरिकांना जाळ्यात ओढले जाते. अशाच एका 'सायबर हनी ट्रॅप'चा बळी नाशिकमधील सेवानिवृत्त व्यक्ती ठरली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड परिसरातील गोरेवाडी येथे राहणाऱ्या सेवानिवृत्त व्यक्तीला जुलै २०२५ मध्ये फेसबुकवर 'अंजली अग्रवाल' नावाच्या महिलेची फ्रेंडशिप रिक्वेस्ट आली.

हाय-हॅलो नंतर जवळीक वाढली

प्रोफाइलमध्ये ती पश्चिम बंगालमधील एका नामांकित कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) असल्याचे नमूद करण्यात आले होते. सुरुवातीला केवळ हाय-हॅलो, त्यानंतर कौटुंबिक गप्पा, दैनंदिन आयुष्याविषयी चर्चा आणि हळूहळू दोघांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण झाले. काही दिवसांनी हा संवाद फेसबुकवरून थेट व्हॉट्सॲपवर पोहोचला. मैत्री अधिक घट्ट झाल्यानंतर संबंधित महिलेने स्वतः 'नंबर ट्रेडिंग' या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात पैसे कमावत असल्याचा दावा केला. त्यासाठी तिने कथित नफ्याचे अनेक स्क्रीनशॉटही पाठवले. अल्पावधीत लाखो रुपयांचा नफा मिळाल्याचा आभास निर्माण करत तिने सेवानिवृत्त व्यक्तीला गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले.

महिलेच्या सांगण्यावरून पीडित व्यक्तीने एका कथित ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर नोंदणी केली. त्यासाठी बँक खात्याची माहिती, पॅन कार्ड, आधार कार्ड यासह आवश्यक कागदपत्रांची नोंद करण्यात आली. सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित सुरू असल्याचा भास निर्माण करण्यात आला. त्यानंतर वेगवेगळ्या यूपीआय आयडी आणि विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगण्यात आले.

आर्थिक फसवणुकीचा आकडा ३७ लाख ९१ हजारांवर

ऑगस्ट ते डिसेंबर २०२५ या चार महिन्यांच्या कालावधीत पीडित व्यक्तीकडून तब्बल साठहून अधिक आर्थिक व्यवहार करण्यात आले. दोन वेगवेगळ्या बँक खात्यांतून एकूण २७ लाख ५६ हजार १६४ रुपये संशयितांनी सांगितलेल्या खात्यांमध्ये जमा करण्यात आले. या फसवणुकीत अन्य दोघांनाही गंडा बसला असून, एकूण आर्थिक फसवणुकीचा आकडा ३७ लाख ९१ हजार ३६४ रुपये इतका झाला आहे. दरम्यान, गुंतवलेली रक्कम परत मिळत नसल्याने आणि कथित ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरील व्यवहार संशयास्पद वाटू लागल्यानंतर संबंधित व्यक्तीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी नाशिक शहर सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३१८(४), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६(क) आणि ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फसवणुकीसाठी वापरण्यात आलेले व्हॉट्सॲप क्रमांक, यूपीआय आयडी आणि ज्या बँक खात्यांमध्ये पैसे वर्ग करण्यात आले त्या खातेदारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

सायबर पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार टाळण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही व्यक्ती अल्पावधीत मोठा नफा मिळवून देण्याचा दावा करत असेल, तर त्यावर विश्वास ठेवू नये. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करून वैयक्तिक माहिती, बँक खाते, पॅन किंवा आधारची माहिती देऊ नये. संशयास्पद व्यवहार आढळल्यास तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा जवळच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >