Thursday, June 25, 2026

BMC News : महापालिका आरोग्य सुविधांची आयुक्तांनी तपासली नाडी

BMC News : महापालिका आरोग्य सुविधांची आयुक्तांनी तपासली नाडी

- महानगरपालिका रुग्णसेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण व नागरिकाभिमुख करा

- दर्जेदार आरोग्य सेवा ; रुग्णकेंद्री कार्यपद्धतीवर भर द्यावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

महानगरपालिका रुग्णालयांमधील रुग्णसेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि नागरिकाभिमुख करण्यावर विशेष भर द्यावा. नागरिकांना वेळेत, सुलभ, दर्जेदार आणि परिणामकारक आरोग्यसेवा उपलब्ध होण्यासाठी वैद्यकीय मनुष्यबळाची उपलब्धता, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, औषधसाठा, स्वच्छता व्यवस्था तसेच रुग्णसुविधांचा नियमित आढावा घेऊन आवश्यक सुधारणा तातडीने अंमलात आणाव्यात. रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला संवेदनशील, कार्यक्षम आणि रुग्णकेंद्री सेवा मिळेल, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने व उत्तरदायित्वाने काम करावे, असे स्पष्ट निर्देश देत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी आरोग्य सुविधाची नाडी तपासली. तसेच महानगरपालिका रुग्णालये, दवाखाने आणि ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ केंद्रांच्या सेवा अधिक प्रभावी व दर्जेदार करण्यासाठी देखभाल, दुरुस्ती, सुरक्षा व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छता आणि परिरक्षणाच्या कामांकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देशही भिडे यांनी दिले. (BMC News)

पश्चिम उपनगरातील बोरिवली पश्चिम येथील हरिलाल भगवती महानगरपालिका सर्वसाधारण रूग्‍णालय आणि कांदिवली (पश्चिम) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय यांना महानगरपालिका आयुक्‍त अश्विनी भिडे यांनी आज (दिनांक २४ जून २०२६) भेट देऊन विविध वैद्यकीय सुविधांची पाहणी केली. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्‍यासमवेत संवाद साधला. (BMC News)

४९० रुग्णशय्यांची अत्याधुनिक सुविधा असलेले हरिलाल भगवती महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय नव्या इमारतीत कार्यान्वित होण्यासाठी सज्ज झाले आहे. तळघर, तळमजला आणि आठ मजले अशा सुसज्ज संरचनेची ही इमारत आधुनिक आरोग्यसेवेच्या सर्व गरजा पूर्ण करणारी आहे. या रुग्णालयात सामान्य वैद्यकीय सेवा, विविध सुपर स्पेशालिटी विभाग तसेच अत्याधुनिक शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध आहेत. हाडांचे रोग, प्रसूती व स्त्रीरोग, बालरोग, कान-नाक-घसा, नेत्ररोग, त्वचारोग, हृदयरोग, हृदयरोग व रक्तवाहिन्यासंबंधी शस्त्रक्रिया, नेफ्रोलॉजी (मूत्रपिंडविकार), जळीत शस्त्रक्रिया केंद्र, आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि अलगीकरण खाटा अशा विविध विभागांचा समावेश आहे. नागरिकांना एकाच छताखाली दर्जेदार, सर्वसमावेशक आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे रुग्णालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. (BMC News)

महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी हरिलाल भगवती महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या नव्या इमारतीची पाहणी करताना बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी ), आपत्कालीन विभाग, अतिदक्षता विभाग (आय सी यु ), प्रसूती विभाग, शस्त्रक्रिया विभाग, निदान सुविधा केंद्र, औषध वितरण केंद्र तसेच अन्य महत्त्वाच्या विभागांना भेट देऊन तेथील सेवा-सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या उपचार सेवांची गुणवत्ता, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता, स्वच्छता व्यवस्था तसेच विविध रुग्णसुविधांबाबत संबंधित अधिकारी व वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. (BMC News)

हरिलाल भगवती महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाची नवी इमारत लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेसाठी कार्यान्वित करण्यात यावी, असे निर्देश देताना भिडे यांनी नवे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होईपर्यंत विद्यमान रुग्णालयाच्या सेवा अखंडितपणे सुरू ठेवण्यावर भर दिला. तसेच महानगरपालिकेची रुग्णालये, दवाखाने आणि ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ केंद्रांच्या देखभाल, दुरुस्ती व परिरक्षणाची कामे संबंधित विभाग कार्यालयांमार्फत (वॉर्ड) नियमितपणे व प्रभावीपणे करण्यात यावीत, असेही स्पष्ट निर्देश दिले. (BMC News)

यानंतर, महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी कांदिवली (पश्चिम) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाला भेट दिली. प्रसूती विभाग, शस्त्रक्रिया विभाग, नवजात शिशु अतिदक्षता विभाग (एन आय सी यु ) यांना भेट देऊन तेथील सेवा-सुविधांचा आढावा घेतला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानगरपालिका सुपरस्‍पेशालिटी रुग्णालयाची उभारणी प्रगतिपथावरअसून ४८ टक्‍के कामकाज पूर्ण झाले आहे. ३२५ रुग्णशय्यांची अत्याधुनिक सुविधा असलेल्‍या रूग्‍णालयाच्‍या इमारतीचे बांधकाम विहित मुदतीत पूर्ण करावे, असे निर्देश भिडे यांनी दिले. (BMC News)

या पाहणी दौऱ्यानंतर आश्विनी भिडे यांनी आर दक्षिण, आर मध्य आणि आर उत्तर विभाग कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातील महानगरपालिका रुग्णालये, दवाखाने तसेच ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ केंद्रांच्या कार्यप्रणालीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी मनुष्यबळाची उपलब्धता, वैद्यकीय व प्रशासकीय यंत्रणेची कार्यक्षमता, सार्वजनिक स्वच्छता व्यवस्था, सुरक्षा व्यवस्थापन तसेच नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्यसेवांच्या गुणवत्तेचा तपशीलवार आढावा घेऊन आवश्यक ते निर्देश दिले. (BMC News)

अनधिकृत बांधकामावर कठोर कारवाई करा :

दौ-यांच्‍या शेवटच्‍या टप्‍प्‍यात महानगरपालिका आयुक्‍त भिडे यांनी आर दक्षिण विभाग कार्यालयास भेट दिली. तसेच, आर दक्षिण, आर मध्य आणि आर उत्तर विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला.विशेषत: मान्सूनपूर्व कार्यवाहीचा आढावा घेताना खड्डेमुक्त रस्त्यांसाठी करण्यात आलेल्या उपाययोजना, पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणांचे व्यवस्थापन, नालेसफाईची प्रगती, रस्ते विकासकामे, अपघातप्रवण व वाहतूक कोंडीची ठिकाणे, धोकादायक इमारतींवरील प्रतिबंधात्मक कारवाई तसेच पावसाळी साथीच्या आजारांच्या नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. प्रकल्‍पबाधित नागरिकांचे (पी पी पी ) पुनर्वसन कार्यवाहीचा सविस्‍तर आढावा भिडे यांनी घेतला. (BMC News)

अनधिकृत बांधकामांवर कोणतीही हयगय न करता कठोर आणि प्रभावी कारवाई करण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश महानगरपालिका आयुक्त भिडे यांनी दिले. भिडे म्‍हणाल्‍या की, अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे तसेच विकास नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या प्रकरणांवर तात्काळ कारवाई करून संबंधित बांधकामे निष्कासित करण्यात यावीत. अशा प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित क्षेत्र पाहणी करून संभाव्य उल्लंघनांची प्रारंभीच्या टप्प्यातच नोंद घ्यावी आणि त्यावर वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाईमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई, निष्काळजीपणा किंवा प्रशासकीय दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही. अशा बांधकामांना प्रोत्साहन देणाऱ्या किंवा नियमबाह्य कामांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितांवर नियमानुसार जबाबदारी निश्चित करून आवश्यक प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. नागरिकांच्या सुरक्षिततेसह नियोजित व शिस्तबद्ध नागरी विकासाच्या दृष्टीने अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम सातत्याने आणि परिणामकारकपणे राबविण्यावर भर द्यावा, असे निर्देश भिडे यांनी दिले. (BMC News)

उपायुक्‍त (महानगरपालिका आयुक्‍त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपायुक्‍त (सार्वजनिक आरोग्‍य) शरद उघडे, उपायुक्‍त (परिमंडळ ७) मनीष वळंजू, सहायक आयुक्त योगेश त्रिवेदी, सहायक आयुक्त आरती गोळेकर, सहायक आयुक्त प्रफुल तांबे, प्रमुख वैद्यकीय अधिकारी (प्रभारी) डॉ. नितिराज माने, वैद्यकीय अधिकारी (प्रभारी) डॉ. अजय गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते. (BMC News)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा