स्मृतीपटल-अनिल रा. तोरणे यशस्वी पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो, असे अनेकदा बोलले जाते; परंतु प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एखाद्या स्त्रीचा हात असेलच असे नाही. कधी कधी एखाद्या सफल पुरुषाच्या यशस्वी वाटचालीत त्याचे नातलग, आपले मानलेले असे कोणी किंवा एखाद्या मित्राचाही हात असू शकतो. गायन आणि नाटक यांची आवड असणाऱ्या एका प्रसिद्ध गीतकाराने प्रारंभी यश पदरात न पडल्याने दुसऱ्या वेळेला चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. दोन-चार महिने त्याने कसून प्रयत्न केला पण अखेर त्याची हिंमत खचू लागली. तोवर एक अनोळखी इसम त्याचा मित्र बनला होता. माझ्यासाठी दिल्लीला जाण्याचेतिकीट काढ, असे त्याने त्या मित्राला सांगितले आणि...हिंदी चित्रपटातील कोणत्याही प्रसंगावर (सिच्युएशन) एकापेक्षा एक वरचढ गीते लीलया लिहिणारे सुप्रसिद्ध गीतकार आनंद बक्षी यांना बालपणापासूनच गायनाची आवड होती. ‘रामलीला’मध्ये नेहमी भाग घेणाऱ्या आनंद बक्षी यांना चित्रपट पाहण्याचीही अतिशय आवड होती. चित्रपट पाहण्यासाठी जेव्हा केव्हा त्यांच्या खिशात पैसे नसायचे तेव्हा आपली शालेय पुस्तके विकून ते आपला हा छंद पुरा करीत असत. गायन आणि चित्रपट यांची आवड जोपासणाऱ्या आनंद बक्षी यांचा हळूहळू लिखाणाकडे कल निर्माण होऊ लागला. ते स्वत: भारतीय पायदळात असल्याने साहित्य जगताशी जरी त्यांचा संबंध आला नव्हता तरी आपण चित्रपट गीतेच लिहावयाची हे त्यांनी मनोमन ठरवून टाकले होते. आनंद बक्षी यांनी बालपणीच मनाचा पक्का निर्धार केला होता, की कधी ना कधी मुंबईला जाऊन चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून स्वत:चे नशीब अजमावून पाहीनच ! अखेर १९५० साली लष्करातील नोकरी सोडून चित्रपटसृष्टीत आपले नशीब आजमावून पाहण्यासाठी आनंद बक्षी यांनी प्रथमच मुंबईत पाऊल टाकले. मुंबईत आल्यानंतर चित्रपटसृष्टीत आपल्या नशिबाची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी बरीच धडपड केली; पण त्यांना यश हुलकावणीच देत राहिले. सततच्या अपयशाने आनंद बक्षी पुरते हताश झाले. एक-दोन महिन्यांच्या कसून केलेल्या प्रयत्नानंतर त्यांनी ठरविले, की आता पुन्हा मुंबईला यायचे नाही आणि त्यांनी मुंबई सोडली! ते पुन्हा लष्करात भरती झाले; परंतु आपले मन पुन्हा एकवार हळवे बनू नये आणि आपल्याला पुन्हा मुंबईला जाण्याची इच्छा होऊ नये म्हणून आनंद बक्षी विवाहबद्ध झाले. ते पिताही बनले. तीन वर्षे लष्करात नोकरी केल्यावर त्यांच्या मनात पुन्हा एकदा मुंबईचा विचार घोंघावू लागला. त्यांनी ठरविले, की मुंबईला चित्रपटसृष्टीत जाऊन आपण गीतगायन करू. ते करावयाची संधी नाही मिळाली तर गीतलेखन करू आणि तेही पदरात न पडल्यास दुसरे काहीही करू पण मुंबईला जाऊच ! त्यावेळी १९५६ साल उजाडले होते. आनंद बक्षी आता दुसऱ्यांदा मुंबईत दाखल झाले. आल्यावर पुन्हा एकदा कामासाठी त्यांची वणवण सुरू झाली. मुंबईच्या प्रसिद्ध दादर भागातील एका गेस्ट हाऊसमध्ये आनंद बक्षी राहात होते; परंतु त्यांना काम न मिळाल्याने गेस्ट हाऊसचे भाडे भरणेही त्यांना जड झाले होते. दरम्यान पश्चिम रेल्वेच्या मरिन लाइन्स स्थानकावर तिकीट तपासनीस म्हणून काम करणारा एक इसम आनंद बक्षी यांचा मित्र बनला होता. त्याला आनंद बक्षी म्हणाले, मी दिल्लीला परत जाऊ इच्छितो; मला दिल्लीचे एक तिकीट काढून द्या. ते ऐकून त्या तिकीट तपासनीसाला धक्काच बसला. कारण आनंद बक्षी यांच्याशी त्याचा परिचय झाल्यानंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे तो चांगलाच भारावून गेला होता. तो त्यांना नेहमी म्हणत असे, की आज ना उद्या तुम्ही नक्की फार मोठे गीतकार बनाल. आनंद बक्षी दिल्लीला परत जात आहेत हे ऐकल्यामुळे तो मित्र दादरला त्यांच्या गेस्ट हाऊसवर गेला. त्याने बक्षी यांचे गेस्ट हाऊसमधील सगळे सामान घेतले आणि तो बोरिवलीच्या त्याच्या घरी त्यांना घेऊन आला. सुमारे सहा वर्षे त्याने बक्षी यांना आपल्याच घरी ठेवले. त्याने त्यांना राहावयास जागा तर दिलीच शिवाय जेवणखाणही दिले. इतकेच नव्हे तर बक्षी यांना कामाच्या शोधार्थ जाता यावे म्हणून त्या काळातील दोन-चार रुपयेही दररोज देत असे. त्या मित्राने आनंद बक्षी यांना इतकी मदत केली नसती, तर कदाचित त्यांनी पहिल्या वेळेस जशी शपथ घेतली होती तशीच शपथ पुन्हा घेऊन ते दिल्लीला परतले असते. कामाच्या शोधार्थ आनंद बक्षी चित्रपटनिर्मितीच्या कोणत्या ना कोणत्या स्टुडिओत जात आणि त्या ठिकाणी जो भेटेल त्याला मी दिल्लीहून गीतकार बनण्यासाठी आलोय. मी अमका आहे, मी तमका आहे, असे सांगत असत. पण त्यांचे बोलणे कोणी गांभीर्याने घेत नसे. पण योगायोग काय असतो पाहा! अभिनेते-निर्माते भगवान दादा (पालव) यांच्या एका चित्रपटाचे काम सुरू व्हावयाचे होते आणि ते कोणा गीतकाराची प्रतीक्षा करीत होते. त्याचवेळी भगवान दादा यांच्यापुढे जाऊन आनंद बक्षी उभे राहिले आणि दादांना म्हणाले, मी गीत लिहितो. ते ऐकून दादा त्यांना म्हणाले, लिहा गीत. भगवान दादांनी तसे सांगताच आनंद बक्षी यांनी गीत लिहावयास घेतले आणि दोन-चार दिवसांमध्ये चार गीते लिहून ती दादांच्या हवाली केली. त्यांनी लिहिलेले पहिले गीत “धरती तेरे लिए, तू है धरती के लिए...” जेव्हा ध्वनिमुद्रित झाले तेव्हा आनंद बक्षी यांचा आनंद गगनात मावेना; परंतु त्या चित्रपटाला यश न मिळाल्याने आनंद बक्षी यांना पुन्हा पायपीट करणे भाग पडले. त्यानंतर ‘मेहंदी लगी मेरे हाथ’ या चित्रपटाची गीते लिहावयाची संधी त्यांच्याकडे चालून आली. या चित्रपटामुळे गीतकार अशी त्यांची चित्रपटसृष्टीत ओळख निर्माण झाली; परंतु चेतन केरानिर्मित, सूरज प्रकाश दिग्दर्शित आणि संगीतकार बंधू कल्याणजी-आनंदजी यांचे सुश्राव्य संगीत लाभलेल्या ‘जब जब फूल खिले’ या शशी कपूर-नंदा अभिनीत चित्रपटातील “परदेसियों से न अखियां मिलाना”, “ये समा समा है ये प्यार का”, “यहां मैं अजनबी हूं” या व अन्य गीतांनी इतकी लोकप्रियता मिळविली की गीतकार आनंद बक्षी यांना पुन्हा मागे वळून पाहावे लागले नाही!






