जलतरण तलाव व बांधकामांच्या जलजोडण्या खंडित ; उद्योगांना २० टक्के कपात मुंबई : नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने मुंबईतील पाणीटंचाईची परिस्थिती अधिक गंभीर बनली असून, उपलब्ध जलसाठा जास्त काळ टिकवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने कठोर उपाययोजना जाहीर केल्या आहेत. १५ मेपासून लागू असलेल्या १० टक्के पाणी कपातीनंतर आता १७ जूनपासून जलतरण तलाव, बांधकाम प्रकल्प आणि औद्योगिक-व्यावसायिक वापरावरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत.मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या केवळ १,५५,१६७ दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक असून तो एकूण क्षमतेच्या सुमारे १०.७२ टक्के आहे. हा साठा अंदाजे ४० दिवस पुरेल इतकाच असल्याने महापालिकेने जलसंपदा विभागाच्या निर्देशानुसार अतिरिक्त पाणीबचत उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या नव्या आदेशानुसार सर्व बांधकाम प्रकल्पांसाठी देण्यात आलेल्या जलजोडण्या तात्पुरत्या खंडित करण्यात येणार असून नवीन बांधकामांना पाणी जोडणी मंजूर केली जाणार नाही. तसेच शहरातील सर्व जलतरण तलावांच्या जलजोडण्या तात्पुरत्या बंद करण्यात येणार आहेत. औद्योगिक, व्यापारी आणि स्पोर्ट्स क्लब आस्थापनांच्या पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात लागू करण्यात आली आहे. याशिवाय एरेटेड वॉटर व पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर बॉटलिंग प्रकल्पांना दिला जाणारा पाणीपुरवठा केवळ कामगारांच्या पिण्याच्या गरजेपुरता मर्यादित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वाढीव किंवा अतिरिक्त जलजोडणीसाठी येणारे अर्ज पुरेसा जलसाठा उपलब्ध होईपर्यंत प्रलंबित ठेवले जाणार आहेत. मुंबईला दररोज सुमारे ३,९५० ते ४,१०० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाण्याची आवश्यकता असते. पावसाचा विलंब आणि तलावांतील घटता साठा लक्षात घेऊन महापालिकेने आधीच १० टक्के कपात लागू केली आहे. सध्या तानसा पाणलोट क्षेत्रात केवळ १३ मिमी, तर मोडक सागर परिसरात ७ मिमी पावसाची नोंद झाली असून इतर तलाव क्षेत्रांमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही.सार्वजनिक स्वच्छतागृहे, प्रसाधनगृहे, वाहन धुणे, उद्यानांना पाणी देणे आणि रस्ते धुणे यासाठी पिण्याच्या पाण्याऐवजी टँकर, बोअरवेल किंवा विहिरींच्या पाण्याचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, एसीएफ, एचपीसीएल, बीपीसीएल, नेव्ही, एमआयडीसी आणि बीपीटी यांसारख्या संस्थांना दुय्यम वापरासाठी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पांमधून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर बंधनकारक करण्यात आला आहे.दरम्यान, महापालिकेने स्पष्ट केले की यंदाचा जलसाठा मागील वर्षाच्या तुलनेत अधिक आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तलावांमध्ये केवळ ५.४५ टक्के पाणी उपलब्ध होते. मात्र, मान्सून आणखी लांबल्यास जलसाठा जुलैअखेरपर्यंत टिकवण्याचे मोठे आव्हान निर्माण होणार आहे.






