आयुष्यातली महत्त्वाची परीक्षा असो की महत्त्वाच्या ठिकाणी नोकरी असो; नवरा-बायकोचे नाते असो की कोर्ट केसचा निकाल असो; हेच कशाला तर अगदी आपण आदर्श मुलगा, मुलगी, वडील, आई, मित्र आहोत की नाही; याबद्दलचे शिक्के सुद्धा समाज देत असतो. महत्त्वाच्या गोष्टींवर शिक्का बसायलाच हवा, असे म्हटले जाते. कारण तसे झाल्याशिवाय त्या गोष्टींवर शिक्कामोर्तब होत नाही. मग ती गोष्ट कोणतीही असो. पण खूप कमी माणसे अशी असतात, जी कुठल्याही शिक्क्याशिवाय आयुष्यात पुढे जातात आणि स्वतःच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब करतात. अशाच काही गोष्टींना स्पर्श करणारे 'शिक्कामोर्तब' हे नाटक आता रंगभूमीवर आले आहे. सागर कारंडे, भक्ती रत्नपारखी, कांचन पगारे व स्नेहा पराडकर अशी कलावंतांची चौकडी या नाटकात आहे. या चौकडीची एकत्र मोट बांधण्याची किमया, या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक प्रमोद शेलार यांनी केली आहे. यानिमित्ताने, रंगभूमीवर कलावंतांच्या चौकडीचे पंचरंगी 'शिक्कामोर्तब' झाले असल्याचे दिसून येत आहे. 'तरंगिणी एंटरटेनमेंट' आणि 'नवनीत' निर्मित हे नवीन नाटक रंगभूमीवर आले आहे. अनेक नाटकांचे नेपथ्य करणारे संदेश बेंद्रे; तसेच प्रकाशयोजनाकार शीतल तळपदे यांची या नाटकाला सक्षम साथ आहे. वलय मुळगुंद यांच्या गीतांना अभिजीत पेंढारकर यांनी संगीतसाज चढवला आहे. महेंद्र खराडे हे नाटकाचे निर्मिती प्रमुख म्हणून काम पाहात आहेत. ही सगळी मंडळी रंगभूमीवर सध्या उत्साहात 'शिक्कामोर्तब' करत असल्याचे स्पष्ट होत आहे. या निमित्ताने, या नाटकाच्या टीमशी साधलेला विशेष संवाद... वेगळ्या पद्धतीचा विषय... - प्रमोद शेलार (लेखक-दिग्दर्शक) एका जोडप्याच्या आयुष्यात आलेले दुसरे जोडपे, यांची ही कहाणी आहे. विनोदी अंगाने जाणाऱ्या या कथेत शेवटी एक वेगळाच ट्विस्ट येतो आणि यातून लोकांना या गोष्टीचा सगळा उलगडा होईल. सागर कारंडे, भक्ती रत्नपारखी, कांचन पगारे, स्नेहा पराडकर असे कलाकार यात काम करत आहेत. त्यामुळे हे नाटक रसिकांना नक्कीच आवडेल. ही एक खरी कहाणी आहे आणि तिला थोडेसे ट्विस्ट करून आम्ही रंगमंचावर आणले आहे. हे नाटक 'हिट' असण्यावर लोक नक्कीच शिक्कामोर्तब करत राहतील, याची मला खात्री आहे. लेखक व दिग्दर्शक म्हणून एक वेगळ्या प्रकारचे नाटक देण्याचा मी प्रयत्न केला आहे. अशा प्रकारचा विषय आतापर्यंत रसिकांसमोर आलेला नाही. त्यामुळे मला वाटले की त्यावर लेखन करावे. मी मुळातच दिग्दर्शक असल्याने मला असे वाटले की हे नाटक मीच दिग्दर्शित केले तर जास्त चांगले होईल. कारण या विषयावर आम्ही सर्वांनी मिळून अभ्यासही केलेला आहे. मनोरंजन करत करत विनोदाच्या अंगाने हे नाटक जाते. यात करमणूक सुद्धा आहे आणि नाटक संपताना लोक त्यातून नक्कीच काहीतरी घरी घेऊन जातात, हे महत्त्वाचे आहे. नाटक कायम मनात... - सागर कारंडे (अभिनेता) मी नाटकापासून कधीच दूर गेलेलो नाही आणि नाटकही माझ्यापासून कधी दूर गेलेले नाही. रंगभूमीने मला घडवले आहे. त्यामुळे माझ्या 'शिक्कामोर्तब' या नवीन नाटकासाठी मी खूप उत्सुक आहे. 'बिग बॉस'मध्ये असतानाही माझ्या मनात नाटक कायम होते. तिथून बाहेर आल्यावर नाटक करायचे, हे मी ठरवलेच होते. दोन जोडप्यांच्या आयुष्यात घडणारी कहाणी 'शिक्कामोर्तब' नाटकात असून, हे नाटक विनोदी ढंगाचे आहे. हे नाटक रसिकांना नक्कीच आवडेल. वाचनातच आवडलेले नाटक... - भक्ती रत्नपारखी (अभिनेत्री) या नाटकातील माझ्या पात्राचे नाव आहे 'लैला'. खूपच इंटरेस्टिंग असे हे कॅरेक्टर आहे. या पात्राचे नाव 'लैला' असले तरी तिला अजून तिचा 'मजनू' मिळालेला नाही. आता हा मजनू नक्की कोण आहे, नक्की काय भानगड आहे, तिला तो भेटतो की नाही, हे सर्व अतिशय वेगळ्या पद्धतीने आमच्या नाटकामध्ये आले आहे. नाटकाचा शेवट अत्यंत वेगळा आहे. मला पहिल्या वाचनामध्येच खूप आवडलेले असे हे नाटक आहे. मला रिहर्सल करतानाच खूप मजा येत होती. आम्हीच नाटक इतके एन्जॉय करत आहोत आणि साहजिकच, रसिकही हे नाटक रंगभूमीवर एन्जॉय करत आहेत. आव्हानात्मक भूमिका... - कांचन पगारे (अभिनेता) एका बंगाली माणसाची मी भूमिका यात करतोय. त्याच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे त्याची बायको. त्याच्या बायकोबरोबर त्याला डील करताना नाकीनऊ येतात. त्यात त्याची भाषा कुणाला लवकर कळत नाही. तो बंगालीतून बऱ्याच गोष्टी मराठीत पोचवण्याचा प्रयत्न करतो. हे सर्व करायला मला खूप मजा येत आहे. मराठी नाटकात बंगाली माणसाची भूमिका करायची; हे माझ्यासाठी वेगळे होते. त्यासाठी मी बंगाली भाषा शिकलो. बंगाली बोलणे सुरुवातीला थोडे अवघड वाटत होते, पण आता या भाषेवर पकड बसली आहे. माझ्यासाठी हे सर्व खूप आव्हानात्मक आहे.






