Saturday, June 6, 2026

नाण्याची दुसरी बाजू

नाण्याची दुसरी बाजू

- प्रतिभारंग; प्रा. प्रतिभा सराफ

आजकालची पिढी म्हणजे...!” एक माणूस तावातावाने बोलत होता. त्याच्या बाजूला बसलेला माणूस त्याच्या सुरात सूर मिळवत म्हणाला, “आजच्या या काळात या पिढीसोबत जमवून घेणं आणि त्यांच्यासोबत वाटचाल करणं हे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.” “यांच्याकडून काही अपेक्षा करायची म्हणजे कठीणच आहे.”

हा संवाद चालत्या बसमध्ये चालू होता. ड्रायव्हरच्या मागच्या आडव्या सीटवर ते दोघे बाजूबाजूला बसले होते आणि मी त्यांच्याकडे चेहरा करून समोरच्या सीटवर. एकाक्षणी त्यांचे संभाषण माझ्या डोक्यात गेले आणि मी म्हटले, “सॉरी, मी मधेच काही बोललं तर चालेल का?” त्या दोघांनी आपले संभाषण थांबवून आश्चर्याने माझ्याकडे पाहिले. कदाचित ते एकमेकांशी बोलून कंटाळलेही असावेत. ते म्हणाले, “बोला की.” “सगळ्यांनाच एका पारड्यात तोलणे बरोबर नाही.”

मी झटक्यात बोलून गेले. “काही कळलं नाही.” एकजण म्हणाले. “नाही मी मघापासून तुमचे बोलणे ऐकत आहे. तुम्ही आजच्या पिढीला दोष देत आहात, त्याविषयी मी बोलले.” मग त्यातले एक गृहस्थ हसत हसत म्हणाले, “तुम्हाला काय वाटतं ते मनमोकळेपणे बोला तसे आपण तिघेही रिकामेच आहोत. तितकाच टाईमपास होईल.” या संभाषणानंतर मी त्यांना दोन प्रसंग सांगितले. ते या लेखात विस्तृतपणे देत आहे.

एकदा मी चर्नी रोडवरून उबर टॅक्सीने घराकडे परतत होते. ड्रायव्हर एक तरुण मुलगा होता. अचानक झालेल्या ट्रॅफिक जॅममुळे फ्री- वेवर बराच काळ टॅक्सी अडकून पडली. नेमके काय झाले असेल?, या विषयावर ड्रायव्हरशी बोलणे सुरू झाले आणि मग अवांतर गप्पा झाल्या. त्याच्याशी बोलताना कळले की, हा मुलगा इंजिनीअरिंग कॉलेजचा विद्यार्थी आहे. सुट्ट्यांच्या काळात बारा तास आणि कॉलेज चालू असण्याच्या काळात संध्याकाळी दोन तास हा मुलगा उबर टॅक्सी चालवतो. घरची परिस्थिती अतिशय उत्तम असून घरामध्ये तीन-चार गाड्या आहेत, असे त्याने सांगितल्यावर मला नवल वाटले. तो म्हणाला की नाही तरी गाड्या दिवसभर पडूनच असतात, मग त्याच्याकडे मी पैसे कमवायचे साधन म्हणून पाहिले. या निमित्ताने या वयापासूनच ड्रायव्हिंगचा आनंद घेत मी सेव्हिंग सुरू केले आहे. उत्तम गुंतवणूक करतो जेणेकरून भविष्यात मला याचा उपयोग होईल. मी त्याला म्हटले पण तुझ्या वयातल्या मुलांचा कमवण्यापेक्षा पैसे उडवण्यावर जास्त भर असतो. तो म्हणाला की, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. माझ्याबरोबरची मुले सिनेमाला जातात, क्लबमध्ये जातात, कुठेतरी फिरायला जातात; परंतु मला अशा तऱ्हेने गाडी चालवून पैसे कमवायला जास्त आवडते. मी त्याचे खूप कौतुक केले, तर म्हणाला की तुमच्यासारखी माणसे भेटतात, त्यांच्याशी बोलून खूप गोष्टींचे ज्ञान मिळते. जरी टॅक्सीतील माणसे माझ्याशी बोलले नाहीत तरी ते आपसात बोलतात ते ऐकूनही मला अनेक विषयांवरचे आपोआप ज्ञान प्राप्त होते. मी लहान वयातच प्रगल्भ होत चाललो आहे, असे मला जाणवते.

आणखी एका उदाहरणाकडे मला या लेखातून आपले लक्ष वेधायचे आहे. एकदा सकाळी ॲमेझॉनवरून मुलीने काही खाद्यपदार्थ मागवले. ते घेण्यासाठी मी सकाळी ८ वाजता दार उघडले. समोर पाहते तर माझाच विद्यार्थी! गोड हसला, मी त्याला ‘आत ये’ म्हटले पण तो म्हणाला, “परत केव्हा तरी... आज खूप घाईत आहे.”

त्यानंतर कॉलेजमध्ये मी त्याच्याशी मुद्दामहून संधी साधून बोलले तेव्हा लक्षात आले की कॉलेजची वेळ ही बारा ते पाच असते. तर सकाळचे दोन तास म्हणजे सात ते नऊ हा मुलगा ॲमेझॉनमध्ये पार्सल पोहोचवण्याचे काम करतो जेणेकरून त्याला स्वतःच्या शिक्षणासाठी थोडीफार फी जमवता येते आणि शिवाय हाताशी छोट्यामोठ्या खर्चासाठी पैसे उरतात.

एका श्रीमंत आणि एका गरीब विद्यार्थ्यांची ही माहिती मी बसमध्ये बसलेल्या समोरच्या दोन प्रवाशांना सांगितल्यावर त्यांना खरोखरी आनंद झाला. त्यातले एक जण म्हणाले,“मॅडम, कधी कधी आपण एखाद्या गोष्टीचा एकतर्फीच विचार करतो. मी केवळ माझ्या मुलांचा आणि नातवंडांचा विचार करत होतो. पण जगात अशी वेगळीवेगळी माणसं असतात ती वेगवेगळ्या प्रकारे काही कामं करत असतात, हे तुमच्यामुळे आज कळलं, खरंच छान वाटलं.” त्याची री ओढत दुसरे गृहस्थ म्हणाले, “होय, आमचा पेपर टाकणारा पोऱ्या माझ्या नातवंडाच्या वयाचा आहे; परंतु पहाटे ५ ते ७ हा मुलगा पेपर टाकून स्वतःच्या शिक्षणासाठी पैसे कमावतो हे तुमच्या बोलण्यानंतर मलाही आठवलं.”

इतक्यात त्या दोघांचा स्टॉप आला आणि ते उतरून गेले. त्यामुळे ही उदाहरणे फक्त ‘पिढी’पुरता लक्षात न घेता आपण सगळ्याच गोष्टींसाठी लक्षात ठेवली पाहिजेत की नाण्याला दोन बाजू असतात. आपल्याला दिसते तीच बाजू खरी असते, असे नाही तर आपणच त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन तीही बाजू पाहणे महत्त्वाची असते! pratibha.saraph@ gmail.com

Comments
Add Comment