- गोष्ट लहान, मोठा अर्थ; शिल्पा अष्टमकर
मानवी जीवनात यश मिळवण्यासाठी अनेक गुणांची आवश्यकता असते. त्यापैकी संघटितपणा हा एक अत्यंत महत्त्वाचा गुण आहे. संघटितपणा म्हणजे आपली कामे, वेळ, साधने आणि जबाबदाऱ्या यांचे योग्य नियोजन करून सुव्यवस्थित पद्धतीने कार्य करणे होय.
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक कामे एकाच वेळी करावी लागतात. अशा वेळी संघटितपणा नसल्यास गोंधळ निर्माण होतो, वेळ वाया जातो आणि कामाची गुणवत्ता कमी होते. याउलट, संघटित व्यक्ती आपली उद्दिष्टे स्पष्ट ठेवते, कामांचे प्राधान्यक्रम ठरवते आणि नियोजनपूर्वक काम पूर्ण करते.
विद्यार्थ्यांच्या जीवनात संघटितपणाला विशेष महत्त्व आहे. अभ्यासाचे वेळापत्रक तयार करणे, आवश्यक पुस्तके व साहित्य नीट ठेवणे, गृहपाठ वेळेवर पूर्ण करणे आणि परीक्षेची योग्य तयारी करणे यासाठी संघटितपणा आवश्यक असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि शैक्षणिक यश मिळवणे सोपे जाते. शिक्षक, कर्मचारी, अधिकारी आणि व्यावसायिक यांच्यासाठीही संघटितपणा तितकाच आवश्यक आहे. शाळा, कार्यालय किंवा कोणतीही संस्था यशस्वीपणे चालवण्यासाठी कामांचे योग्य नियोजन, जबाबदाऱ्यांचे वाटप आणि वेळेचे व्यवस्थापन आवश्यक असते. संघटितपणामुळे कार्यक्षमता वाढते, तणाव कमी होतो आणि अपेक्षित उद्दिष्टे साध्य करता येतात.
संघटितपणा विकसित करण्यासाठी काही सवयी उपयुक्त ठरतात. जसे की, दैनंदिन कामांची यादी तयार करणे, वेळेचे नियोजन करणे, वस्तू ठरावीक जागी ठेवणे, महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देणे आणि कामे वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे. या सवयी सातत्याने जोपासल्यास संघटितपणा हा स्वभावाचा भाग बनतो. शेवटी असे म्हणता येईल की, संघटितपणा हा यशस्वी, शिस्तबद्ध आणि आनंदी जीवनाचा पाया आहे. हा गुण व्यक्तीला कार्यक्षम बनवतो, आत्मविश्वास वाढवतो आणि वैयक्तिक तसेच सामाजिक जीवनात प्रगती करण्यास मदत करतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनात संघटितपणाची सवय अंगीकारली पाहिजे. आयुष्याच्या सर्व क्षेत्रात असलेल्या व्यवस्थापनालाच संघटितपणा म्हणतात.
माणसाकडे पाहिल्यानंतर संघटितपणा लक्षात येतो. त्याचे कपडे, बूट, चप्पल, केस, राहणे, बसणे, देहबोली यावरून त्याच्यामध्ये संघटितपणा आहे किंवा नाही हे लक्षात येते.
संघटित व्यक्ती वेळ पाळतात. आपण वेळेबद्दल अत्यंत काटेकोर असले पाहिजे. आयुष्यात गेलेला वेळ परत मिळत नसतो. वेळ न पाळणारी अनेक माणसे आपण पाहतो. इंडियन टाईम या नावाखाली अर्धातास एकतास उशिरा येणारे महाभाग पाहिले आहेत. दिलेली वेळ पाळण्यामध्ये संघटितपणा हा गुणधर्म असतो. सांगितलेले काम न चुकता करणे. आपल्याला सांगितलेले काम जर आपण केले नाही व विसरलो असे उत्तर दिल्यास लोक आपल्या शब्दावर विश्वास ठेवत नाहीत. आपण विश्वासपात्र होऊ शकत नाही.
आपल्याला जी कामे करावयाची आहेत, ज्या वस्तू आणायच्या आहेत त्याची यादी कागदावर करावी म्हणजे कोणतेही काम विसरत नाही व आपला आत्मविश्वास वाढतो.
कोणतीही गोष्ट करावयाची असल्यास त्याचे नियोजन करावे. नियोजन केलेली कोणतीही गोष्ट यशस्वीरीत्या पार पाडता येते. नियोजन करून अभ्यास केल्यास तो व्यवस्थित होतो. आपला दिनक्रम कसा असावा याचे वेळापत्रक करून आपण पाळू लागलो, तर आपला वेळ फुकट जात नाही व आपले काम यशस्वी होते. संघटितपणा असलेल्या माणसांचे इतरांशी चांगले संबंध असतात. आपल्या जवळच्या लोकांचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस लक्षात ठेवून त्यांचे अभिनंदन केल्यास परस्परसंबंध अधिक चांगले होतात.
स्वाध्याय - स्वतःचे अध्ययन करणे. शांत ठिकाणी बसून मी कसा आहे. माझ्यातील चांगले गुण कोणते? वाईट कोणते? माझ्यातले वाईट गुण कमी करता येतील का? उद्या मी माझ्यातला एक वाईट गुण सोडणार आहे असा निश्चय करावा. दुसऱ्या दिवशी रात्री झोपताना दिवसभरात तो वाईट गुण सोडला का त्याचा आढावा घ्यावा. अशा रीतीने आपले व्यक्तिमत्त्व संपन्न होते. विकसित होते. मानवाचा महामानव होण्यासाठी, नराचा नारायण होण्यासाठी स्वाध्याय आवश्यक आहे.






