Friday, June 5, 2026

K. Annamalai : के. अण्णामलाई भाजपमधून बाहेर पडले, केली राजकीय पक्षाची घोषणा

K. Annamalai : के. अण्णामलाई भाजपमधून बाहेर पडले, केली राजकीय पक्षाची घोषणा

नवी दिल्ली : तामिळनाडू भाजपचे नेते के. अण्णामलाई यांनी भाजपमधील सर्व पदांचा आणि जबाबदाऱ्यांचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने मंजूर केला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्ष मुख्यालयाचे प्रमुख अरुण सिंह यांनी प्रसिद्धीपत्रक काढून राजीनामा मंजूर झाल्याची माहिती सार्वजनिक केली आहे. भाजपमधून बाहेर पडलेल्या के. अण्णामलाई यांनी काही तासांतच स्वतःच्या पक्षाची घोषणा केली आहे. आता त्यांना किती जणांची आणि कशी साथ मिळते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. (K Annamalai quits BJP)

के. अण्णामलाई हे काही काळ तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष होते. पण अण्णाद्रमुकसोबत निवडणूकपूर्व युतीची चर्चा सुरू होण्याआधीच त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर ते पक्षात एक नेते म्हणून सक्रीय होते. दक्षिणेतले भाजपचे प्रभावी युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते. पण तामिळनाडूत सी. विजय जोसेफच्या नेतृत्वात टीव्हीके पक्षाने सरकार स्थापन केले. यानंतर काही दिवसांतच के. अण्णामलाई यांनी भाजपचा राजीनामा दिला आणि स्वतःच्या पक्षाची घोषणा केली आहे.

आजच (शुक्रवार ५ जून २०२६) दुपारी के. अण्णामलाई पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या पुढील वाटचालीबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधणार आहेत. भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने राजीनामा मंजूर केल्यानंतर के. अण्णामलाई यांनी एक व्हिडीओ पब्लिश केला आहे. या व्हिडीओत त्यांनी आपण स्थापन करत असलेला पक्ष पुढील विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे.

दक्षिणेतले सिंघम म्हणून ओळखले जाणारे कुप्पुसामी अण्णामलाई अर्थात के. अण्णामलाई हे माजी आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचा राजकारणातील वैयक्तिक चाहता वर्ग मोठा आहे. या चाहत्यांचा आणि समर्थकांचा त्यांना पुढील राजकीय वाटचालीत फायदा होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

सध्या तामिळनाडूच्या विधानसभेत २३४ पैकी एक आमदार भाजपचा आहे. याआधीच्या निवडणुकीत भाजपचे विधानसभेत चार आमदार होते. यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या आमदारांच्या संख्येत घट झाली. हा निकाल जाहीर झाल्यानंतर काही आठवड्यांतच के. अण्णामलाई यांनी भाजपमधून बाहेर पडून स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >