Saturday, May 30, 2026

Prajakta Tanpure: माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमध्ये प्रवेश

Prajakta Tanpure: माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमध्ये प्रवेश

विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर मविआला मोठा धक्का

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीचा रणसंग्राम ऐन रंगात आलेला असतानाच महाविकास आघाडीला अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खंदे शिलेदार आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखेर 'कमळ' हाती घेतले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तनपुरे यांनी राहुरीचे नगराध्यक्ष आणि समर्थकांसह शनिवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतल्यापासूनच तनपुरे यांच्या राजकीय भूमिकेविषयी तर्कवितर्क लढवले जात होते, त्यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब झाले असून, आगामी विधानपरिषद निवडणुकीत त्यांना अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या अक्षय कर्डिले यांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला होता. त्यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतल्याने भाजपचा मार्ग सुकर झाला होता. मात्र, त्याच निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या संवादानंतर तनपुरे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. पोटनिवडणुकीतील माघारीचे 'फळ' म्हणून आता त्यांना भाजपकडून विधानपरिषदेच्या रिंगणात उतरवले जाण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १ जून असल्याने, पुढील २४ तासांत अहिल्यानगरच्या राजकारणाला अत्यंत अनपेक्षित वळण मिळण्याची शक्यता आहे.

मामांना सामोरे जाण्याची हिंमत नाही - तनपुरे

प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे सख्खे भाचे आहेत. त्यामुळे या पक्षांतराची राजकीय वर्तुळात सर्वाधिक चर्चा आहे. भाजप प्रवेशाविषयी बोलताना तनपुरे म्हणाले, "माझे मामा जयंत पाटील आणि आदरणीय शरद पवार यांना भेटायची माझ्यात हिंमत नाही, मी त्यांना याबाबत सांगितलेही नाही. मात्र, मतदारसंघातील अडचणी आणि ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर मी संघर्ष केला, त्यांच्या भावना लक्षात घेऊनच मला हा निर्णय घ्यावा लागला. सध्याच्या स्थितीत बोलणे देखील कठीण झाले आहे."
 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

आमच्यासाठी धक्का - जयंत पाटील

प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशावर त्यांचे मामा जयंत पाटील म्हणाले, "प्राजक्त यांच्या भाजप प्रवेशाची माहिती मला काही वेळापूर्वीच मिळाली. माझा आणि त्यांचा कोणताही संपर्क झालेला नाही. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणे आमच्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे. मतदारसंघातील स्थानिक परिस्थिती पाहून त्यांनी हा निर्णय घेतला असावा," अशी सावध प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >