Friday, May 29, 2026

Nashik TCS case : TCS प्रकरणात मोठी घडामोड, ८ संशयितांविरुद्ध थेट...

Nashik TCS case : TCS प्रकरणात मोठी घडामोड, ८ संशयितांविरुद्ध थेट...

Nashik TCS case : नाशिकच्या TCS प्रकरणातील मोठी घडामोड समोर आली आहे. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील (Nashik TCS) महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी आठ संशयितांविरुद्ध दोन हजारहून अधिक पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. संशयितांमध्ये सहा पुरूष तर दोन महिलांचा समावेश असून या प्रत्येक गुन्ह्यासाठी स्वतंत्र दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

TCS प्रकरणात आठ जणांविरोधात नऊ गुन्हे

टीसीएस प्रकरणात आतापर्यंत आठ जणांविरोधात एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. यातील लैंगिक अत्याचार व धर्मांतराचा प्रयत्न प्रकरणी एक गुन्हा देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तर उर्वरित आठ गुन्हे नाका पोलीस ठाण्यात दाखल आहेत. यात निदा एजाज खान (Nida Ejaz Khan), रजा रफीक मेमन, अश्विनी चैनानी (Ashwini Chainani), शाहरूख हुसेन शौकत कुरेशी, तौसीफ बिलाल अत्तार, शफी भिकन शेख, दानिश इजाज शेख, आसिफ आलम अन्सारी या संशयितांचा समावेश आहे. आठ गुन्ह्यांतील या संशयितांविरुद्ध येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात मूळ दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. प्रत्येक गुन्ह्याचे दोषारोपपत्र स्वंतत्र असून हे दोषारोपपत्र दोन हजारहून अधिक पानांचे असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

५० साक्षीदारांचे जबाब, दोन हजारहून अधिक पानांचे दोषारोपपत्र

तपासादरम्यान पोलिसांनी सुमारे ५० साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहे. सीसी टीव्ही चित्रण (CCTV), तांत्रिक व डिजिटल पुरावे (Technical and digital evidence) , गुन्ह्यात वापरलेल्या वस्तू आदींचा समावेश आहे. पहिल्या गुन्ह्यात १७ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले होते. पहिल्या गुन्ह्यात दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान आणि मतिन पटेल यांच्याविरुद्ध दीड हजार पानांचे दोषारोपपत्र नाशिकरोड येथील अतिरिक्त सत्र व विशेष न्यायालयात यापूर्वीच दाखल करण्यात आले आहे.

दाखल गुन्ह्यांच्या तपासात प्राप्त झालेल्या साक्षी पुराव्यांवरून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले असले तरी या गुन्ह्यांचा तपास सुरूच राहणार आहे. अधिकचे पुरावे प्राप्त करून न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्रही दाखल करण्यात येणार आहे. या सर्व गुन्ह्यातील संशयितांचे जामीन न्यायालयाने फेटाळले आहेत. दरम्यान, नाशिकचे बहुचर्चित असे  TCS प्रकरण (Nashik TCS case) आता पुढे काय वळण घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >