Tuesday, May 26, 2026

संत नामदेव

संत नामदेव

बाप कवणाचा माय कवणाची बाप कवणाचा माय कवणाची । सोयरी धायरी तेही कवणाची ॥ द्रव्य संपत्ती देखती तंवचि मानिती । सरलिया कवणावे कवण म्हणती ॥ स्तनपान देउनीया वाढवी माउली । तेही अंतकाळी वेगळी ठेवी ॥ नामा म्हणे पाप पुण्य हे संगाती । येर अवघी भ्रांती अरे मना ॥

लौकिक संसारातील नाती वरवरची असतात. सोयरी-धायरी, सगेसोयरे हे फक्त सुखाच्या काळी आपल्याबरोबर असतात. कठीण वा संकटाच्या समयी कोणीही आपल्याबरोबर नसतो. शिशिर ऋतूत पाखरे झाडांना सोडून जातात, तसेच दुःखाच्या काळात सगेसोयरे, आप्त आपल्यापासून दूर असतात. या अभंगात संत नामदेव म्हणतात, "हे मना, हा बाप आणि आईदेखील आपली नाही. सोयरी-धायरी मंडळीही आपली नाहीत. जोपर्यंत आपल्याजवळ पैसा आहे, तोपर्यंतच ही मंडळी आपल्याला मान देतात. आपण मेल्यावर ओळखदेखील विसरतात. ज्या माउलीने आपल्याला स्तनपान देऊन मोठे केले ती आईसुद्धा अंतकाळी दूर होते. केवळ आपल्या पापपुण्याची शिदोरीच आपल्या बरोबर असते. अन्य साऱ्या गोष्टी खोट्या आहेत असे मानावे." संतांना मानवी संसाराच्या क्षणभंगुर स्वरूपाची जाणीव असते. ते समाजाचे हितचिंतक आणि मार्गदर्शक असतात. म्हणूनच ते लोकांना जागृत करून वारंवार कृत्रिम वा वरवरच्या नात्यांपासून सावध राहावे असा इशारा करीत असतात. संकटात वा अडचणीच्या प्रसंगी कोणीही आप्त साथ देत नाही. माणसाला साथ करते ती त्याची नियती. ही नियती आपल्या चांगल्या कर्मांमधून निर्माण झालेली असते. संसाराच्या क्षणभंगुर स्वरूपाविषयी अनेक संतांनी लिहिले आहे. संत तुकाराम म्हणतात, क्षणभंगुर नाही भरवसा । व्हा रे सावध तोडा माया आशा॥ संत कबीर म्हणतात, कबिरा गर्व न कीजियै, उँचा देख अवास। काल्ह परै भुं लेटना, ऊपर जमसी घास॥ हे जग क्षणभंगुर आहे. अभिमान बाळगावा अशी बाब जगात नाही. माणूस मोठ्या इमारती बांधतो आणि गर्वाने सांगतो की बघा मी केवढी मोठी इमारत बांधली आहे. पण हा गर्व फार काळ टिकत नाही.
Comments
Add Comment