Saturday, May 23, 2026

Dhule Crime : लेकाची वाट पाहत वृद्ध आई अंगणात बसली, हैवान लेकानं वृद्ध आईलाच पेटवलं, हत्येचे धक्कादायक कारण समोर

Dhule Crime : लेकाची वाट पाहत वृद्ध आई अंगणात बसली, हैवान लेकानं वृद्ध आईलाच पेटवलं, हत्येचे धक्कादायक कारण समोर

Dhule Crime News : गेल्या काही वर्षात विविध कारणास्तव मुलांची लग्न जमत नसल्याची भीषण समस्या उभी राहिलेली आहे. यामुळे कुठे मोर्चे निघत आहे तर कुठे मुलांनी जीवनयात्रा संपवल्याच्या घटना घडल्या आहेत. धुळे तालुक्यात देखील लग्न जमत नसल्याचा राग मुलाने स्वतःच्या आईवर काढत तिला थेट पेटवून दिल्याची घटना घडली आहे. गंभीर भाजल्याने जिजाबाई भटू खैरनार – पाटील (६५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी मृत जिजाबाई भटू खैरनार यांच्या ४५ वर्षीय प्रदीप उर्फ दगडू भटू खैरनार-पाटील याला ताब्यात घेतले आहे. संशयित प्रदीप उर्फ दगडू भटू खैरनार-पाटील हा रिक्षाचालक आहे. माहितीनुसार, जिजाबाई खैरनार या आपल्या मुलगा प्रदीपचा विवाह लावून देत नसल्याचा संशय प्रदीपच्या मनात होता. याच कारणामुळे त्याच्या मनात आईविषयी तीव्र संताप निर्माण झाला आणि त्याने थेट आपल्या आईलाच संपवलं. ही धक्कादायक घटना महिंदळे (ता. धुळे) याठिकाणी घडली आहे.

घटनेच्या दिवशी काय घडलं ?

शुक्रवारी रात्री जिजाबाई खैरनार या आपल्या लेकाची प्रदीपची वाट पाहत घराच्या अंगणात बसल्या होत्या. मध्यरात्री सुमारे दीड वाजेच्या सुमारास प्रदीप मद्यधुंद अवस्थेत घरी आला. “माझा विवाह का लावून देत नाही?” असा जाब विचारत त्याने आईशी वाद घातला. दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला की प्रदीपने थेट आई जिजाबाई खैरनार यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना पेटवून दिले. असा आरोप आहे. यात त्या गंभीर भाजल्या गेल्या आणि अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून, संशयित प्रदीप उर्फ दगडू खैरनार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास धुळे तालुका पोलीस करीत आहेत.

या घटनेमुळे महिंदळे गावासह परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आई-मुलाच्या नात्यालाच काळिमा फासणाऱ्या या घटनेबद्दल ग्रामस्थांकडून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. वृद्ध महिलेसोबत झालेल्या या अमानुष प्रकारामुळे गावकऱ्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे. दरम्यान, कौटुंबिक वाद, मानसिक तणाव आणि मद्याच्या व्यसनातून वाढणाऱ्या हिंसक घटनांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडून संशयिताची सखोल चौकशी सुरू असून, घटनेमागील नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास केला जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा