Wednesday, May 20, 2026

Mumbai Rain : उकाड्याने हैराण मुंबईकरांना दिलासा; मुंबईत ५ जूनपूर्वीच पावसाचे आगमन होण्याची शक्यता!

Mumbai Rain : उकाड्याने हैराण मुंबईकरांना दिलासा; मुंबईत ५ जूनपूर्वीच पावसाचे आगमन होण्याची शक्यता!

मुंबई : मुंबईकरांनो, आता छत्र्या आणि रेनकोट तयार ठेवा! प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मुंबईत आता वरुणराजाच्या आगमनाची चाहूल लागली असून येत्या शुक्रवारपासून मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. वाढलेला उकाडा, दमट हवामान आणि प्रखर उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले होते. अशातच आता हवामान विभागाच्या अंदाजामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, शुक्रवारपासून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या भागात मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात होऊ शकते.

दरम्यान, दक्षिण कोकणात गेल्या ४८ ते ७२ तासांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. हा पावसाचा पट्टा आता हळूहळू उत्तर कोकणाच्या दिशेने सरकत असून आठवड्याच्या अखेरीस तो मुंबईत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईतील वातावरणात मोठा बदल जाणवू शकतो.

हवामान विभागाने यंदा मान्सून वेळेपूर्वी दाखल होण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. केरळमध्ये यंदा २६ मेपर्यंत मान्सून पोहोचू शकतो, जो नेहमीच्या १ जूनच्या तारखेपेक्षा जवळपास आठवडाभर आधी आहे. जर मान्सूनचा प्रवास याच वेगाने सुरू राहिला, तर महाराष्ट्रात २ जूनपर्यंत आणि मुंबईत ५ जूनच्या आसपास मान्सूनचे अधिकृत आगमन होऊ शकते. विशेष म्हणजे, मुंबईत मान्सून दाखल होण्याची सर्वसाधारण तारीख ११ जून मानली जाते. त्यामुळे यंदा मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता अधिक बळावली आहे.

गेल्या काही वर्षांतील मान्सूनच्या आगमनाच्या तारखांवर नजर टाकली, तर मोठी तफावत दिसून येते. २०२४ मध्ये मुंबईत २६ मे रोजी मान्सूनचे विक्रमी लवकर आगमन झाले होते. गेल्या ७५ वर्षांतील हे सर्वात लवकर आगमन मानले गेले. तर २०२३ मध्ये बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मान्सून तब्बल २५ जूनला मुंबईत पोहोचला होता, जे सर्वात उशिरा झालेले आगमन ठरले. त्याआधी २०२२ मध्ये ११ जून, २०२१ मध्ये ९ जून आणि २०२० मध्ये १४ जून रोजी मान्सून मुंबईत दाखल झाला होता.

यंदा मात्र मान्सून वेळेच्या आधीच येण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने शेतकऱ्यांपासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांचेच लक्ष आता हवामान विभागाच्या पुढील अंदाजाकडे लागले आहे. दरम्यान, शुक्रवारपासून पावसाच्या सरी सुरू होण्याची शक्यता असल्याने मुंबईकरांनी घराबाहेर पडताना छत्री आणि रेनकोट सोबत ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.

Comments
Add Comment