Tuesday, May 5, 2026

ICC T20 Ranking : आयसीसीच्या वार्षिक टी २०क्रमवारीत भारताचे अव्वल स्थान कायम

ICC T20 Ranking : आयसीसीच्या वार्षिक टी २०क्रमवारीत भारताचे अव्वल स्थान कायम

मुंबई : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे जेतेपद राखणारा भारतीय संघ, हा जगातील पहिलाच संघ ठरला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला आणि सलग दुसरा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप नावावर केला. त्यानंतर भारतीय खेळाडू आयपीएलमध्ये व्यग्र आहेत आणि अशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मोठी घोषणा केली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या वार्षिक ट्वेंटी-२० क्रमवारीत भारतीय संघाने अव्वल स्थान कायम राखले आहे. मे २०२५ नंतर खेळलेल्या सर्व सामन्यांमधून १०० टक्के गुण व त्याआधीच्या दोन वर्षांत खेळलेल्या सामन्यांचे ५० टक्के गुण असे मिळून भारतीय संघ अव्वल स्थानी कायम आहे.

भारतीय संघाकडे २७५ गुण असून इंग्लंड (२६२) दुसऱ्या क्रमांकावर आहे, परंतु त्यांनी एक गुण जास्तीचा खात्यात घालून आगेकूच केली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाने मोठी झेप घेताना २५८ गुणांसह तिसरे स्थान पटकावले आहे. गेल्या दोन वर्षांपासून या फॉरमॅटवर वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीय संघासाठी ही बातमी फारशी आश्चर्यकारक नाही. त्यांनी २०२४ आणि २०२६ मध्ये पुरुषांचे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकले असून, या दोन स्पर्धांदरम्यान झालेल्या सर्व ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय मालिकांमध्ये ते अपराजित राहिले आहेत.

पुरुषांच्या क्रमवारीत अव्वल सात स्थानांवर कोणताही बदल झालेला नाही. ऑस्ट्रेलियानंतर न्यूझीलंड (२४७ गुण), दक्षिण आफ्रिका (२४४ गुण), पाकिस्तान (२४०) आणि वेस्ट इंडिज (२३३) यांचा क्रमांक लागतो. श्रीलंकेच्या रेटिंगमध्ये सहा गुणांची घट झाल्याने ते नवव्या स्थानावर घसरले आहेत, तर बांगलादेशने (२२५ गुण) आठव्या स्थानावर झेप घेतली आहे. अफगाणिस्तान २२० गुणांसह १०व्या स्थानावर असून श्रीलंकेपासून केवळ एक गुण दूर आहे. झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांनीही अनुक्रमे ११व्या आणि १२व्या स्थानावर आपले स्थान कायम राखले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा