माेरपीस : पूजा काळे
ल्या ऋतूच्या बहरापूर्वी, पानगळीला ऊत येतो. कात टाकूनी नवं रुजवाया, खुणा दावित निसर्ग जातो. वर्षभर सहा ऋतूंचे सहा आगळेवेगळे सोहळे पाहतचं आपण लहानाचे मोठे होतो. यातल्या प्रत्येक मनभावन ऋतूचा साज लाजवाब असतो, तर बाज त्याहून अनोखा असतो. डोळे उघडे ठेवून निसर्गाची किमया पाहता आली, तर आमच्यासारखे भाग्यवान आम्हीचं! निसर्ग आणि मानवी मनाचं नातं चिरकाल असतं तेव्हा डोळ्यांनी पाहिलेला स्वर्ग चित्रकाराच्या कुंचल्यातून उमटतो. कवी मनात हळव्या कवितांची पेरणी करतो. संगीताच्या तालावर निसर्गाचा सूर हेरतो. कवी मन हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं असतं. कवितेच्या कुठल्याही प्रकाराला स्थलकालाची मर्यादा नसल्याने मनाशी निगडित कवितांची समग्र शाळाचं कवी भरवू शकतो. निसर्गगानासारखे विषय कवीला आवडत असल्याने साहित्यातून ते मांडले जातात. निसर्ग प्रेमातून मनात साचलेला गर्भित अर्थ निसर्गाशी जोडला जातो आणि कविता जन्माला येतात. काही लिहिण्यापूर्वी निसर्गकवी इंदिरा संत यांची कविता आपण पाहू.
आला शिशिर संपत पानगळती सरली, ऋतुराजाची चाहूल झाडावेलींना लागली. देवचाफा हा पाहा ना अंगोपांगी बहरला, मोगराही कोवळ्याशा पाने सजाया लागला. डोळे खिळविती माझे जास्वंदीची लाल फुले, बहाव्याने येथे तेथे सोनतोरण बांधिले. कुहू गाऊन कोकिळा करी वसंत स्वागत, तिलाही मी विनविते शिकव ना मला गीत.
मनात साठलेला अतिरिक्त महत्त्वाचा संदेश देताना कवयित्री म्हणते, शिशिर संपून ऋतुराज वसंत यावा तशी मनोवस्था झाली आहे. मनाच्या नैराश्यग्रस्त काळात वसंताच्या आगमनाकरिता निसर्गातील रंगीत फुलझाडं बहरली आहेत की, माझ्या जीवनीसुद्धा अशी रुजवात पेटणार आहे. हे कोकिळे तुझ्यासारखे भारलेले चैतन्य घेऊन काळाच्या सोबतीने चालायचंय, त्यासाठी मला तुझे गीत शिकव. कविता संपताच कवयित्रीचा ध्यास संपतो. मानवी मनाचे सारथ्य करणाऱ्या कविता म्हणजे हृदय फाडून दाखवलेली निसर्गाची विविध रूपं. डोळ्यातला निसर्ग प्रत्येकी वेगळा असू शकल्याने पानगळीचा शिशिर मला भकास वाटतो. थंडी अंग टाकते. गुलाबी गारवा हवेतल्या हवेत विरताच हवा पालटते. चैत्रापूर्वीचं वृक्षसंपदा निष्पर्ण होऊ लागते. हिरवेपणाचे रंग भुर्रकन उडून जावे तशी हिरवळीची वनराई निस्तेज होते. पानगळीस येता आसमंती शुष्कता वासंतिक आगमनाने मनास येते प्रसन्नता. निसर्गाचा हिरवा मांडव रूसून बसता मोगरा, गुलाब बहरू लागतो. पळस, गुलमोहर लाल-भगव्यासंगे श्रृंगारिक रंगपंचमी खेळायला झाडावर विसावतात. पिवळा बहावा हळदुल्या अंगाची नवपरिणीता होताचं मुग्धकलिका उनाड समीरासवे बागडू लागतात. राघू मैनेच्या जोडीची कुजबुज, पक्ष्यांचा कलरव कानी पडताच अगम्य शांततेने परिसर न्हाऊन निघतो. चहूबाजूस निसर्गाची नवलाई, वसुंधरेची हिरवाई पाहता आपण दंग होतो. आम्रतरूच्या सुगंधित मोहोरावर मोहर उठवणारे कोकिळाचे मंजूळ स्वर.
पानोपानी पळस फुलतो, आंबा मोहरतो त्यासमयी नवचैतन्याने जीवन फुलवणारा ऋतू वसंतदूत होऊन येतो. पानगळीनंतर पिवळी जर्द मोहरी फुलताना वासंतिक कळी मोगरा खुलतो. सृजन घडताना खोडाजवळच नुकताचं फुटलेला कोवळा अंकुर शक्तिप्रदर्शन करतो. झुळझुळणाऱ्या चैत्रबनातील वाऱ्याची दिशा बदलते. अवनीला कवेत घेण्यासाठी वसंत सरसावतो. रानोमाळी भटकू लागतो. उत्क्रांतीत नवजीवनाची बियाणं पेरली जातात. उगवता सूर्य आणि आपल्यातले नाते पक्के होते. सोनचाफा, अनंत, मोगऱ्यासारखी सुवासिक अत्तर निसर्ग बहाल करतो. "बहरण्याचा ऋतू वसंत आपलासा वाटे सर्वांना पहावी छोटी पानं मोठाली हिरवी होत जाताना." पालवी फुटता वेलीत वसे रम्य वनराई, खुणावित जाते मज वासंतिक आमराई.
वसंत ऋतूचे पृथ्वीवर झालेले आगमन म्हणजे सजूनधजून आलेली नवी नवेली नवरी त्याच्या येण्याने पानं, फुलं, पक्ष्यांनी सजलेली अवनीमाता प्रफुल्लित होते. कुसुमांच्या वैभवाला बहर येतो. प्रेमवेड्यांसाठी ये वादिया ये फीजाए बुला रही है तुम्हेची पर्वणी असते. मधुमास वसंत ऋतू नानाविध रंगांची उधळण करीत येतो. वेगवेगळ्या गंधाची, आकाराची कुसुमे लेऊन अवनी सजते. वृक्षवेलींचे पानगळतीचे दिन मधुमास येण्याने विरून जातात. सृष्टी मनोमनी बोलते पानगळीनंतर आलेली मरगळ लवकरच जाईल. नवपर्णीने माझं आयुष्य पुन्हा सुखासीन होईल. बघता बघता तांबड्या मातीवर हिरवळ पसरते. कोवळ्या पालवीचे लुसलुशीत तारुण्य नयनांत भरताना लाल, हिरव्या, पिवळ्या, निळ्या, जांभळ्या, भगव्या, पांढऱ्या रंगाचा संबंध आपल्याशी येतो. मानाची पानं आपल्यासमोर मांडली जातात. त्यातलं जे पान आपणास आवडेल तो ऋतू आपला होत जातो आणि मनपटलावर गुणगुणत ओळी येतात धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना शब्दरूप आले मुक्या भावनांना तृप्तीने नयन पाणावतात. हिरव्याकंच पालवीला पाहून मोद होतो. इवल्याशा कळ्या वृक्ष वेलींवर जन्म घेऊ लागतात. निसर्गसौंदर्य दृष्य पाहतांना कविवर्य ग. दि. माडगूळकर यांच्या कवितेच्या ओळी आठवतात रुसू नको कलिके बाई, हस ना, उमल गडे, कर घाई. वसंत ऋतू पाहा जादूगार हा आला, नितांत रम्य साज साजरा ल्याला, बहरु दे नवतीची नवलाई नवतीची नवलाई सांगणारा वसंतोत्सव म्हणजे सुंदर, चैतन्यमय सांजवेळ, धुंद चांदणरात्री, सुगंधित वारा, भृंग्यांचे फुलाभोवती गुंजारव. जणू दिशा दिशांतून प्रेमरसाचा उन्माद वाढवणारे वासंतिक वातावरण.
वसंत ऋतू म्हणजे आशावाद. पिवळी पानं गळून हिरवी पानं येतात. बदलणं या नियमाचं पालन होत तेव्हा निसर्ग काही धरून ठेवत नाही. जे आलं ते जाणार या स्थायीभावाप्रमाणे पानगळीसारखी संकट येतात नि विरून जातात. झाडांना पालवी फुटते. क्षृंगारण्यासाठी कळ्या फुलं येतात. आनंद प्रेम देऊन जातात. पानगळ म्हणजे निराशेवर आशेचा किरण. आलेल्या कडू गोड अनुभवाचा सकारात्मक उत्सव. जुन्या वाटेवर चालताना नव्याचं स्वागत करायचं. आशावादाचा स्नेह जपायचा आणि आपल्यासह इतरांचं जीवन सुकर करायचं. त्यासाठी त्यांच्यासमोर अमृताचा पेला धरावा न् जीवनात वसंत फुलवावा.






