गेल्या काही महिन्यांमध्ये ओरॅकल, ॲमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये झालेल्या कर्मचारीकपातीच्या बातम्यांनी जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. मात्र, या घडामोडींकडे केवळ उद्योगाची घसरण म्हणून पाहणे चुकीचे ठरेल. उलट, हे बदल आयटी उद्योगातील एका मोठ्या संक्रमणाचे आणि परिवर्तनाचे संकेत आहेत. या परिवर्तनात अनेक नव्या संधी दडल्या आहेत.
आजच्या काळात जग झपाट्याने बदलत आहे. तंत्रज्ञान, शिक्षण, करिअरच्या संधी आणि जीवनशैली या सर्व गोष्टींमध्ये मोठे परिवर्तन होत आहे. जग अशा एका टप्प्यावर उभे आहे, जिथे तंत्रज्ञान अभूतपूर्व वेगाने बदलत आहे. जागतिक माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा चेहरा-मोहरा पूर्णपणे बदलून गेला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये ओरॅकल, ॲमेझॉन आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये झालेल्या कर्मचारी कपातीच्या (ले-ऑफ) बातम्यांनी जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या घडामोडींकडे केवळ उद्योगाची घसरण म्हणून पाहणे चुकीचे ठरेल. उलट, हे बदल आयटी उद्योगातील एका मोठ्या संक्रमणाचे आणि परिवर्तनाचे संकेत आहेत. एखादी मोठी कंपनी कर्मचारी कपात करते, तेव्हा सामान्यतः मंदीची भीती व्यक्त केली जाते. पण सध्याचे ले-ऑफ हे मंदीपेक्षा ‘बदलत्या प्राधान्यक्रमामुळे’ अधिक आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ऑटोमेशन (स्वयंचलन) आणि क्लाउड कॉम्प्युटग यांसारख्या तंत्रज्ञानांमुळे कामाचे स्वरूप बदलत आहे. पूर्वी दहा लोकांची गरज असणारी कामे आता प्रगत सॉफ्टवेअरच्या मदतीने कमी वेळेत आणि अचूकपणे होऊ लागली आहेत. याचा अर्थ असा की, पारंपरिक कौशल्ये असलेल्या कर्मचाऱ्यांची गरज कमी होत असून नवीन तंत्रज्ञान अवगत असलेल्या लोकांची मागणी वाढत आहे.
भारतीय आयटी क्षेत्र हे जगाचे पॉवरहाऊस म्हणून ओळखले जाते. या क्षेत्रात अनुभवायला मिळत असलेल्या ताज्या बदलांमुळे भारतीय आयटी उद्योग आकुंचन पावेल, अशी अनेकांना भीती वाटते; परंतु वास्तव याच्या उलट आहे. भारतीय आयटी क्षेत्र कमी होत नसून संक्रमित होत आहे. सायबर सिक्युरिटी, डेटा ॲनालिटिक्स, मशीन लर्निंग आणि रोबोटिक्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. या क्षेत्रांसाठी केवळ पदवी पुरेशी नसून विशिष्ट कौशल्ये, विश्लेषणात्मक विचार आणि सतत शिकण्याची तयारी असणे आवश्यक आहे. स्वतःला या बदलांनुसार जुळवून घेणाऱ्या व्यावसायिकांसाठी भविष्यात संधींचे आकाश खुले आहे. त्यानुसार त्यांना परिस्थितीची जाणीव व्हायला हवी. भारतातील पुणे, बंगळूरु आणि हैदराबादसारखी शहरे आता जागतिक स्तरावर ‘इनोव्हेशन हब’ म्हणून नावारूपाला येत आहेत. विशेषतः पुण्यात ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स’ (जीसीसी) मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पूर्वी ही केंद्रे केवळ बॅक-ऑफिस कामांसाठी वापरली जात होती, पण आता ती जागतिक कंपन्यांची धोरणात्मक संशोधन आणि विकास केंद्रे बनली आहेत. याचा अर्थ असा की, भारतीय प्रतिभा आता मायदेशात राहूनच जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानावर काम करत आहेत. ही केंद्रे केवळ सेवा देणारी नसून जागतिक स्तरावर नावीन्यपूर्ण शोध लावणारी केंद्रे बनली आहेत.
या बदलाच्या काळात आयटी विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी असलेला एक महत्त्वाचा संदेश म्हणजे अनुकूलता हीच यशाची गुरुकिल्ली आहे. पूर्वी एकदा पदवी घेतली की, आयुष्यभर त्या जोरावर नोकरी करता येत असे, पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही. तंत्रज्ञान इतक्या वेगाने बदलत आहे की, दर दोन-तीन वर्षांनी तुम्हाला नवीन काही तरी शिकावेच लागेल. सतत शिकणे, नवीन कौशल्ये आत्मसात करणे आणि तांत्रिक प्रगतीशी अपडेट राहणे, हे आता करिअरमधील यशाचे मूलभूत मंत्र बनले आहेत. ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म्स, इंडस्ट्री सर्टिफिकेशन आणि प्रत्यक्ष प्रकल्पांवरील कामाचा अनुभव आता नोकरीच्या बाजारपेठेत तुमची किंमत ठरवत आहेत. ती ओळखून आपल्या कौशल्यांमध्ये बदल करत राहणे गरजेचे आहे, हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या नव्या पिढीला कळणे आवश्यक आहे. यापुढील काळात फक्त विद्यार्थ्यांनीच बदलून चालणार नाही, तर आपल्या शैक्षणिक संस्थांनाही काळानुसार बदलावे लागेल. उद्योगक्षेत्रातील तज्ज्ञ आणि धोरणकर्ते यांनी एकत्र येऊन ‘कौशल्य दरी’ भरून काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज करणारे अभ्यासक्रम तयार केले पाहिजेत. कल्पकता वाढवणे, उद्योजकता जोपासणे आणि डिजिटल साक्षरतेमध्ये गुंतवणूक करणे यामुळेच भारताची जागतिक स्पर्धात्मकता टिकून राहील.
प्रत्येक क्षेत्रात वेगाने वाढत असलेली कृत्रिम बुद्धिमत्ता नोकऱ्या हिरावून घेईल, अशी भीती अनेकांना वाटते. पण इतिहास साक्षी आहे की, जेव्हा जेव्हा नवीन तंत्रज्ञान आले, तेव्हा सुरुवातीला काही नोकऱ्या गेल्या; पण त्यापेक्षा कैक पटींनी नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या. संगणक आले तेव्हाही अशीच भीती होती, पण संगणकामुळे आज आयटी क्षेत्रात लाखो लोकांना रोजगार मिळाला आहे. एआय हे मानवाचे रिप्लेसमेंट नसून मानवाची क्षमता वाढवणारे एक साधन आहे. एआयचा प्रभावी वापर करायला शिकतील तेच भविष्यातील कामाच्या ठिकाणी सर्वात मौल्यवान असतील. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व आणखी वाढणार, हे निश्चित आहे. महाराष्ट्रात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. नवी संशोधन केंद्रे, नवउद्योग आणि शैक्षणिक संस्था या विषयावर भर देत आहेत. त्यांना अपेक्षित मनुष्यबळ आणि अस्तित्वात असणाऱ्या कार्यपद्धतीतील बदल लक्षात घेऊन आपल्या कामात बदल करणारे काळाची कसोटी पार करतील, तसेच बदलणाऱ्या अपेक्षांची पूर्तताही करतील. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्र या क्षेत्रात आघाडीवर राहील, अशी अपेक्षा आहे.
नव्या युगात टिकून राहण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जिज्ञासू वृत्ती. नेहमी प्रश्न विचारा आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक राहा. या युगात तांत्रिक कौशल्ये आवश्यक आहेतच, पण त्याचबरोबर ‘सॉफ्ट स्किल्स’ ही तेवढीच महत्त्वाची आहेत. संवादकौशल्य, नेतृत्व आणि सांघिक कार्य या बाबी मशीन करू शकत नाहीत. त्यामुळे या कौशल्यांचे महत्त्व कधीच कमी होणार नाही. नवनवीन तंत्रज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करताना प्रत्येकाने बदलांचा धैर्याने स्वीकार करायला हवा. ले-ऑफ किंवा बदलांना न घाबरता संधी म्हणून पाहायला हवे.
थोडक्यात सांगायचे तर, आयटी क्षेत्राचा हा काळ नवनिर्माणाचा आहे. जुन्या पद्धती नष्ट होत आहेत आणि नव्या अधिक कार्यक्षम पद्धती जन्म घेत आहेत. बदल स्वीकारतील, स्वतःची कौशल्ये अद्ययावत करतील आणि तंत्रज्ञानाच्या प्रवाहाविरुद्ध न जाता त्या प्रवाहाचा भाग बनतील, अशा लोकांचे भविष्य उज्ज्वल आहे. भारत केवळ या बदलाचा साक्षीदार नसेल, तर या जागतिक डिजिटल क्रांतीचे नेतृत्व करेल. आपल्याला केवळ पदवीधर व्हायचे नाही, तर ‘कौशल्यवान’ आणि ‘डिजिटल साक्षर’ व्हायचे आहे. ले-ऑफच्या या वावटळीत ज्ञानाचा आणि कल्पकतेचा पाया मजबूत असलेल्यांची नौका नक्कीच सुरक्षित किनाऱ्याला लागेल. शेवटी, हे लक्षात ठेवले पाहिजे की तंत्रज्ञान माणसाला पर्याय ठरू शकत नाही, तर ते माणसाला अधिक सक्षम करते. ले-ऑफची भीती बाळगण्यापेक्षा आपण आपल्या ज्ञानाची ‘बॅटरी’ सतत चार्ज ठेवली पाहिजे. ही वेळ थांबण्याची नाही, तर अधिक वेगाने धावण्याची आहे. बदल स्वीकारण्याचे धाडस आणि सतत शिकण्याची तहान असलेल्यांसाठी हे ‘एआय’ आणि ‘क्लाउड’चे युग सुवर्णकाळ ठरेल. केवळ कपात नाही, तर बदलपरिवर्तन हाच निसर्गाचा नियम आहे आणि या परिवर्तनाशी जुळवून घेणाराच उद्याचा विजेता असेल. त्यामुळे नव्या युगाचे स्वागत करून तंत्रज्ञानाच्या अथांग महासागरात यशाची नवी नौका वल्हवू या.






