Wednesday, April 29, 2026

Pratap Sarnaik : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांना १६ ऑगस्टची डेडलाईन

Pratap Sarnaik : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांना १६ ऑगस्टची डेडलाईन

 १ मे ते १५ ऑगस्टपर्यंत शिक्षण घेता येणार; मराठी मार्गदर्शन पुस्तिका प्रकाशित

मुंबई : परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी सक्तीबाबत १६ ऑगस्टची डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे. १ मे ते १५ ऑगस्ट या कालावधीत अ-मराठी भाषिकांना मराठी शिकता यावे, यासाठी परिवहन विभागाने विशेष ‘मराठी मार्गदर्शन पुस्तिका’ प्रकाशित केली असून, या मोहिमेनंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, शशांक राव, संजय निरुपम आणि हाजी शराफत शेख यांच्यासह विविध संघटनांनी हिंदी भाषिक चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदत देण्याची मागणी केली होती. ही मागणी मान्य करत सरकारने १५ ऑगस्टपर्यंत चालकांना सवलत दिली आहे. मात्र, या कालावधीत आपल्या कार्यालयांमध्ये किंवा हॉल भाड्याने घेऊन चालकांना मराठी शिकवण्याची जबाबदारी आता संबंधित संघटनांची असेल.

परिवहन विभागाने आखलेल्या वेळापत्रकानुसार, १ मे ते १५ ऑगस्ट या काळात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून कोणताही दंड आकारला जाणार नाही. या काळात आरटीओ अधिकारी केवळ चालकांकडे वैध कागदपत्रे आहेत की नाही, याचीच तपासणी करतील. मात्र, १६ ऑगस्टनंतर होणाऱ्या तपासणीत ज्या चालकांना किमान मराठीचे ज्ञान नसल्याचे आढळेल, त्यांच्यावर आरटीओकडून नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल. ही पुस्तिका मोबाईलवरही उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यावरील बारकोड स्कॅन केल्यास चालकांना ऑडिओ स्वरूपातही मराठीचे धडे गिरवता येतील, असे सरनाईक यांनी सांगितले.

४८ तासात मराठी शिकणे शक्य

मराठी भाषा अतिशय प्रेमळ असून केवळ ४८ तासांत ती शिकता येते, असे सांगत सरनाईक यांनी मराठी प्रवाशांनाही एक भावनिक साकडे घातले आहे. रिक्षा किंवा टॅक्सीत बसल्यानंतर समोरचा चालक कोणीही असो, त्याच्याशी मराठीतच संवाद साधावा, असे आवाहन त्यांनी केले. जेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणूस अशी भूमिका घेईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने या मोहिमेला यश मिळेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा