Tuesday, April 28, 2026

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात वाढत्या हिप्पोंच्या (पाणघोडे) संख्येमुळे निर्माण झालेल्या समस्येवर सरकारने कठोर पाऊल उचलत ८० हिप्पोंना ठार करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, या निर्णयावर अनंत यांनी मानवतावादी पर्याय सुचवला असून, त्या हिप्पोंना 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती केली आहे.

कोलंबियातील मॅग्डालेना नदी खोऱ्यात हिप्पोंची संख्या झपाट्याने वाढत आहे. या भागात सध्या सुमारे २०० हिप्पोंचे वास्तव्य आहे. या भागात नैसर्गिक भक्षक नसल्याने हिप्पोंची संख्या नियंत्रणाबाहेर गेली असून, यामुळे स्थानिक जैवविविधता आणि मानवी सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. यामुळेच आता सरकारने सुमारे ८० हिप्पोंना मारण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, अनंत अंबानी यांनी या निर्णयाबाबत चिंता व्यक्त करत कोलंबिया सरकारला पर्यायी उपाय सुचवला आहे. अनंत यांनी कोलंबिया सरकारला प्रस्ताव दिला आहे की, या हिप्पोंना सुरक्षित आणि वैज्ञानिक पद्धतीने भारतात आणून त्यांचे ‘वनतारा’मध्ये पुनर्वसन करावे. नैसर्गिक अधिवास, तज्ज्ञांकडून वैद्यकीय देखभाल आणि दीर्घकालीन संरक्षण यामुळे या प्राण्यांचा जीव वाचेल. अंबानी यांनी कोलंबियाच्या पर्यावरण मंत्री इरेने वेल्झ टोरेस यांना पत्र लिहून या योजनेचा विचार करण्याची विनंती केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, संपूर्ण प्रक्रिया अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली होईल आणि भारत व आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन केले जाईल.

मानवी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज

अंबानी यांच्या मते, हे हिप्पो बदलत्या परिस्थितीचे परिणाम आहेत. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी जबाबदारीने पुढे येणे आवश्यक आहे. योग्य व्यवस्थापन आणि वैज्ञानिक नियोजनाद्वारे मानव आणि वन्यजीव यांच्यात संतुलन साधता येऊ शकते.

वनताराची तयारी पूर्ण

‘वनतारा’ने या मोहिमेसाठी सविस्तर योजना तयार केली आहे. अनुभवी पशुवैद्यकीय टीम, सुरक्षित वाहतूक व्यवस्था, बायो-सिक्युरिटी प्रोटोकॉल आणि प्राण्यांसाठी अनुकूल अधिवास. तसेच, अंतिम निर्णय होईपर्यंत हिप्पोंना ठार मारण्याची प्रक्रिया थांबवण्याची विनंतीही करण्यात आली आहे. हा प्रस्ताव मान्य झाला, तर वन्यजीव संरक्षणासाठी एक नवे उदाहरण निर्माण होईल.

Comments
Add Comment