Friday, April 24, 2026

समावेशकतेचा गैरअर्थ

समावेशकतेचा गैरअर्थ

पूर्वी ग्राहक केवळ वस्तूचा दर्जा पाहून खरेदी करत असे. मात्र, आताचा ग्राहक 'जागरूक' आणि 'वैचारिक' आहे. तो केवळ चष्मा किंवा दागिना विकत घेत नाही, तर त्या ब्रँडच्या विचारसरणीशीही स्वतःला जोडून घेतो. आजचा ग्राहक स्वतःच्या सांस्कृतिक मूल्यांशी तडजोड करण्यास तयार नाही.

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि या विविधतेचा पाया हिंदू समाजाच्या सहिष्णुता व सर्वसमावेशकतेत आहे. बहुसंख्य हिंदू समाज सहिष्णू व सर्वसमावेशक आहे. ही सर्वसमावेशकता इथल्या मातीत, विचारात आणि संस्कृतीत रुजलेली आहे. इतकी परकीय आक्रमणे झाली, अनेक जाती - धर्माचे लोक इथे आले, त्या सगळ्यांना इथे सामावून घेतले. पारसी, ख्रिश्चन, अगदी मुस्लीम आदी सगळ्यांना सामावून घेतले आहे. त्यामुळेच भारतात विविधतेत एकता दिसून येते; मात्र सध्या अभिव्यक्तीच्या नावाखाली धार्मिक तुष्टीकरणाचा प्रयत्न होत असल्याचा आरोप 'लेन्सकार्ट'सारख्या घटनांमधून समोर येत आहे. कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. त्यामध्ये हिजाब, पगडी यांना परवानगी; मात्र टिकली, टिळा यांसारख्या हिंदू प्रतीकांवर निर्बंध असल्याचा दावा समोर आल्यानंतर समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. कंपनीने नंतर स्पष्टीकरण दिले असले, तरी तो मुद्दा थेट धार्मिक समानतेच्या भावनेशी जोडला गेला आहे. या वादविवादामुळे कंपनीच्या समभागांत मोठी घसरण पाहायला मिळाली. कंपनीचा शेअर सुमारे ५ टक्क्यांनी खाली आला. गुंतवणूकदारांच्या विश्वासार्हतेवर याचा नकारात्मक परिणाम झाला. विविध अहवालांनुसार, या वादामुळे कंपनीच्या बाजारमूल्यात मोठी घट झाली आहे. अवघ्या ५ दिवसांत कंपनीचे बाजार मूल्य हजारो कोटी रुपयांनी कमी झाले आहे. आर्थिक नुकसानीपेक्षाही कंपनीच्या सामाजिक प्रतिमेला बसलेला फटका अधिक मोठा आहे. प्रसारमाध्यमांमध्ये या विषयावर चर्चा झाली. संतापलेल्या ग्राहकांनी प्रत्यक्ष कृती करत खरेदी केलेले चष्मे तोडून निषेध व्यक्त केला. कंपनीच्या नवीन ऑर्डर मोठ्या प्रमाणात रद्द झाल्या.

सध्या चर्चेत असलेले 'लेन्सकार्ट' प्रकरण आणि 'तनिष्क' जाहिरात वाद - या दोन घटनांमध्ये काही वर्षांचे अंतर असले, तरी त्या दोन्हींच्या केंद्रस्थानी असलेला प्रश्न मात्र तोच आहे, तटस्थता आणि समानतेचा नेमका अर्थ काय? चार-पाच वर्षांपूर्वी घडलेली तनिष्कची घटना आणि आज समोर आलेले 'लेन्सकार्ट' प्रकरण या दोन्हींकडे एकत्रितपणे पाहिले, तर समाजातील बदलती मानसिकता आणि वाढती जागरूकता स्पष्टपणे दिसून येते. चार - पाच वर्षांपूर्वी, तनिष्कच्या जाहिरातीने मोठा वाद निर्माण निर्माण झाला होता. त्या जाहिरातीत आंतरधर्मीय विवाहाचे चित्रण होते. अनेकांनी या जाहिरातीचे स्वागत केले, कारण ती आधुनिक आणि प्रगतिशील विचार मांडणारी वाटत होती; मात्र, समाजातील एका मोठ्या वर्गाला जाहिरातीमधील सादरीकरणात एकतर्फीपणा जाणवला. त्यांच्या मते, अशा प्रकारच्या सादरीकरणातून विशिष्ट धार्मिक-सांस्कृतिक दृष्टिकोनाला अधिक महत्त्व दिले जात होते. समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यानंतर अखेर कंपनीला ती जाहिरात मागे घ्यावी लागली.

या घटनेनंतर काही काळ गेला, पण त्यातून निर्माण झालेले प्रश्न कायम राहिले. आता, वर्तमान काळात 'लेन्सकार्ट' प्रकरणाने तेच प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणले आहेत. कंपनीच्याअंतर्गत धोरणाने समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली. कंपनीने याबाबत स्पष्टीकरण दिले असले, तरी समाजातील प्रतिक्रिया तत्काळ उमटली. वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर लेन्सकार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीयूष बन्सल यांनी स्वतः भूमिका स्पष्ट केली. समाजमाध्यमांवर व्हायरल झालेला तो दस्तऐवज जुना असून, तो कंपनीच्या सध्याच्या अधिकृत धोरणाचे प्रतिनिधित्व करत नाही, असे त्यांनी नमूद केले. कंपनीमध्ये कोणत्याही धार्मिक चिन्हांच्या वापरावर बंदी नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी या प्रकरणाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. या वादानंतर कंपनीने तातडीने एक नवीन निवेदन प्रसिद्ध केले आहे. यात नमूद केले आहे की, कर्मचारी बिंदी, टिळक, सिंदूर, कडा, हिजाब आणि पगडी यांसारखी सर्व धार्मिक व सांस्कृतिक प्रतीके मुक्तपणे वापरू शकतात. भारत ही विविधतेने नटलेली भूमी असून, आम्ही या विविधतेचा आदर करतो; तिलाच आमची खरी ताकद मानतो मात्र तोपर्यंत कंपनीचे व्हायचे ते नुकसान झालेच.

'तनिष्क' आणि 'लेन्सकार्ट' या दोन घटनांमधील वेळेचा फरक महत्त्वाचा आहे. 'तनिष्क'च्या वेळी समाजमाध्यमे प्रभावी होती, पण आज ती अधिक व्यापक आणि प्रभावशाली झाली आहेत. माहितीचा प्रसार अधिक वेगाने होतो आणि त्यावर प्रतिक्रिया देखील तितक्याच जलद येतात. या दोन्ही घटनांमध्ये समान धागा असा आहे, की तटस्थतेच्या नावाखाली असमतोलाचा आभास निर्माण झाला, तर समाज त्याविरोधात प्रतिक्रिया देतो. लोकांची अपेक्षा सरळ आहे, जर सर्वसमावेशकता मांडायची असेल, तर ती सर्वांसाठी समान असली पाहिजे. कोणत्याही एका बाजूला झुकणारा दृष्टिकोन स्वीकारला जाणार नाही. कॉर्पोरेट क्षेत्रासाठी हा एक महत्त्वाचा धडा आहे. आज कंपन्या केवळ उत्पादने विकत नाहीत, तर त्या जाहिरातीमधून सामाजिक संदेशही देतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीकडे आणि शब्दांकडे बारकाईने पाहिले जाते. जाहिराती असोत की अंतर्गत धोरणे त्यामध्ये संतुलन, स्पष्टता आणि संवेदनशीलता राखणे अत्यंत आवश्यक आहे.

अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची धोरणे ही पाश्चिमात्य 'कार्यसंस्कृती'वर आधारित असतात. पाश्चिमात्य देशांत धार्मिक प्रतीके कामाच्या ठिकाणी न वापरणे हे 'तटस्थता' मानले जाते. मात्र, भारतीय संस्कृतीत धार्मिक प्रतीके हे केवळ धर्म दर्शवत नाहीत, तर ते व्यक्तीच्या ओळखीचा अविभाज्य भाग आहेत. भारतीय कंपन्यांनी पाश्चिमात्य धोरणांची आंधळी नक्कल करणे थांबवून, भारतीय मातीतील सहिष्णुता आणि विविधतेचे मॉडेल स्वीकारणे गरजेचे आहे. कॉर्पोरेट जगताने 'तटस्थते'च्या नावाखाली धार्मिक प्रतीकांना संकुचित चौकटीत न बसवता त्याकडे मानवी हक्क आणि सांस्कृतिक वारसा म्हणून पाहिले पाहिजे. हा वाद केवळ 'लेन्सकार्ट'पुरता मर्यादित नसून, तो भविष्यातील 'ब्रँड-कन्झ्युमर' संबंधांची दिशा ठरवणारा आहे.

Comments
Add Comment