Wednesday, April 22, 2026

RR won : लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा चौकार, राजस्थान रॉयल्सची विजयासह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप

RR won : लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा चौकार, राजस्थान रॉयल्सची विजयासह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप

लखनौ : रिषभ पंतच्या लखनौ सुपर जायंट्सला सोपा सामनाही जिंकता आला नाही. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना गोलंदाजांनी सेट केला होता, परंतु लखनऊ सुपर जायंट्सच्या फलंदाजांनी माती खाल्ली. १६० धावांचे माफक लक्ष्यही त्यांना पार करता आले नाही. कर्णधार रिषभ पंत, निकोलस पूरन व एडन मार्करम यांचा अपयशाचा पाढा कायम राहिला. राजस्थान रॉयल्सने सलग दोन पराभवानंतर विजय मिळवत आयपीएल २०२६ गुणतालिकेमध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. लखनऊ सुपर जायंट्सचा हा सलग चौथा पराभव ठरला. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने कमी धावसंख्या असतानाही गोलंदाज बदली करताना वापरलेल्या कल्पकतेमुळे लखनऊ सुपर जायंट्सचा डाव ११९ धावांमध्येच आटोपला गेला.

राजस्थान रॉयल्सने ५ बाद ७७ धावांवरून ६ बाद १५९ धावांपर्यंत मजल मारून चांगले पुनरागमन केले. मोहम्मद शमीने तिसऱ्याच षटकात राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जैस्वाल ( २२) व ध्रुव जुरेल ( ०) यांना सलग चेंडूवर माघारी पाठवले. त्यानंतर मोहसिन खानच्या निर्धाव षटकात वैभव सूर्यवंशीची ( ८) विकेट पडली. कर्णधार रियान पराग ( २०) व शिमरोन हेटमायर ( २२) यांना अनुक्रमे प्रिंस यादव व मोहसिन खान यांनी माघारी पाठवले. राजस्थान रॉयल्सचा निम्मा संघ ७७ धावांवर तंबूत परतला होता. पण, रवींद्र जडेजा मैदानावर उभा राहिला आणि त्याने डोनोव्हन फरेरासह ( २०) सहाव्या विकेटसाठी ३३ धावा जोडल्या आणि शुभमन दुबेसह ( १९) सातव्या विकेटसाठी २५ चेंडूंत ४९ धावा जोडल्या. शमीसह, मोहसिन व प्रिंस यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. जड्डू २९ चेंडूंत ४३ धावांवर नाबाद राहिला आणि त्याने शेवटच्या षटकात २० धावा चोपल्या. मयांक यादव ( ४-०-५६-०) महागडा ठरला. लक्ष्याचा पाठलाग करताना मिचेल मार्शच्या एका चुकीच्या कॉलने आयुष बदोनीला ( १) पहिल्याच चेंडूवर रन आऊट केले.

लखनऊचा कर्णधार रिषभ पंतकडून मोठ्या अपेक्षा होत्या, परंतु नांद्रे बर्गरने दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर रिषभला भोपळ्यावर बाद केले. त्याने पुन्हा निराश केले. एडन मार्कर तिसऱ्या षटकात जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर फसला अन् चेंडू जागच्याजागी वर हवेत उडाला आणि ध्रुव जुरेलने झेल टिपला. जोफ्रा आर्चरने पाचवे षटक निर्धाव फेकून लखनौवरील दडपण आणखी वाढवले. लखनौला पॉवर प्लेमध्ये ३ बाद ३१ धावाच करता आल्या. आजतरी निकोलस पूरन आपली चमक दाखवेल असे वाटले होते, परंतु रवींद्र जडेजाने त्याला फिरकीच्या जाळ्यात अडकवले.

पूरन २५ चेंडूंत २२ धावांवर झेलबाद झाला आणि त्याने मिचेल मार्शसह ४१ चेंडूंत ४३ धावांची भागीदारी केली. राजस्थान रायल्सच्या गोलंदाजांनी धावगतीवर लगाम लावली होती आणि त्यामुळे रन रेटही वाढत चालला होता. हिंमत सिंगनेही ( १५) मार्शला साथ देण्याचा प्रयत्न केलेला, परंतु रवी बिश्नोईने त्याचा त्रिफळा उडवला. राजस्थान रॉयल्सला ३३ चेंडूंत ६९ धावा अजून करायच्या होत्या. मुकुल चौधरी व मार्श यांनी दोन षटकार खेचून सामना २९ चेंडू ५५ असा नजीक आणला. मार्शने षटकारासह अर्धशतक पूर्ण केले, परंतु नांद्रे बर्गरने तिसऱ्या चेंडूवर मार्शला संथ चेंडू टाकून झेल देण्यास भाग पाडले. तो ४१ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारासह ५५ धावांवर रियानच्या हाती झेलबाद झाला.

ब्रिजेश शर्माने १७व्या षटकात दोन धक्के देताना मुकुल( ७) व मोहम्मद शमी ( ६) यांना बाद करून राजस्थानचा विजय पक्काच केला. आता केवळ औपचारिकता शिल्लक होती. १८व्या षटकात मयंक यादवचा ( ५) यष्टिरक्षक ध्रुव जुरेलने एका हाताने सुरेख झेल टिपला. जोफ्राने त्याच षटकात मोहसिन खानचा त्रिफळा उडवला आणि लखनौचा संपूर्ण संघ १८ षटकांत ११९ धावांत तंबूत पाठवला. जोफ्राने ३, ब्रिजेश व नांद्रे यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >