मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सभागृहातील ध्वनी यंत्रणेतील दोष निवारण करण्यास अद्यापही महापालिका प्रशासनाला यश आले असून याचे तीव्र पडसाद बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. दोन महिने झाले तर महापालिका सभागृहातील माईकची व्यवस्था व्यवस्थित केली जात नसून सभागृहाच्या बाहेर डॉक्टर नियुक्त करणे, कार्डियाक रुग्णवाहिका तैनात ठेवणे तसेच सभागृहात उपस्थित केलेल्या प्रत्येक सदस्याला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधून ती समस्या जाणून घेण्याबाबत सूचनाही करूनही प्रशासनाचे अधिकार ऐकत नसल्याची खंत सभागृह नेत्यांनी बोलून दाखवत प्रशासनावर चांगले तोंडसूख घेतले.
मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील जुन्या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील महापालिका आयुक्तांच्या बैठक सभागृहातील ध्वनी यंत्रणा बदलण्याकरता आलेल्या खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव आला असता यशोधर फणसे यांनी तीन महिने हेात आले तरी सभागृहातील ध्वनी यंत्रणा चांगल्याप्रकारे केली जात नाही. तसेच स्थायी समितीच्या बैठकीतील ही यंत्रणाही अधून मधून बंद होत असते. त्यामुळे पुढील बैठकीपर्यंत हा प्रस्ताव राखून ठेवण्याची सूचना केली. यावर सभागृहनेते गणेश खणकर यांनी आपण पहिल्या बैठकीपासून सभागृहाचे कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातून मी येथील लटकते माईक काढून त्या ध्वनी यंत्रणा बदलण्यासाठी प्रयत्नही केला आहे. पण चार दिवसांमध्ये याबाबत निर्णय घेवू असे सांगितले जाते,पण अजुनही यात सुधारणा झालेली नाही. त्यानंतर मागील सभागृहात नगरसेवकांसाठी खानपान सुविधेसाठी कँटीनची जागा मोकळी करून दयावी तसेच सभागृहाबाहेर पिण्याची पाण्याची सुविधा, डॉक्टर आणि कार्डियाक रुग्णवाहिका तैनात करण्याची सूचना केली होती, पण त्याकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगत सभागृहनेत्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने आम्हाला गृहीत धरु नये, आणि आम्ही काय इथे टेंडर मंजुर करायला येत नाही असेही खडे बोल सुनावले. यावर काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सभागृहनेत्यांनी मांडलेल्या भावना या तीव्र असून प्रशासनाने याबाबत त्वरीत कार्यवाही करावी. परंतु महापालिकेचे मेंटेनन्स विभाग याबाबत गंभीर नसल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केले.






