मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईकर नागरिकांना नागरी सेवा-सुविधा पुरविताना नागरिकांचा सहभाग वाढवून त्यांच्या तक्रारींचे जलद व प्रभावी निराकरण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत ‘मार्ग प्रणाली’ (मॅनेजमेंट अॅण्ड रिड्रेसल ऑफ ग्रिव्हेन्सेस) कार्यान्वित करण्यात आली आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते महानगरपालिका मुख्यालयात बुधवारी २२ एप्रिल २०२६ रोजी या प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला.
मुंबईकर नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी महानगरपालिकेतर्फे www.mcgm.gov.in हे संकेतस्थळ, नागरी मदतसेवा क्रमांक १९१६, ‘माय बीएमसी’ मोबाईल अॅप, व्हॉट्सअॅप चॅटबॉट, ‘खड्डे त्वरित दुरुस्ती’ प्रणाली, प्रत्यक्ष पत्राद्वारे तक्रारी तसेच सामाज माध्यमे (एक्स, फेसबूक, इन्स्टाग्राम) अशा विविध माध्यमांचा वापर करण्यात येतो. या सर्व सेवांना अधिक सक्षम करण्यासाठी व सर्व प्रकारच्या तक्रारी एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून जलद तसेच प्रभावी निराकरण करण्यासाठी महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत ‘‘मार्ग प्रणाली’ (Management and Redressal of Grievances) हा सर्वसमावेशक डिजिटल उपक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे. या सेवेत पुढील टप्प्यात आरईटीएमएस पोर्टल, शासनाचे पीएमओपीजी , ‘आपले सरकार’ पोर्टल या सेवांचाही समावेश करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे विविध माध्यमांतून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे व्यवस्थापन एकाच प्रणालीतून करणे सुलभ होणार आहे. तक्रार नोंदणी, संबंधित विभागाकडे वर्गीकरण, कामाच्या प्रगतीची माहिती तसेच तक्रार निकाली काढण्यापर्यंतच्या सर्व टप्प्यांवर नागरिकांना स्वयंचलित सूचना प्राप्त होतील. यामुळे तक्रार निवारण प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल. नागरिकांना त्यांच्या तक्रारींची अद्ययावत माहिती वेळेत मिळणे सुलभ होईल. तसेच, प्रणालीतील थेट माहिती दर्शविणाऱ्या डॅशबोर्डच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांना विभागनिहाय प्रलंबित तक्रारींवर लक्ष ठेवणे व विहित कालमर्यादेत त्यांचे निवारण सुनिश्चित करणे सुलभ होणार आहे. तक्रारींचे स्वरूप व गांभीर्य लक्षात घेऊन प्राधान्यक्रम ठरविणेही अधिक परिणामकारक होईल.
भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) च्या सहाय्याने तक्रारींच्या स्थळाची अचूक ओळख पटविणे व निरीक्षण करणे सुलभ होणार आहे. तसेच, तक्रार निवारणानंतर नागरिकांकडून अभिप्राय घेऊन सेवा गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करण्यास मदत होणार आहे. विविध स्रोतांमधून प्राप्त होणाऱ्या तक्रारी एकाच प्रणालीत एकत्रित केल्यामुळे प्रतिसादाचा वेग वाढणार आहे. विभागांमधील समन्वय अधिक सशक्त होणार आहे. तसेच तक्रार निवारण प्रक्रियेवर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. यासोबतच, या उपक्रमामुळे नागरिकांसोबतचा संवाद अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण अधिक प्रभावी व जलद गतीने होणार आहे.
सभागृह नेता गणेश खणकर, विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर, बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन (बेस्ट) समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव, सुधार समिती अध्यक्ष संध्या दोशी (सक्रे), बाजार व उद्यान समिती अध्यक्ष हेतल गाला, विधी समिती अध्यक्ष दीक्षा कारकर, महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष मीनल तुर्डे, स्थापत्य समिती (उपनगरे) अध्यक्ष संगीता शर्मा, समाजवादी पक्षाच्या गटनेता अमरीन अब्रहानी आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. तसेच प्रशासनाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, सह आयुक्त (दक्षता) एम देवेंदर सिंह, उप आयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) प्रशांत गायकवाड, उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे तसेच संचालक (माहिती व तंत्रज्ञान) अरुण क्षीरसागर आणि संबंधित अधिकारी, कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.






