Saturday, April 18, 2026

भारताची स्वनिर्मित शस्त्रे आणि संरक्षण सज्जता

भारताची स्वनिर्मित शस्त्रे आणि संरक्षण सज्जता

तंत्रज्ञान : प्रा. प्रवीण पांडे

राष्ट्र निर्मितीच्या युगाची सुरुवात

काही वर्षांपूर्वी भारताला विदेशांकडून शस्त्रे आयात करावी लागत होती, तोच भारत आता शंभर पेक्षाही अधिक राष्ट्रांना शस्त्राची निर्यात करीत आहे. आधुनिक शस्त्राची निर्मिती आणि निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारत सध्या २३ व्या क्रमांकावर आहे, ही भारतीयांकरिता अत्यंत अभिमानाची बाब आहे.

आधुनिक भारताची शस्त्र सज्जता ही भारताची प्राचीन शस्त्र परंपरा आणि आत्मनिर्भर भारत अभियान या नव्या-जुन्या शस्त्र संपन्नतेचा संगम आहे. ही शस्त्र सजगता आणि संपन्नता स्वसंरक्षण आणि जागतिक शांततेकरिता असणाऱ्या शक्तीचे प्रतीक आहे.

साधारणपणे ६०-६५ वर्षांपूर्वी चीनने केलेल्या युद्धाने शस्त्र सज्जतेची आवश्यकता अधोरेखित केली होती. त्यामुळे भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू झाली. काही वर्षांपूर्वी भारताला विदेशांकडून शस्त्रे आयात करावी लागत होती, तोच भारत आता शंभर पेक्षाही अधिक राष्ट्रांना शस्त्राची निर्यात करीत आहे. आधुनिक शस्त्राची निर्मिती आणि निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारत सध्या २३ व्या क्रमांकावर आहे, ही भारतीयांकरिता अत्यंत अभिमानाची बाब आहे. २०२१-२२ या वर्षांत भारताकडून जवळपास २३६२२ कोटींची निर्यात करण्यात आली. याचाच स्पष्ट अर्थ असा, की भारतीय शस्त्र-अस्त्रावर इतर देश देखील संपूर्ण विश्वास ठेवून त्यांची आयात करीत आहेत. याचे खरे कारण असे की या बाबतीत भारतीय शास्त्रज्ञ, तिन्ही सैन्यदले, सैनिक आणि एकूणच संरक्षण यंत्रणा पराकाष्टेने अथक परिश्रम करीत आहेत, त्याचेच फलित म्हणजे भारताची आधुनिक संरक्षण प्रणाली होय.

भारतामध्ये सर्वच सैन्य दलाकरिता जसे भूदल, नौदल तसेच वायुदल याकारिता लागणाऱ्या आधुनिक शस्त्रत्रांची निर्मिती प्रगतिपथावर असून अनेक शस्त्रे पूर्णत्वास पोहोचली आहेत. मुख्यत्वेकरून हवाईदल हे अत्यंत प्रगत झाले आहे. याची चुणूक आपल्याला ऑपरेशन सिंदूरमध्ये बघायला मिळाली. भारताने विकसित केलेल्या आधुनिक शस्त्र-अस्त्र यांची माहिती :

भारताने संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) माध्यमातून स्वदेशी बनावटीची अत्यंत आधुनिक आणि घातक शस्त्रे विकसित केली आहेत. यामध्ये ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र, अग्नि-V आंतरखंडीय क्षेपणास्त्र, तेजस फायटर जेट, विक्रांत यांसारख्या विमानवाहू युद्धनौका आणि नाग अँटी-टँक मिसाईल यांसारख्या शस्त्रास्त्रांचा समावेश आहे, ज्यामुळे लष्कर, नौदल आणि हवाई दल अधिक सक्षम झाले आहे.

भारताची प्रमुख आधुनिक शस्त्रे आणि त्यांची वैशिष्ट्ये : क्षेपणास्त्र प्रणाली (Missiles):ब्रह्मोस (BrahMos): हे जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे, जे जमिनीवरून, समुद्रातून आणि हवेतून (सुखोई-३०) शत्रूच्या लक्ष्यावर मारा करू शकते. अग्नी-V (Agni-V): ५,००० ते ८,००० किमीपेक्षा जास्त पल्ल्याचे हे इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (ICBM) जे जवळच्या शत्रू राष्ट्रापर्यंत मारा करण्यास सक्षम आहे.आकाश (Akash): स्वदेशी विकसित हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली, जी एकाच वेळी अनेक विमाने किंवा ड्रोन नष्ट करू शकते. हेलिना (Helina): नाग क्षेपणास्त्राची हेलिकॉप्टर-लाँच आवृत्ती, जी टँकविरोधी युद्धात अत्यंत अचूक आहे. अस्त्र (Astra): हवेतून हवेत मारा करणारे (BVR) क्षेपणास्त्र, जे तेजस विमानाला जोडले गेले आहे. युद्धनौका आणि पाणबुड्या (Navy):INS विक्रांत (INS Vikrant): भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका. कलवरी-क्लास पाणबुड्या: स्कॉर्पीन श्रेणीतील या पाणबुड्या शत्रूच्या प्रदेशात गुप्तपणे हालचाल करण्यास सक्षम आहेत. लढाऊ विमाने आणि तोफा (Air & Artillery): तेजस (LCA Tejas): हलके, स्वदेशी लढाऊ विमान, जे आधुनिक रडार आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेर सुटसह सुसज्ज आहे. एटीएजीएस (ATAGS): ४८ किमीपेक्षा जास्त पल्ल्याची अत्याधुनिक स्वदेशी तोफ (Howitzer). पिनाका (Pinaka) रॉकेट सिस्टम : शत्रूच्या तळांवर झटपट आणि भीषण मारा करणारी रॉकेट यंत्रणा. इतर तंत्रज्ञान : MPATGM : तिसऱ्या पिढीचे मॅन-पोर्टेबल अँटी-टँक गाईडेड मिसाईल. दिव्यास्त्र : एकाच क्षेपणास्त्रातून अनेक ठिकाणी अणुहल्ला करण्याची क्षमता. भारताची ही शस्त्रे मेक इन इंडिया अंतर्गत विकसित केली जात असून, भारताला संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी बनवत आहेत. ही सर्व सज्जता करणे याचा अर्थ लगेच युद्ध करणे असा नाही कारण आपले अनादी काळापासून असणारे ब्रीद म्हणजे वसुधैव कुटुंबकम पण याचा चुकीचा अर्थ जर कोणी घेत असेल तर एक सुभाषित असे सांगते की :

चिन्तनीया ही विपदां आदावेव प्रतिक्रिया । न कूपखननं युक्तं प्रदीप्त वन्हिना गृहे ॥ अर्थ : विपत्तीच्या सुरुवातीपासूनच त्यावर उपाय विचारणे योग्य आहे; घर जळून खाक झाले असताना विहीर खोदणे निरर्थक असते. त्याचप्रमाणे संतांनी सांगून ठेवले आहे की : भले तरी देऊ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥ म्हणूनच ही सज्जता आणि सिद्धता. या अभंगाच्या पहिल्या ओळीचे प्रत्यंतर अखिल विश्वाने कोरोना काळात पहिले आहे. (भारताने अनेक राष्ट्रांना कोरोना विरोधी लस अक्षरशः वाटली) याच प्रकारची रणनीती आणि धोरणे कायम राहिली, तर भारत येत्या काही वर्षांत विश्वगुरू होण्यास कोणताच प्रत्यवाय नाही. या आधुनिक भारतवर्षाला आणि महान नेतृत्वाला कोटी कोटी प्रणाम.

Comments
Add Comment