छत्तीसगड : छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील सिंहितराई स्थित वेदांता लिमिटेडच्या औष्णिक विद्युत केंद्रात (Thermal Power Plant) मंगळवारी दुपारी भीषण दुर्घटना घडली. प्लांटमधील बॉयलरची पाईपलाईन (14 dead, 19 injured) अचानक फुटल्यामुळे झालेल्या या दुर्घटनेत १४ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १९ जण गंभीररीत्या भाजले आहेत. मृतांमध्ये प्रामुख्याने गरीब मजुरांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
नेमकी घटना काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साधारण २:३० च्या सुमारास प्लांटच्या 'युनिट १' मध्ये तांत्रिक बिघाड होऊन बॉयलरची नळी (Tube) प्रचंड दाबाने फुटली. ही दुर्घटना घडली तेव्हा अनेक मजूर तिथे काम करत होते, तर काही जण दुपारचे जेवण करत होते. पाईपलाईन फुटताच त्यातून साधारण ६०० अंश सेल्सिअस तापमानाची अतिउष्ण वाफ (Superheated Steam) वेगाने बाहेर पडली आणि परिसरात पसरली. या वाफेची उष्णता इतकी भीषण होती की, तिथे उपस्थित असलेल्या मजुरांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. अनेक मजूर या अतिउष्ण वाफेमुळे जागीच होरपळले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
प्रशासनाकडून चौकशीचे आदेश; जखमींवर मोफत उपचार सुरू शक्ती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमृत विकास तोपनो यांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत दंडाधिकारी चौकशीचे (Magisterial Inquiry) आदेश दिले आहेत. या चौकशीतून बॉयलर फुटण्यामागचे नेमके तांत्रिक कारण आणि व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा समोर येण्याची शक्यता आहे. पोलीस अधीक्षक प्रफुल्ल ठाकूर यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, बॉयलरमधील अतिउष्ण वाफेचा दाब कमी झाल्यानंतर आणि यंत्रणा पूर्णपणे थंड झाल्यानंतर बचाव कार्य वेगाने राबवण्यात आले. ढिगाऱ्याखाली किंवा प्लांटमध्ये अडकलेल्या सर्व कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले आहे. सध्या जखमींवर रायगड आणि बिलासपूर येथील अत्याधुनिक रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. राज्य सरकारने या सर्व जखमींना मोफत उपचार देण्याची घोषणा केली असून, त्यांच्या प्रकृतीवर तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवून आहे. या दुर्घटनेमुळे कामगार वर्गात संतापाचे लाट असून प्लांटमधील सुरक्षा नियमांबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
वॉशिंग्टन : अमेरिका आणि इस्रायलसोबतच्या संघर्षात इराणने आतापर्यंत 'होर्मुझ सामुद्रधुनी'चा वापर शस्त्र म्हणून केला होता. जागतिक इंधन पुरवठा रोखत ...
कपाटात लपलो म्हणून वाचलो" नाहीतर...
मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या मजुरांनी तिथल्या भीषण वास्तवाचे थरारक अनुभव कथन केले आहेत. पश्चिम बंगालमधील मजूर अजित नस्कर यांनी त्या काळरात्रीचा प्रसंग सांगताना सांगितले की, ज्यावेळी हा स्फोट झाला, त्यावेळी ते आणि त्यांचे सहकारी प्लांटमध्ये पेंटिंगचे काम करत होते. अजित नस्कर यांनी सांगितलं की, "आम्ही साधारण १७ मीटर उंचीवर काम करत होतो. अचानक विजेचा कडकडाट व्हावा तसा प्रचंड मोठा स्फोट झाला आणि काही कळायच्या आत सगळीकडे गरम वाफ आणि धुराचे लोट पसरले. डोळ्यांसमोर मृत्यू दिसत होता. जीव वाचवण्यासाठी मी तातडीने तिथे असलेल्या एका कपाटात शिरलो आणि स्वतःला लपवून घेतले." अनेक मजूर १७ मीटर उंचीवर अडकल्यामुळे त्यांना खाली उतरणे कठीण झाले होते. अतिउष्ण वाफेमुळे अनेकांचे शरीर भाजले गेले असताना अजित नस्कर यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्यांचे प्राण वाचले. मात्र, डोळ्यादेखत आपल्या सहकाऱ्यांना होरपळताना पाहून हे मजूर अजूनही मोठ्या धक्क्यात आहेत.
पीडितांसाठी सरकारी मदतीचा हात
या हृदयद्रावक दुर्घटनेवर केंद्र आणि राज्य सरकारने तीव्र दुःख व्यक्त केले असून पीडित कुटुंबांना आधार देण्यासाठी तातडीने आर्थिक मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त करत मृतांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना केली आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, तर जखमींच्या उपचारांसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आणि जखमींना तात्काळ ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाकडून ही मदत तातडीने पीडितांच्या बँक खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. एकीकडे आर्थिक मदत जाहीर झाली असली, तरी औद्योगिक सुरक्षेच्या कारणास्तव स्थानिक स्तरावर संतापाची लाट असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
वेदांता लिमिटेडची प्रतिक्रिया 'दोषींची गय केली जाणार नाही'
वेदांता लिमिटेडच्या औष्णिक विद्युत केंद्रातील भीषण स्फोटानंतर कंपनी प्रशासनाने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कंपनीने म्हटले आहे की, ही दुर्दैवी घटना त्यांच्या 'एनजीएसएल' (NGSL) या व्यावसायिक भागीदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांसोबत घडली आहे. या दुर्घटनेबद्दल कंपनीने तीव्र दुःख आणि खेद व्यक्त केला आहे. जखमी कामगारांना सर्वोत्कृष्ट वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी कंपनी कटिबद्ध असून प्रशासकीय तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही व्यवस्थापनाने दिले आहे. दुसरीकडे, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, "या दुर्घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली जाईल. औद्योगिक सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे किंवा कोणाचाही हलगर्जीपणा समोर आल्यास, संबंधित व्यक्ती किंवा कंपनीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल." प्रशासनाकडून आता प्लांटमधील सुरक्षा मानकांची तपासणी केली जात असून, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कडक पावले उचलली जात आहेत.






