Wednesday, April 15, 2026

Mumbai : मुंबईत झाडांच्या फांद्यांची होणार शास्त्रोक्त छाटणी

Mumbai : मुंबईत झाडांच्या फांद्यांची होणार शास्त्रोक्त छाटणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : धोकेदायक ठरू शकणाऱ्या झाडांची पावसाळा सुरू होण्यापूर्वी शास्रोक्त पद्धतीने छाटणी कशी करावी तसेच वृक्षगणना करत असताना अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर कसा करावा, याबाबत महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्यावतीने प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. मात्र, हे प्रशिक्षण देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मुंबईतील झाडांच्या धोकादायक फांद्यांची शास्त्रोक्त छाटणी होईल का? तसेच धोकादायक झाडांची कापणी केली जाणार आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे. झाडांच्या फांद्यांची शास्त्रोक्त छाटणीबाबत प्रशिक्षण देण्यात आले असले तरी पावसाळ्यात झाडांच्या फांद्या तुटण्याचे प्रमाण कमी झाले तरच या प्रशिक्षण शिबिराचा उपयोग होईल असे मानले जात आहे.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन कक्ष सभागृहात याबाबतचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर बुधवारी १५ एप्रिल २०२६ रोजी पार पडले. पुढील आठवड्यापासून वृक्षगणना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी यावेळी दिली.

उप उद्यान अधीक्षक साहेबराव गावित, सहायक उद्यान अधीक्षक अविनाश यादव, वृक्षतज्ज्ञ विवेक राणे, योगेश कुटे, उद्यान विभागाचे अधिकारी, प्रशिक्षणार्थी कर्मचारी, कंत्राटदारांनी नेमलेले उद्यान तज्ज्ञ या शिबिरास उपस्थित होते. महानगरपालिकेकडून पावसाळा सुरू होण्यापूर्वी दरवर्षी मुंबईतील धोकेदायक झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येते. या कामांमध्ये पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असतो. यंदाही ही मोहीम अधिक व्यापक स्वरुपात हाती घेण्यात आली आहे. तसेच मुंबईतील वृक्षांची संख्या किती आहे, याबाबतही तज्ज्ञांच्या मदतीने मोजणी करण्यात येणार आहे.

जितेंद्र परदेशी यांनी शिबिरास उपस्थित प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना वृक्ष छाटणी, वृक्ष जनगणनेबाबत माहिती दिली. सहायक उद्यान अधीक्षक अविनाश यादव यांनी वृक्षाचा आकार, मातीची आर्द्रता, हवेचा वेग आणि बांधकामादरम्यान वृक्ष संरक्षण कसे करावे, या विषयांवर मार्गदर्शन केले.

वृक्षतज्ज्ञ विवेक राणे यांनी शास्त्रोक्त पद्धतीने वृक्ष छाटणी करताना वृक्ष छाटणी व स्थिती मूल्यांकनाद्वारे वृक्षांचे व्यवस्थापन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले. वृक्षांमुळे सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचे होणारे नुकसान कसे रोखावे, बदलत्या हवामानादरम्यान वृक्षसंरक्षण कसे करावे, वृक्षाचा आकार आणि आरोग्य निरंतर सुधारण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत अभिनव संकल्पना मांडल्या. वृक्षगणना कशी केली जाणार, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जाणार, तसेच ड्रोनचा या गणनेसाठी कसा उपयोग होणार याबाबत योगेश कुटे यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

उद्यान विभागाला वैभव राजेंचा पडला विसर : मुंबईतील झाडांच्या फांद्यांची आणि मृत झाडांची शास्त्रोक्तपणे छाटणी तथा कापणी करण्यासाठी मागील अनेक वर्षापासून वृक्षतज्ञ वैभव राजे हे सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहेत. मुंबईतील कुलाबा येथील झाडांची छाटणी वैभव राजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती. हे वृक्षतज्ञ मुंबई महापालिकेला मदत करत असताना, महापालिका उद्यान विभागाला याचा पूर्णपणे विसर पडलेला दिसून येत आहे. त्यामुळे उद्यान विभागाला त्यांचा विसर पडला की जाणीवपूर्वक त्यांची मदत घेतली जात नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Comments
Add Comment