महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे
भारतीय परंपरेत मानवी जीवन चार आश्रमात विभागले आहे. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यास आश्रम. पैकी ब्रह्मचर्य व गृहस्थाश्रम हे समाज रचनेचे मुख्य आधार आहेत. आपल्या श्रीमद्भागवत पद्मपुराण विष्णुपुराण या पुराणात या आश्रमांचे नियम सांगितले आहे.
ब्रह्मचर्याश्रम
ब्रह्मचर्य आश्रमाचा काळ हा शिक्षण, शिस्त, संस्कार, आत्मसंयमाचा काळखंड असतो. विद्यार्थ्यांनी गुरू गृही विद्या ग्रहण करण्यास जावे. विद्यार्थ्यांने शास्त्राप्रमाणे मृगचर्म, वस्त्र, जटा, दंड, कमांडलू, यज्ञपवित धारण करावे. गुरू गृही राहणाऱ्या ब्रह्मचाऱ्याने आपली इंद्रिय स्वाधीन ठेवून दासाप्रमाणे आपल्याला लहान समजावे. गुरुदेवांच्या चरणी दृढ प्रेम ठेवावे. गुरू उभे असल्यास आपण उभे राहावे, गुरू बसल्यास आपण बसावे ते जेथे जातील त्यांच्या मागून जावे. गुरुचरणी दृढ श्रद्धा ठेवून त्यांच्या हिताचे असेल तेच कार्य करावे. नेहमी नम्र असावे.
सकाळ-संध्याकाळ गुरू, अग्नी, सूर्य व श्रेष्ठ देवतांची उपासना करावी. गुरू बोलावतील तेव्हा ज्ञान ग्रहणासाठी तत्पर असावे. अध्ययनाच्या आरंभी व शेवटी गुरू चरणावर मस्तक ठेवून वंदन करावे. त्यांच्यासाठी आश्रमात पाणी, समीधा व फुले आणावीत. सकाळ-संध्याकाळ भिक्षा मागून आणून गुरुजींना समर्पित करावी. त्यांच्या अनुमतीने भोजन करावे. अनुमती न दिल्यास उपवास करावा. अति खाऊ नये. थोडे खावे. गुरुगृहातील तसेच आश्रमातील कामे करावी. कामे निपूणतेने करावीत. गुरू गृहाची व आश्रमाची शिस्त पाळावी.
इंद्रिय निग्रह करावा.
स्त्री विषयीच्या गोष्टीपासून अलिप्त राहावे. स्त्रियांशी तसेच स्त्रीच्या आधीन असणाऱ्यांशी आवश्यक तेवढेच व्यवहार ठेवावे. गुरू पत्नीकडून भांग काढून घेणे, स्नान करणे, उटणे लावून घेण्यासारखी कामे करून घेऊ नयेत. ब्रह्मचाऱ्यांने काजळ लावणे, तेल लावणे, मांस खाणे, मद्य प्राशन करणे, अलंकार घालणे, स्त्रियांची चित्रे काढणे, इत्यादी गोष्टी करू नयेत. योग्य प्रकारे सेवा करून शिक्षण पूर्ण झाल्यावर स्नान करावे. हे स्नान आश्रम समाप्तीचे विशेष स्नान झाल्यानंतर गुरू मागतील तेवढी दक्षिणा देऊन व त्यांची आज्ञा घेऊन गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम अथवा संन्यासाश्रमात प्रवेश करावा किंवा ब्रह्मचर्य पालन करीत आश्रमातच राहावे.
गृहस्थाश्रम धर्म
वेद अभ्यास केल्यानंतर गुरूंचा आदेश घेऊन पूर्वाश्रमाचा त्याग करावा व स्नान करावे. ब्रह्मचर्य पूर्वक जो वेदाध्ययन समाप्त करतो, त्याला स्नातक असे म्हणतात. स्नातकाने किंवा गृहस्थाने शील, गुणवत्ता इत्यादी बाबतीत आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या माणसांची मैत्री संबंध करावा. विकृत वस्त्रे वापरू नये. दुसऱ्याची वस्त्रे किंवा दुसऱ्याचे अलंकार घालू नयेत. गृहास्थाश्रमात प्रवेश करून सुयोग्य कन्येशी विवाह करावा. पत्नीसोबत षष्ठी, अष्टमी, अमावशा, पौर्णिमा, द्वादशी व चतुर्दशी या दिवशी अभिगमन करू नये. गृहस्थाश्रमात गृहस्थाने धर्मानुसार सर्व कामे करून भगवंतांना समर्पित करावी. भिक्षुक संन्यासी ब्रह्मचारी या सर्वांना गृहस्थाश्रमाचा आधार असतो. म्हणून चारही आश्रमात गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे. वेद अध्ययन करीत तीर्थाटन करणाऱ्यांना भोजन व निवासाची निश्चित सोय नसते. या सर्वांना गृहस्थाचेच घर आश्रय देते. कोणीही अतिथी आल्यास त्याचे आदराने स्वागत करून यथाशक्ती भोजन व विश्रामाची सोय करावी. अतिथी विन्मुख गेल्यास यजमानाच्या पुण्याचा क्षय होतो. अतिथीशी गर्वाने संभाषण करणे, त्याचा अपमान करणे, त्याला हाकलून देणे, अशा गोष्टी करू नये.
गृहस्थाश्रमात गृहस्थाने देव पूजा, उपासना करावी. माता, पिता, पत्नी, मुले व कुटुंबाचे पालनपोषण करावे. आपल्या आत्म्याच्या हिताचे कार्य करावे. सर्व प्राण्यांवर दया करावी. आपले वय, आपले कर्म, आपला देश, वाणी व आपली बुद्धी या गोष्टी विचारात घेऊन आचरण करावे. सत्य वचनी, क्रोध न करणारा, लोभ व मोहापासून दूर राहणारा ही चांगल्या गृहस्थाश्रमीची लक्षणे होत.
गृहस्थाश्रमात माता-पित्याच्या हिताचे कार्य करणे, विद्वानाविषयी प्रेम ठेवणे, ज्ञानयज्ञ करणे, धर्म, अर्थ व काम या तीनही गोष्टींची योग्य प्रकारे सांगड घालणे, क्षमाशीलता आदी सद्गुणांचे पालन करावे. घरात राहतो तो गृहस्थ नाही, तर ज्याच्यात दया, क्षमा, विज्ञान, सत्य व अध्यात्म इत्यादी गोष्टी वास करतात तोच खरा गृहस्थ असतो.






