प्रथमच अनुदान मंजूर झालेल्या २२ शाळांमध्ये १३ मराठी माध्यमांच्या शाळांचा समावेश
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका शिक्षण समितीच्या माध्यमातून मनपा शाळांच्या अनुदान प्रक्रियेला गती देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री राजेश शिरवडकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर २२ शाळांना प्रथमच अनुदान मंजूर करण्यात आले, त्यात १३ मराठी माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. या माध्यमातून एकप्रकारे मराठी माध्यमाच्या शाळांना आधार देत प्रकारे मराठी शाळांची संख्या अधिकाधिक वाढवण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे.
मुंबई महापालिकेच्या वतीने प्राथमिक शाळांना अनुदान देण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी शिक्षण समितीमार्फत टप्प्याटप्प्याने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ७ शाळांना अनुदान मंजूर करण्यात आले, त्यापैकी ३ शाळा या मराठी माध्यमाच्या आहेत. महापालिका अस्तित्वात आल्यानंतर आणि शिक्षण समिती अध्यक्षांची निवड झाल्यानंतर पहिल्या शिक्षण समितीच्या बैठकीत २२ शाळांना प्रथमच अनुदान मंजूर करण्यात आले, यामध्ये १३ शाळा मराठी माध्यमाच्या असल्याने मराठी माध्यमाच्या शिक्षणाला मोठा आधार मिळाला आहे.
तसेच १२ शाळांच्या मान्यता मुदतवाढ प्रस्तावांना शिक्षण समितीने मंजुरी दिली असून, त्यामध्ये ५ शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. यामुळे या शाळांच्या शैक्षणिक कामकाजाला आवश्यक स्थैर्य आणि पाठबळ मिळणार आहे.याशिवाय सध्या ४५ शाळांचे प्रस्ताव प्रशासकीय तसेच शिक्षण समितीच्या मंजुरीसाठी प्रक्रियेत असून, ते लवकरच मंजुरीसाठी ठेवले जाणार आहेत.
महापालिका शिक्षण विभागाकडून ही संपूर्ण प्रक्रिया नियमांनुसार आणि पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून, पात्र शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि महापालिका शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षण समिती सातत्याने प्रयत्नशील असल्याची माहिती शिक्षण समितीच्या अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांनी दिली.






