Saturday, March 7, 2026

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे अशक्य होत आहे. कर्करोगाचा संभाव्य धोका असलेल्या व्यक्तींना तो ओळखता यावा यासाठी टाटा हॉस्पिटलच्या माध्यमातून मोबाइल अॅप तयार करण्यात येत असून, रुग्णाला प्राथमिक आकलन होण्यास मदत होणार आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात हे अॅप सेवेत येईल, अशी माहिती टाटा हॉस्पिटलचे सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमियोलॉजीचे संचालक डॉ. राजेश दीक्षित यांनी दिली.

भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात सर्व संभाव्य रुग्णांची तपासणी करणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत कोणत्या व्यक्तींना कर्करोगाचा धोका अधिक आहे हे आधीच ओळखता यावे, त्यानंतर वेळेत तपासणी व उपचार शक्य होऊ शकतात. याच उद्देशाने टाटा रुग्णालयाकडून एक नवे मोबाइल ॲप विकसित केले जात आहे. प्रस्तावित ॲपमध्ये सांख्यिकी मॉडेलचा वापर करण्यात येणार असून वय, शरीर वस्तुमान निर्देशांक (बॉडी मास इंडेक्स), मुलांची संख्या, रजोनिवृत्तीची स्थिती, कंबर गुणोत्तर तसेच जीवनशैलीशी संबंधित काही घटकांची माहिती भरल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या कर्करोगाच्या धोक्याचा अंदाज दिला जाणार आहे. सुरुवातीला ‘रिलेटिव्ह रिस्क’ निश्चित करून त्याचे भारतीय लोकसंख्येतील कर्करोगाच्या प्रमाणाशी तुलना करून ‘अॅब्सोल्यूट रिस्क’ ठरवला जाईल. या माध्यमातून व्यक्तीला ब्रेस्ट कर्करोगाचा धोका सरासरीपेक्षा किती अधिक किंवा कमी आहे. याचे प्राथमिक आकलन मिळणार आहे. त्यामुळे जास्त जोखमीच्या गटातील लवकर स्क्रीनिंग करून कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यास मदत होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. हे ॲप पूर्णपणे मोफत असणार असून वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती कोणत्याही सर्व्हरवर साठवली जाणार नाही, ती केवळ संबंधित मोबाईलमध्येच राहील, असेही स्पष्ट करण्यात आले. सध्या या ॲपच्या माध्यमातून ब्रेस्ट कर्करोगासोबतच बक्कल म्यूकोसा (तोंडाचा कर्करोग) आणि पित्ताशयाचा कर्करोग गॉलब्लॅडर कर्करोगाच्या जोखमीचे आकलन करण्यासाठी काम सुरू आहे. भारतात मर्यादित संसाधनांमुळे सर्वांची कर्करोग तपासणी करणे शक्य नाही. त्यामुळे ज्या व्यक्तींना धोका अधिक आहे, अशांची आधी ओळख करणे आवश्यक ठरते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

Comments
Add Comment