टिटवाळा ठरणार पर्यावरण –पर्यटनाचे नवे केंद्र
कल्याण : श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणीय जबाबदारी यांचा संगम साधणारा ऐतिहासिक क्षण टिटवाळ्याने अनुभवला. टिटवाळा–रुंदे मार्गालगतच्या विस्तीर्ण पटांगणात ‘निसर्गायण’ या महत्त्वाकांक्षी पर्यावरण शिक्षण प्रकल्पाचे भूमिपूजन कडोंमपाच्या महापौर हर्षाली चौधरी यांच्या हस्ते पार पडले.
धार्मिक ओळखीच्या या नगरीत हरित भविष्याचा ठोस संकल्प रुजला. श्री सिद्धीविनायक मंदिर, टिटवाळाच्या परिसरात उभा राहणारा हा उपक्रम केवळ वृक्षारोपणाचा कार्यक्रम नसून पर्यावरण संवर्धनाची शास्त्रशुद्ध, नियोजनबद्ध आणि दीर्घकालीन चळवळ उभारण्याचा व्यापक प्रयत्न असल्याचे यावेळी अधोरेखित झाले. पर्यावरण दक्षता मंडळ आणि एन्व्हायरोव्हीजल, ठाणे यांच्या संयुक्त पुढाकारातून साकार होत असलेल्या या प्रकल्पाला प्रशासनाची भक्कम साथ लाभली.
आयुक्त अभिनव गोयल यांनी आपल्या भाषणात निसर्गातील गुंतवणूक ही इतर कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीपेक्षा अधिक परतावा देणारी ठरते, असे स्पष्ट करत या परिसरातून भविष्यात २०० ते २५० कोटी रुपयांच्या मूल्याइतका पर्यावरणीय आणि पर्यटनात्मक लाभ निर्माण होऊ शकतो, असे उदाहरणासहित मांडले. टिटवाळ्यातील गणपती मंदिर आणि नव्याने उभारला जाणारा हा हरित प्रकल्प यांना पर्यटनदृष्ट्या एकत्रितपणे विकसित करण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे आश्वासन देत त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना या मोहिमेत सक्रिय सहभागी करून घेण्यावर विशेष भर दिला. महापौर हर्षली चौधरी यांनीही पर्यटनाच्या दृष्टीने या उपक्रमाला चालना देण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्याची घोषणा करत ‘निसर्गायण’ला शहराच्या ओळखीचा अविभाज्य भाग बनविण्याचा निर्धार व्यक्त केला.







