Sunday, February 22, 2026

भारताची तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी; 'पॅक्स सिलिका' गटात भारत सामील

भारताची तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी; 'पॅक्स सिलिका' गटात भारत सामील

दिल्ली: आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आणि सेमीकंडक्टरच्या युगात भारताने जागतिक स्तरावर एक मोठी आघाडी मारली आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील 'पॅक्स सिलिका' (Pax Silica) या महत्त्वाकांक्षी गटात भारत अधिकृतपणे सामील झाला आहे. या करारामुळे जागतिक खनिज पुरवठा साखळी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

'एआय इम्पॅक्ट समिट' दरम्यान केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि अमेरिकेचे दूत सर्जियो गोर यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. भारत या गटात सामील होणारा १० वा देश ठरला आहे.

'पॅक्स सिलिका' म्हणजे नक्की काय?

'पॅक्स' (Pax) हा शब्द शांतता आणि समृद्धी दर्शवतो, तर 'सिलिका' (Silica) हे आधुनिक संगणक युगाचे प्रतीक आहे. २० व्या शतकात तेल आणि पोलाद महत्त्वाचे होते, तर २१ व्या शतकात संगणक आणि एआय जगावर नियंत्रण ठेवतील. हे संगणक बनवण्यासाठी लिथियम, कोबाल्ट आणि १७ प्रकारची दुर्मिळ खनिजे (Rare Earth Metals) अत्यंत आवश्यक आहेत.

चीनच्या मक्तेदारीला आव्हान?

सध्या जगातील ६० ते ७० टक्के दुर्मिळ खनिजांच्या पुरवठ्यावर चीनचे नियंत्रण आहे. पॅक्स सिलिकाचा मुख्य उद्देश या खनिजांच्या पुरवठा साखळीचे (Supply Chain) विविधीकरण करणे आणि कोणत्याही एका देशावर (विशेषतः चीनवर) असलेले अवलंबित्व कमी करणे हा आहे. शस्त्रास्त्रे, इलेक्ट्रिक वाहने, सेमीकंडक्टर आणि एरोस्पेस क्षेत्रात या खनिजांशिवाय उत्पादन करणे अशक्य आहे. भारताच्या समावेशामुळे या आघाडीची ताकद वाढली आहे.भारताकडे असलेले सॉफ्टवेअर कौशल्य आणि वाढती मॅन्युफॅक्चरिंग क्षमता यामुळे एआय मॉडेल्स, सेमीकंडक्टर आणि डेटा सेंटर्सच्या उभारणीत भारत या गटाचा कणा ठरू शकतो.

हस्ताक्षर करणारे १० देश

भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया, युनायटेड किंगडम, इस्रायल, कतार, सिंगापूर आणि यूएई (UAE).

सहयोगी देश

कॅनडा, युरोपियन युनियन, नेदरलँड्स आणि तैवान.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >