क्वेटा : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा येथे असलेले सुमारे २०० वर्षे जुने ऐतिहासिक श्री गुरु सिंह सभा गुरुद्वारा रातोरात पाडण्यात आले आहे. या पवित्र परिसरात मुलांसाठी एक शाळाही चालवली जात होती.अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे स्थानिक शीख समुदायासह नागरिकांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनांनाही मोठा धक्का बसला आहे. या अन्यायाविरोधात नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र निषेध व्यक्त करत आहेत तर भारतातूनही तीव्र विरोधाचे सूर उमटत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाने हा ऐतिहासिक गुरुद्वारा पाडण्यापूर्वी कोणतीही नोटीस दिली नव्हती. या अमूल्य धार्मिक जमिनीचा ताबा एका खासगी बांधकाम व्यावसायिकाकडे देण्यात आल्याचा आरोप आहे. या ठिकाणी व्यावसायिक शॉपिंग प्लाझा उभारण्याची तयारी असल्याचेही सांगितले जात आहे.
या घटनेमुळे जगभरातील शीख समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. या पवित्र स्थळाची लवकरात लवकर पुनर्बांधणी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी शीख समाजाकडून करण्यात येत आहे.यासोबतच, नवीन गुरुद्वारा बांधून पूर्ण होईपर्यंत त्याच परिसरात श्रद्धाळूंसाठी सन्मानजनक तात्पुरती व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही समुदायाने पाकिस्तान सरकारकडे केली आहे. यामुळे श्रद्धाळूंना नियमितपणे श्री गुरु ग्रंथ साहिबजींचे प्रकाश करता येईल आणि दररोजची अरदास कोणत्याही अडथळ्याशिवाय करता येईल.
https://www.prahaar.in/2026/08/30/announcement-to-elevate-india-uzbekistan-relations-to-the-status-of-a-comprehensive-strategic-partnership/आस्थेचे केंद्र असलेला गुरुद्वारा अशा प्रकारे उद्ध्वस्त करून त्याचे रूपांतर ढिगाऱ्यात करण्यात आल्याने भारतातही तीव्र संताप व्यक्त होत आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आर. पी. सिंह यांनी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाला या गंभीर आणि संवेदनशील मुद्द्याची तातडीने पाकिस्तान सरकारकडे दखल घेण्याची मागणी केली आहे. तर माजी खासदार तरलोचन सिंह यांनीही या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
भू-माफियांकडून उभारण्यात येत असलेल्या शॉपिंग प्लाझाचे बांधकाम तातडीने थांबवावे आणि गुरुद्वाराची पुन्हा उभारणी सुरू करावी, अशी विनंती त्यांनी पाकिस्तानी उच्चायुक्तांकडे केली आहे. दरम्यान, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष हरजिंदर सिंह धामी यांनी या घटनेला थेट शीख वारशावरील हल्ला असल्याचे म्हटले आहे.पाकिस्तान सरकार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या चिंताजनक प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि गुरुद्वाराची जमीन व मालमत्ता पुन्हा शीख समाजाच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
बलुचिस्तानमध्ये अल्पसंख्याकांच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच घटना नाही. स्थानिक शीख समुदायाच्या म्हणण्यानुसार, एकेकाळी या प्रांतात तब्बल १२ गुरुद्वारे होते. मात्र, काळाच्या ओघात त्यापैकी दहा गुरुद्वारांचे अस्तित्व नष्ट झाले आहे. आज संपूर्ण प्रांतात केवळ दोन गुरुद्वारे शिल्लक आहेत. धार्मिक स्थळांची अशा प्रकारे घटती संख्या पाहता स्थानिक शीख समुदायामध्ये आपल्या भविष्याबरोबरच धार्मिक वारसा जपण्याबाबतही मोठी भीती निर्माण झाली आहे.






