मुंबई: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आपले खासगी सचिव डॉ. रामदास गाडे यांची हकालपट्टी केली आहे. गाडे यांना अन्न व औषध प्रशासन विभागातून कार्यमुक्त करून त्यांच्या मूळ आस्थापनेत (कृषी व पदुम विभाग) परत पाठवण्याचे आदेश झिरवाळ यांनी दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरिंगे याला ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. पोलीस कोठडीत असलेल्या ढेरिंगे याने चौकशीदरम्यान खासगी सचिव रामदास गाडे यांचे नाव घेतल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचे राजकीय पडसाद उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत उमटले. "स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा मलिन होणार नाही याची काळजी घ्या. प्रशासकीय कामात पारदर्शकता ठेवा," अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी झिरवाळ यांना खडेबोल सुनावले होते. या नाराजीनंतर झिरवाळ यांनी तातडीने गाडे यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला.







