Monday, February 9, 2026

ब गटात झिम्बाब्वे अव्वल स्थानी

ब गटात झिम्बाब्वे अव्वल स्थानी

ब्रायन बेनेट याचा यंदाच्या वर्ल्ड कपमधील आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल

नवी दिल्ली  : झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ओमानवर विजय मिळवून ब गटात अव्वल स्थानी झेप घेतली. त्यांनी श्रीलंकेला ( १.०००) नेट रन रेटमध्ये ( २.७०२) मागे टाकले आणि नंबर वन बनले. ओमानचे १०३ धावांचे लक्ष्य झिम्बाब्वेने १३.३ षटकांत २ बाद १०६ धावा करून पार केले. या सामन्यात ब्रायन बेनेट याचा झेल हा चर्चेचा विषय ठरला. अनेकांनी याला यंदाच्या वर्ल्ड कपमधील आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल म्हणून घोषित केले.

ब गटातील सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून ओमानविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ब्लेसिंग मुझाराबानीने दुसऱ्याच षटकात ओमानचा कर्णधार जतिंदर सिंगचा ५ धावांवर त्रिफळा उडवला. त्यानंतर रिचर्ड एनगाराव्हाने तिसऱ्या षटकात हम्मद मिर्झाला शू्न्यावर बाद करून ओमानला दुसरा धक्का दिला. ओमानचे विकेट पडण्याचे सत्र चौथ्या षटकात कायम राहिले. ब्लेसिंगने त्या षटकात आमीर कलीम ( ५) आणि करण सोनावळे ( ०) यांना बाद करून ओमानची अवस्था ४ बाद १७ अशी केली. सिकंदर रझाला गोलंदाजीला आणल्याचा झिम्बाब्वेला फायदा झाला आणि त्याने वसीम अलीचा ( ३) त्रिफळा उडवला.

निम्मा संघ २७ धावांत माघारी परतल्यानंतर ओमानचे पुनरागमन अवघड झाले होते. सुफियान मेहमूद व विनायक शुक्ला यांनी ओमानचा डाव सावरला. रिचर्डने पुन्हा कल्ला केला आणि ही जोडी तोडली. विनायक २८ धावांवर बाद झाला आणि पाठोपाठा जितेने रामानंदी ( १) पण माघारी परतला. ब्रॅड इव्हान्सने मेहमूदला ( २५) बाद करून ओमानच्या पुनरागमनाच्या आशा मावळून टाकल्या. नदीम खानच्या ( २०) खेळीने ओमान शतकपार पोहोचला. पण, त्यांचा संपूर्ण संघ १९.५ षटकांत १०३ धावांत तंबूत परतला. झिम्बाब्वेच्या रिचर्ड, ब्लेसिंग व ब्रॅड यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

अर्धशतकीय भागीदारीने झिम्बाब्वेला विजयाच्या उंबरठ्यावर

सिकंदर रझाचा हा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील १५ वा सामना आहे आणि झिम्बाब्वेकडून एवढे सामने खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला. त्याने सीन विलियम्सनचा विक्रम मोडला. ब्रेंडन टेलरने ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये ८ बळी टिपले आणि त्याने चकाब्वाचा ( ५) विक्रम मोडला. झिम्बाब्वेकडून मुझारबानीहा ( १५) ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक बळी टिपणारा गोलंदाज ठरला. त्याने सिकंदरला ( १४) मागे टाकले. लक्ष्याचा पाठलाग करताना तदिवानाशे मारुमानी ( २१) व डिओन मेयर्स ( ०) हे स्वस्तात बाद झाले. त्यानंतर ब्रायन व ब्रेंडन टेलर यांनी मोर्चा सांभाळला. दोघांच्या अर्धशतकीय भागीदारीने झिम्बाब्वेला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. टेलर ३१ धावांवर रिटायर्ड हर्ट ठरला. ब्रयानने ३६ चेंडूंत ७ चौकारांसह नाबाद ४८ धावा केल्या. सिकंदर ५ धावांवर नाबाद राहिला.

ब्रायन बेनेटने घेतला भन्नाट झेल

या सामन्यात ब्रायन बेनेट तुफान चर्चेत राहिला. या सामन्यातील पहिल्या डावात झिम्बाब्वेची गोलंदाजी सुरू असताना ब्रायन बेनेटने डावातील शेवटच्या चेंडूवर सीमारेषेवर डाईव्ह मारून भन्नाट झेल घेतला. हा या स्पर्धेतील सर्वोत्तम कॅचपैकी एक आहे. पहिल्या डावात क्षेत्ररक्षणामुळे चर्चेत राहिलेल्या बेनेटने दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करताना नाबाद ४८ धावांची खेळी केली.

Comments
Add Comment