Sunday, February 1, 2026

LPG Price Hike: बजेटपूर्वीच लागली खिशाला कात्री; गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ

LPG Price Hike: बजेटपूर्वीच लागली खिशाला कात्री; गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ

नवी दिल्ली: आज म्हणजेच रविवार १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. मात्र या आधीच व्यावसायिकांच्या खिशाला कात्री बसली आहे. मिळालेल्या माहितीनुसार महिन्याच्या सुरुवातीलाच गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. संपूर्ण देशभरात आजपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ :

अर्थसंकल्पापूर्वी, तेल विपणन कंपन्यांनी रविवारी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ करून एलपीजी ग्राहकांना धक्का दिला आहे. मात्र घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नसल्याने सामान्यांना दिलासा मिळाला आहे.

रेस्टोरंट्समधील खाद्य पदार्थांचे दर वाढणार :

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा वापर प्रामुख्याने हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, रस्त्यावरील ढाबे आणि इतर व्यावसायिक ठिकाणी केला जातो. त्यामुळे हॉटेल्स-रेस्टोरंट्समधील खाद्य पदार्थांचे दर वाढण्याची शक्यता आहे. सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये सुधारणा करतात. जानेवारीमध्ये, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत १११ रुपयांनी वाढवण्यात आली होती.

आजच्या दरवाढीनंतर व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर दिल्लीत १७४०.५० रुपये, कोलकातामध्ये १८४४.५० रुपये आणि मुंबई १६९२ रुपये इतके पैसे मोजावे लागतील.

Comments
Add Comment