Sunday, February 1, 2026

माणसाने आपले कर्तव्य श्रेष्ठ मानावे

माणसाने आपले कर्तव्य श्रेष्ठ मानावे

गोष्ट लहान, अर्थ महान,शिल्पा अष्टमकर

आजच्या काळात आपण हक्कांविषयी खूप बोलतो. माझा हक्क, माझं स्वातंत्र्य, माझी मागणी — हे शब्द नेहमी ऐकायला मिळतात; परंतु हक्क मिळण्याआधी कर्तव्ये पार पाडणे हेच खरे श्रेष्ठत्व आहे, हे आपण अनेकदा विसरतो. कर्तव्य म्हणजे काय?

कर्तव्य म्हणजे आपली जबाबदारी, आपले काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडणे. विद्यार्थ्याचे कर्तव्य म्हणजे मन लावून अभ्यास करणे. शिक्षकांचे कर्तव्य म्हणजे विद्यार्थ्यांना घडवणे. पालकांचे कर्तव्य म्हणजे संस्कार देणे. आणि नागरिकांचे कर्तव्य म्हणजे समाज व देशासाठी जबाबदारीने वागणे. महाभारतातील श्रीकृष्णांनी अर्जुनाला कर्मयोग शिकवला - “कर्म कर, फळाची अपेक्षा करू नकोस.” याचा अर्थ असा की, कर्तव्य पार पाडणे हेच आपले खरे धर्मकार्य आहे. ज्या व्यक्तीने आपले कर्तव्य श्रेष्ठ मानले, ती व्यक्ती कधीही छोट्या स्वार्थात अडकत नाही. ती वेळेचे भान ठेवते, नियम पाळते आणि इतरांप्रती आदराने वागते. आज समाजात अनेक समस्या दिसतात - अनुशासनाचा अभाव, कर्तव्याकडे दुर्लक्ष आणि जबाबदारी टाळण्याची प्रवृत्ती. यावर एकच उपाय आहे - प्रत्येकाने स्वतः पासून सुरुवात करणे. आपण आपले कर्तव्य नीट पार पाडले, तर समाज आपोआप सुसंस्कृत होईल आणि देश प्रगतीच्या मार्गावर जाईल. म्हणूनच हक्क मागण्याआधी कर्तव्य ओळखू या आणि कर्तव्याला श्रेष्ठ मानून ते निष्ठेने पार पाडू या. यासाठी भगवान पाणिनीची गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते - सर्वश्रेष्ठ व्याकरणतज्ज्ञ भगवान पाणिनी अरण्यात शिष्यांना पाठ देत होते. शिष्य आणि पाणिनी पाठात अगदी रंगून गेले होते. इतक्यात पानांची सळसळ, पाखरांचा आवाज ऐकू आला. आणि काय आश्चर्य! प्रत्यक्ष वाघ! महाराजांचं आगमन झालं होतं. त्या महाराजांना पाहून शिष्य घाबरून पळू लागले. पण भगवान पाणिनी मात्र आपल्या कामात दंग. वाघाला पाहून त्यांनी सरळ “व्याजीघ्रतीनी व्याघ्र” ज्याची घाणेन्द्रीये तीक्ष्ण आहेत तो व्याघ्र, अशी त्या शब्दांची व्युत्पत्ती ते शिष्यांना सांगू लागले.

वाघ आला आणि त्याने शिकवण्यात दंग असलेल्या पाणिनींना पाहिले. थोडा वेळ वाघ शांतपणे पाणिनीकडे बघत राहिला. भगवान पाणिनी मात्र शिष्यांना पाठ देण्यात मग्न होते. वाघाने पाणिनींपुढेच बैठक मारली. हा सर्व प्रकार शिष्यगण झुडपांत लपून पाहत होते. ते सर्वजण आश्चर्यचकित झाले. भगवान पाणिनीनी आपला पाठ संपवताच वाघाने पाणिनीला ठार मारले. सर्व शिष्यगण शरमिंदे झाले. वाघ समोर असूनही पाणिनी आपल्या कर्तव्यापासून दूर झाले नाहीत त्यांची एकाग्रता भंगली नाही. तात्पर्य : आपल्या कामात इतके मन असावे की, त्यातून मिळणारा आनंदाचा ठेवा आपल्याला व इतरांना सतत मिळावा. विचार : माणसाने आपल्या प्राणापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानावे.

Comments
Add Comment