Monday, September 22, 2025

ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रोची चाचणी

ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रोची चाचणी

ठाणे : ठाणे शहराला मुंबईशी जोडणाऱ्या 'गायमुख - कासारवडवली - वडाळा' या 'मेट्रो - ४' आणि 'मेट्रो - ४ अ'च्या गाड्यांची चाचणी घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच आज सोमवार २२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी झाली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि सरकारी अधिकारी उपस्थित होते.

गायमुख ते घोडबंदर रोड येथील विजय गार्डनपर्यंत मेट्रोची चाचणी झाली. यावेळी मेट्रोतून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच इतर मान्यवरांनी प्रवास केला. चाचणीच्या निमित्ताने घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी ठाणेकरांना 'शुभवार्ता' अनुभवता आली. मूळ नियोजनानुसार आतापर्यंत 'मेट्रो - ४' आणि 'मेट्रो - ४ अ' या संपूर्ण मार्गावर सुरळीत धावणे अपेक्षित होते. पण उद्धव सरकारच्या काळात मेट्रोशी संबंधित अनेक कामं थांबली होती. यामुळे ठाण्यातून धावणार असलेल्या मेट्रोची फक्त गायमुख ते विजय गार्डन या मर्यादीत मार्गावर चाचणी घेण्यात आली. आता मेट्रोची रखडलेली कामं सुरू झाली आहेत.

कामं पुन्हा रुळावर आली आहेत. यामुळे लवकरच ठाण्यातून मेट्रो धावणार, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. प्रकल्पाच्या दिरंगाईसाठी उद्धव सरकारचा कारभार कारणीभूत ठरल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

प्रताप सरनाईक यांनी आमदार असताना ठाण्यातून मेट्रो धावावी यासाठी पाठपुरावा केला. आता सरनाईक राज्याचे परिवहन मंत्री असताना ठाण्यातून मेट्रो लवकरच सुरू होईल, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. पत्रकारांशी संवाद साधताना मेट्रोच्या कामासाठी सरनाईक यांनी केलेल्या प्रयत्नांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीरपणे उल्लेख केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >