
मुंबई: ऑटोमोबाईल क्षेत्रात सुरू असलेल्या जीएसटी कपातीच्या मालिकेत आता ह्युंदाईनेही आपल्या कारच्या नव्या किंमती जाहीर केल्या आहेत. २२ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या या दरकपातीमुळे ग्राहकांना ६० हजार रुपयांपासून तब्बल २.४० लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे. सर्वात आधी टाटाने दरकपातीची घोषणा केली होती, त्यानंतर ह्युंदाईकडून अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. नव्या किंमतीनुसार ह्युंदाई ग्रँड आय१० नियॉसवर ७३,८०८ रुपयांची कपात झाली आहे.
त्याचबरोबर ह्युंदाई ऑरा ७८,४६५ रुपयांनी स्वस्त झाली असून लोकप्रिय एसयूव्ही एक्स्टर ८९,२०९ रुपयांनी कमी दरात उपलब्ध होणार आहे. ह्युंदाईची प्रीमियम हॅचबॅक आय २० आता ९८,०५३ रुपयांनी स्वस्त झाली आहे, तर आय २० एन लाईनची किंमत १,०८,११६ रुपयांनी कमी झाली आहे. कॉम्पॅक्ट एसयूव्ही व्हेन्यूच्या किंमतीत १,२३,६५९ रुपयांची घट झाली आहे, तर व्हेन्यू एन लाईनची किंमत १,१९,३९० रुपयांनी कमी झाली आहे.
लोकप्रिय क्रेटावरदेखील जीएसटी कपातीचा थेट फायदा ग्राहकांना मिळणार असून या कारची किंमत ७२,१४५ रुपयांनी कमी झाली आहे.
क्रेटा एन लाईनसाठी किंमतीत ७१,७६२ रुपयांची घट करण्यात आली आहे.
ह्युंदाई व्हर्ना ६०,६४० रुपयांनी स्वस्त झाली आहे, तर सात सीटर एसयूव्ही अल्काझार ७५,३७६ रुपयांनी कमी दरात मिळणार आहे.
मात्र सर्वाधिक घट ह्युंदाईच्या प्रीमियम एसयूव्ही टक्सनमध्ये झाली आहे. या मॉडेलच्या किंमतीत तब्बल २,४०,३०३ रुपयांची कपात करण्यात आली असून त्यामुळे टक्सन घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.
ह्युंदाईच्या या निर्णयामुळे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचा कल अधिक प्रमाणात नव्या कार खरेदीकडे वाढण्याची शक्यता आहे. टाटा, ह्युंदाईनंतर आता इतर वाहन उत्पादक कंपन्याही लवकरच कपातीचे दर जाहीर करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी, टाटा मोटर्स, रेनॉल्ट, टोयोटा आणि महिंद्रा यासारख्या इतर कार कंपन्यांनी दर कपातीचा फायदा इतरांना देण्यासाठी कार मॉडेल्सच्या किमती कमी केल्या आहेत.
किमतींमध्ये कपात (२२ सप्टेंबर २०२५ पासून प्रभावी):
निओस - ७३,८०८ रुपयांपर्यंत
ऑरा - ७८,४६५ रुपयांपर्यंत
एक्सटर - ८९,२०९ रुपयांपर्यंत
i20 – ९८,०५३ रुपयांपर्यंत
आय२० एन लाईन – १,०८,११६ रुपयांपर्यंत
व्हेन्यू - १,२३,६५९ रुपयांपर्यंत
व्हेन्यू एन लाईन – १,१९,३९० रुपयांपर्यंत
वर्ना - ६०,६४० रुपयांपर्यंत
क्रेटा - ७२,१४५ रुपयांपर्यंत
क्रेटा एन लाईन – ७१,७६२ रुपयांपर्यंत
अल्काझर - ७५,३७६ रुपयांपर्यंत
टक्सन - २,४०,३०३ रुपयांपर्यंत