Saturday, May 18, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीसंत हे चालते-बोलते देवच...!

संत हे चालते-बोलते देवच…!

  • अध्यात्म: ब्रह्मचैतन्य श्री गाेंदवलेकर महाराज

व्यवहारात ज्याला चांगले वागता येत नाही, त्याला परमार्थ करता येणार नाही. व्यवहारात झालेल्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देणार नाही, असा निश्चय करावा आणि सद्‌गुरू आज्ञा प्रमाण मानून तो तडीस न्यावा. साधनावर जोर द्यावा. स्वतः कोण याची ओळख करून घ्यावी. भगवंतापरते कोणी नाही, हे कळले म्हणजे मी कोण हे कळते. निर्गुण जरी समजले तरी सगुण नाही सोडू. माझ्या मुखी राम आला यापरते दुसरे भाग्य ते कोणते? हृदयात स्फूर्ती येऊनच आपण बोलतो; मग आमच्या मुखात राम आला, तर तो हृदयात नाही, असे कसे म्हणावे?

तुम्ही मला उपनिषदांतले सांगा म्हटले तर कसे सांगू? ज्याने जे केले तेच तो सांगणार. एक गुरू आज्ञापालन याशिवाय दुसरे काहीच मी केले नाही, तर मी दुसरे काय सांगणार? संतांचा समागम केला म्हणजे आपण मार्गाला लागतो. आपण साधूला व्यवहारात आणतो, आणि नंतर तो आपल्याशी व्यवहाराने वागला म्हणजे त्याच्याजवळ समता नाही म्हणून उलट ओरड करतो! संत हे देहाचे रोग बरे करीत नसून, त्या रोगांची भीती नाहीशी करतात. संत हे चालते-बोलते देवच आहेत. संतांच्या देहाच्या हालचालींना महत्त्व नाही. भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वांत मोठा उपकार होय. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हेच खरे संतांचे कार्य होय. संतांचा कोणताही मार्ग हा वेदांच्या आणि शास्त्रांच्या उलट असणे शक्यच नाही. संत सूर्यासारखे जगावर स्वाभाविक उपकार करतात. सूर्याचे तेज कमी होते आहे असे शास्त्रज्ञ म्हणतात, पण संतांचे तेज मात्र वाढतेच आहे.

श्रीमंत आई-बापांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा भीक मागताना पाहून आपल्याला त्याची कींव येते, त्याप्रमाणे मनुष्यजन्माला येऊन आपण दुःख करतो हे पाहून संतांना वाईट वाटते. म्हणून अत्यंत चिकाटीने संतांची कृपा प्राप्त करून घ्यावी. संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावे; पडण्याची, अडखळण्याची भीतीच नाही. आपण प्रपंचात इतके खोल जातो की, संतांची हाक ऐकूच येत नाही. ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर असावे. संतवचनावर विश्वास ठेवू या, म्हणजे भगवत्प्रेम लागेलच. ते लागल्यावर विषयप्रेम कमी होईल. म्हणून संतांची संगत करणे एवढे जरी केले तरी कल्याणच होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -