Saturday, May 18, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृती...अन् खंडू पाटील निर्दोष सुटले

…अन् खंडू पाटील निर्दोष सुटले

  • गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला

गाव ग्रामामध्ये पाटील आणि देशमुख यांच्यामध्ये दुफळी होती हे आपण मागील लेखात पाहिले. संत कवी दासगणू महाराज म्हणतात, ही दुही अथवा दुफळी म्हणजे क्षयरोगाप्रमाणे समाजाला लागलेला रोग आहे.

जेथ जेथ ही नांदे दुफळी ।
तेथ तेथ ही करी होळी ।
अवघ्या सुखांची रांगोळी ।
इच्यापायी होतसे ।। १४।।
क्षय रोग तो शरीराला।
वा दुफळी रोग समाजाला।
नेतसे यम सदनाला।
प्रयत्न पडती लुळे तेथ ।। १५।।

एकदा गावातील महारास खंडू पाटील यांनी तहसील कार्यालयात टप्पा घेऊन जाण्यास सांगितले. ही व्यक्ती देशमुख मंडळींच्या बाजूची होती. त्याने हे काम करण्यास नकार दिला व पाटलास अद्धातद्धा बोलू लागला व हातवारे करू लागला. ह्या क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली. त्यामुळे पाटील रागावले व त्यांनी रागाने वेळूच्या काठीचा प्रहार केला. त्या प्रहारामुळे महाराचा हात मोडला व तो बेशुद्ध होऊन पडला. त्याच्या आप्तांनी त्यास उचलून देशमुखांच्या सदनाला नेले. त्याचा हात मोडला हे पाहून देशमुख संतोषले. पाटलासोबत कुरापत काढण्यास अनायासे ही संधी आली आहे. तिचा उपयोग करून घ्यावा असा विचार करून देशमुखांनी त्या महाराला कचेरीमध्ये नेऊन अधिकाऱ्यास खोटे नाटे सांगून पाटलांच्या विरुद्ध तक्रार नोंदविली. त्या तक्रारीच्या कारणाने खंडू पाटील ह्यांना पकडून आणण्याची आज्ञा झाली. हे जेव्हा खंडू पाटील यांना कळले त्या वेळी ते चिंतित झाले. ज्या गावात आजवर मी वाघाप्रमाने वागत होतो, त्याच गावात माझ्या हातात बेड्या पडण्याचा प्रसंग आला. याच विचाराने खंडू पाटील हताश झाले आणि इतर बंधू देखील घाबरून गेले. अशा उद्विग्न मन:स्थितीत बसले असताना त्यांच्या मनात गजानन महाराजांना साकडे घालावे, असा विचार आला. कारण त्यांना असा विश्वास होता की, महाराजच या संकटाचे निरसन करू शकतात. त्यांच्याशिवाय या वऱ्हाड प्रांतात दुसरे कोणी हे संकट निवारण करणारे उरले नाही. या विचाराने खंडू पाटील रात्री महाराजांकडे आले. नमस्कार करून महाराजांना ही सर्व कहाणी सांगितली. तसेच यामुळे मला कैद होऊ शकते असे सांगितले आणि रडू लागले. समर्थांनी खंडू पटलास दोन्ही हातांनी कवटाळले, हृदयाशी धरले आणि त्यांचे सांत्वन केले आणि सांगितले की, अरे कर्त्या पुरुषावर अशी संकटे येतात. त्याची चिंता करू नकोस. जेव्हा स्वार्थ दृष्टी बळावते तेव्हा असेच होते. खऱ्या नीतीची वार्ता तेथे कळतच नाही. जा, भिऊ नकोस, देशमुखाने कितीही जोर केला तरी तुला बेडी पडणार नाही. हे समर्थांचे वचन पुढे खरे झाले. खंडू पाटील निर्दोष सुटले :

मागे कौरव पांडवात ।
स्वार्थेच आला विपट सत्य ।
परी पांडवांचा पक्ष तेथ ।
न्याये खरा होता की ।। ६०।।

या ओवीतून हे देखील कळते की, परमेश्वर देखील सत्याकडूनच पाठीराखा असतो.

पुढे खंडू पाटलांनी समर्थांना प्रेमाने विनंती करून स्वगृही राहण्यास नेले. पाटील सदनात समर्थ असताना तेथे १०-१५ तेलंगी ब्राह्मण आले. दासगणू महाराज म्हणतात, तेलंगी ब्राह्मण कर्मठ आणि विद्वान असतात. पण त्यांना धनाचा विशेष लोभ. ते सर्व, समर्थांकडून काही मिळेल, या अपेक्षेने आले. त्यावेळी समर्थ पांघरूण घेऊन निजले होते. समर्थांना जागे करण्याकरिता त्यांनी मोठमोठ्याने जटेचे मंत्र म्हणण्यास सुरुवात केली. मंत्र म्हणताना चूक झाली, ती दुरुस्त न करता त्यांनी तसेच मंत्र म्हणणे सुरू ठेवले. म्हणून समर्थ उठून बसले आणि ब्राह्मणांना म्हणाले. तुम्ही कशास वैदिक झाला. असे चुकीचे मंत्र म्हणून तुम्ही वेद विद्येला हिनत्व आणू नका. ही पोट भरण्याची विद्या नसून ही विद्या मोक्षदात्री आहे. डोक्याला बांधलेल्या शालीची काही किंमत ठेवा. मी म्हणतो तसे मंत्र म्हणा. खरे स्वर मनी आणा. (उदात्त, अनुदात्त). उगीच भोळ्या भाविकांना फसवू नका. जी ऋचा त्या ब्राह्मणांनी म्हणावयास सुरुवात केली, तोच अध्याय समर्थांनी बिनचूक स्पष्ट स्वरात धडाधडा म्हणून दाखवील. हे पाहून व ऐकून तेलांगी चकित झाले व खाली मान घालून बसले. त्यांनी मनात समर्थांबद्दल विचार केला की, हा कशाचा पिसा. हा तर महाज्ञानी आहे. चारही वेद ह्याच्या मुखात आहेत. यावरून निश्चित हा जातीने ब्राह्मण असला पाहिजे. इथे संत कवी दासगणू महाराज यांनी ओवीबद्ध स्वरूपात महाराज, त्यांची दीक्षा याबद्दल माहिती सांगितली आहे.

विप्र म्हणती आपुल्या मनी ।
हा पिसा कशाचा महाज्ञानी ।
चारी वेद ह्याच्या वदनी ।
नांदतात प्रत्यक्ष ।। ७८।।
हा विधाताच होय दुसरा ।
शंका येथे नुरली जरा ।
हा असावा ब्राह्मण खरा ।
जातीने की निःसंशय ।।७९।।
परमहंस दीक्षा याची ।
वार्ता न उरली बंधनाची ।
कोणत्याही प्रकारचीं ।
हा जीवनमुक्त सिद्धयोगी ।। ८०।।
काही पुण्य होते पदरी ।
म्हणून मूर्ती पाहिली खरी ।
हा वामदेव याला दुसरी
उपमा न ती द्यावया ।। ८१।।

या ठिकाणी महाराज हे वेडे (पिसे) नसून महाज्ञानी होते, त्यांना चारही वेदांचे संपर्ण ज्ञान होते, तसेच ते परब्रह्म स्वरूप होते, त्यांची दीक्षा परमहंस होती, त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची बंधने नव्हती, ते जीवनमुक्त विदेही संत होते ही सर्व माहिती कळून येते. श्री महाराजांनी त्या सर्व ब्रह्मवृंदांना खंडू पाटलाकडून रुपया रुपया दक्षिणा देवविली. ब्राह्मण संतुष्ट होऊन निघून गेले. या अध्यायामध्ये महाराजांना उपाधी पटत नसे हा पुनरुल्लेख आला आहे. हे खालील ओवीमधून कळून येते :

ब्राह्मण संतुष्ट झाले ।
अन्य गावा निघून गेले ।
महाराजही कंटाळले ।
उपाधीला गावच्या ।। ८३।।
श्रोते खऱ्या संताप्रत ।
उपाधी ना असे पटत।
दांभिकाला मात्र ।
भूषण होते तियेचे ।।८४।। क्रमशः

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -