Saturday, May 4, 2024
Homeक्रीडासानिका पाटीलकडे महाराष्ट्राच्या राष्ट्रीय कबड्डी संघाचे नेतृत्व

सानिका पाटीलकडे महाराष्ट्राच्या राष्ट्रीय कबड्डी संघाचे नेतृत्व

४८व्या कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा संघ जाहीर

मुंबई (वार्ताहर) : बिहार येथील पाटलीपुत्र येथे दि.१ ते ४ सप्टेंबर २०२२ या कालावधीत होणाऱ्या “४८व्या कुमारी गट” राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राने मंगळवारी आपला १२ जणांचा संघ जाहीर केला. मुंबई उपनगरच्या सानिका परेश पाटील हिच्याकडे संघाच्या नेतृत्वाची कमान सोपविण्यात आली. सध्या हा संघ अतिग्रे कोल्हापूर येथील संजय घोडावत उद्योग समूह यांच्या संयोजनाखाली संजय घोडावत विद्यापीठाच्या बंदिस्त क्रीडा संकुलात सराव करीत आहे. प्रशिक्षिका वर्षा भोसले खेळाडूंकडून डावपेचाचे धडे गिरवून घेत आहेत.

संजय घोडावत उद्योग समूहाचे चेअरमन संजय घोडावत यांनी या सराव शिबिराला जातीने भेट देऊन सर्व सुविधांची पाहणी केली आणि संघाला स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, प्राचार्य विराट गिरी या सराव शिबिरात कोणतीही कसर राहू नये म्हणून लक्ष ठेवून आहेत. घोडावत विद्यापीठ संघाचे प्रशिक्षक महेश गावडे यात समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.

निवडण्यात आलेला संघ २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील राज्याच्या कार्यालयात दाखल होऊन, दि. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ११.०५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथून सुविधा एक्सप्रेसने स्पर्धेकरिता रवाना होईल. राज्य कबड्डी संघटनेचे सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी हा संघ जाहीर केला.

महाराष्ट्राचा संघ : १) सानिका परेश पाटील – संघनायिका, २) याशिका पुजारी (दोन्ही मुंबई उपनगर), ३) रेणुका नम, ४) ज्युली मिस्किटा, ५) श्रुती सोमाणे (तिन्ही पालघर), ६) तृप्ती अंधारे, ७) कोमल ससाणे (दोन्ही औरंगाबाद), ८) अनुजा शिंदे, ९) ऋतुजा आंबी (दोन्ही सांगली), १०) मनिषा राठोड (पुणे), ११) सानिका संजय पाटील (नांदेड), १२) प्राची भादवणकर (मुंबई शहर).

संघ प्रशिक्षिका : वर्षा भोसले, संघ व्यवस्थापिका : कोमल चव्हाण.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -