Home नाशिक कुंभमेळा Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासन अलर्ट ! सर्व विभागांना 15 डिसेंबरची डेडलाईन ; आपत्ती व्यवस्थापनाचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासन अलर्ट ! सर्व विभागांना 15 डिसेंबरची डेडलाईन ; आपत्ती व्यवस्थापनाचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश

0
Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासन अलर्ट ! सर्व विभागांना 15 डिसेंबरची डेडलाईन ; आपत्ती व्यवस्थापनाचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश

Nashik : आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्यासाठी नाशिक प्रशासनाने आतापासूनच तयारीला वेग दिला आहे. कुंभमेळ्याच्या काळात लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये आणि उद्भवल्यास त्यावर तातडीने नियंत्रण मिळवता यावे, यासाठी प्रशासनाकडून नियोजन सुरू करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात विविध विभागांची आंतरविभागीय बैठक पार पडली. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन, विभागनिहाय जबाबदाऱ्या आणि परस्पर समन्वय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त तथा अपर जिल्हाधिकारी उदय किसवे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहित राजपूत, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, अभियंते आणि सल्लागार उपस्थित होते.

संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी विशेष नियोजन

सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार असल्याने संभाव्य धोके आणि आपत्कालीन परिस्थितींचा आढावा बैठकीत घेण्यात आला. प्रत्येक विभागाने आपली जबाबदारी निश्चित करणे, उपलब्ध साधनसामग्री आणि मनुष्यबळाची माहिती तयार ठेवणे, तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी स्वतंत्र कृती आराखडा बनवणे यावर भर देण्यात आला.

याशिवाय संभाव्य धोक्यांची ओळख, जोखीम कमी करण्याच्या उपाययोजना, आपत्तीनंतर परिस्थिती पूर्ववत करण्याचे नियोजन आणि आवश्यक मनुष्यबळाची तैनाती याबाबतही चर्चा झाली. आपत्कालीन संपर्क व्यवस्था, माहितीचे प्रसारण, घटनांची नोंद, अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापनाची प्रात्यक्षिके घेण्याबाबतही संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या.

https://www.prahaar.in/2026/11/26/mega-recruitment-drive-at-nashik-municipal-corporation-ahead-of-the-simhastha-kumbh-mela-application-process-underway-for-212-posts-check-eligibility-criteria-and-the-application-deadline/

१५ डिसेंबरपर्यंत कृती आराखडा सादर करण्याचे आदेश

या बैठकीत कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी सर्व विभागप्रमुखांना महत्त्वाचे निर्देश दिले. प्रत्येक विभागाने येत्या १५ डिसेंबरपर्यंत आपला स्वतंत्र कृती आराखडा सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी विभागनिहाय स्वतंत्र बैठका घेऊन उपलब्ध साधनसंपत्ती, आवश्यक मनुष्यबळ, संभाव्य अडचणी आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांचे नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे.

आरोग्य, पाणीपुरवठा आणि गर्दी व्यवस्थापनावर विशेष लक्ष

कृती आराखडा तयार करताना स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा, पाण्याची गुणवत्ता, वीजपुरवठा, भाविकांची सुरक्षितता आणि गर्दीचे व्यवस्थापन या महत्त्वाच्या बाबींचा समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय दैनंदिन प्रशासकीय गरजा, भाविकांना भेडसावणाऱ्या संभाव्य अडचणी आणि आवश्यक सेवांमध्ये व्यत्यय आल्यास करावयाच्या उपाययोजनांचाही विचार करण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यात आपत्ती घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संभाव्य धोके आधीच ओळखून सज्ज राहणे महत्त्वाचे असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले. आपत्ती व्यवस्थापन ही केवळ एका विभागाची जबाबदारी नसून सर्व विभागांच्या समन्वयातूनच प्रभावी यंत्रणा उभी राहू शकते. त्यामुळे प्रत्येक विभागाने जबाबदारीने नियोजन करून ठोस कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here