गोंदिया तालुक्यातील रावणवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सावरी गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देऊन त्यांचे भविष्य घडविण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकानेच विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सहावी आणि सातवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींसोबत शिक्षकाने अश्लील चाळे केल्याचा तसेच त्यांच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली असून संतप्त पालक आणि ग्रामस्थांनी शाळेत धाव घेत संबंधित शिक्षकाला जाब विचारला.
परिस्थिती इतकी चिघळली की, ग्रामस्थांनी शिक्षकाला चोप देण्याची भूमिका घेतली. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत शिक्षकाला ताब्यात घेतले. या प्रकरणातील आरोपी शिक्षकाचे नाव नागोराव कटरे वय ५५ वर्षे आहे. सावरी येथील जिल्हा परिषद शाळेत सहावी आणि सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींसोबत संबंधित शिक्षक अश्लील चाळे करीत असल्याचा आरोप आहे. विद्यार्थिनींना शरीराच्या वेगवेगळ्या भागांना अयोग्य पद्धतीने स्पर्श करून त्रास दिला जात असल्याचे मुलींनी आपल्या पालकांना सांगितले. आपल्या पाल्यांसोबत शाळेत असा प्रकार घडत असल्याचे समजताच पालकांना मोठा धक्का बसला. विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर संतप्त पालकांनी थेट शाळा गाठली आणि संबंधित शिक्षकाला जाब विचारत धारेवर धरले.
https://www.prahaar.in/2026/11/24/recommendation-for-a-fine-of-10-crore-and-imprisonment-of-up-to-10-years-in-paper-leak-cases/
ही बातमी गावात पसरताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ शाळेच्या परिसरात जमा झाले. ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता. काही ग्रामस्थांनी संबंधित शिक्षकाला चोप देण्याची तयारी दर्शविल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच रावणवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शिक्षकाला रावणवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. शिक्षकाला तातडीने निलंबित न केल्यास गावकरी एकजुटीने मोठे आंदोलन छेडतील, असा इशाराही ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.