केरळ : गोरे दिसण्याच्या हव्यासापोटी सोशल मीडियावरील जाहिरातींना भुलून फेअरनेस क्रीम वापरणे किती धोकादायक ठरू शकते, याचे गंभीर उदाहरण केरळमधील मलप्पुरम येथे समोर आले आहे. इन्स्टाग्रामवरील प्रमोशनल व्हिडिओ पाहून एका 17 वर्षीय मुलीने मागवलेली फेअरनेस क्रीम तिच्या आरोग्यासाठी घातक ठरल्याचा आरोप आहे. या क्रीमच्या वापरानंतर तिच्या शरीरात पाऱ्याचे प्रमाण धोकादायक पातळीवर पोहोचले आणि तिच्या किडनीला गंभीर इजा झाली. या प्रकरणाची दखल घेत केरळ राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने स्वतःहून कारवाई सुरू केली आहे.
इन्स्टाग्रामवरील जाहिरात पाहून मागवली क्रीम
मलप्पुरम येथील एस्टर मिम्स मदर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने इन्स्टाग्रामवर काही सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सचे प्रमोशनल व्हिडिओ पाहिले होते. या क्रीममुळे चेहऱ्यावरील मुरुम, काळे डाग आणि वांग कमी होतात, असा दावा जाहिरातींमध्ये करण्यात आला होता.
या जाहिरातींवर विश्वास ठेवून मुलीने दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावरून विक्रेत्याशी संपर्क साधला आणि क्रीम मागवली. सुरुवातीला चेहऱ्यावर फरक जाणवल्याने तिने एका वर्षात अशा अनेक बाटल्या मागवून वापरल्याचे सांगितले जात आहे.
https://www.prahaar.in/2026/11/24/159-teachers-and-staff-members-honored-at-the-vasant-smruti-awards-ceremony-personnel-who-carried-out-rescue-operations-during-the-fire-at-raheja-garden-were-also-felicitated/
रक्तदाब कमी झाला, पायांना सूज
क्रीमचा सतत वापर केल्यानंतर मुलीची प्रकृती बिघडू लागली. तिचा रक्तदाब कमी होणे, चक्कर येणे आणि बेशुद्ध पडणे अशी लक्षणे दिसू लागली. तिच्या पायांनाही मोठ्या प्रमाणात सूज आली. त्यामुळे तिला चालणेही कठीण झाले आणि अखेर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचार करणाऱ्या नेफ्रोलॉजिस्ट डॉ. गौरी एस. यांच्या माहितीनुसार, वैद्यकीय तपासणीत मुलीच्या शरीरात पाऱ्याचे प्रमाण अत्यंत वाढल्याचे आढळले. तसेच तिला ‘मेम्ब्रेनस नेफ्रोपॅथी’ हा किडनीशी संबंधित गंभीर आजार झाल्याचे निदान करण्यात आले.
क्रीममध्ये 12,500 PPM पारा आढळल्याचा दावा
संबंधित क्रीमच्या प्रयोगशाळेतील तपासणीत त्यामध्ये तब्बल 12,500 पार्ट्स पर मिलियन (PPM) पारा आढळल्याचे वृत्त आहे. पारा हा विषारी धातू असून त्याच्या संपर्कामुळे शरीरातील विविध अवयवांना, विशेषतः किडनीला नुकसान पोहोचू शकते.
मुलीच्या कुटुंबीयांनी क्रीम विक्रेत्याशी संपर्क साधून प्रकृती बिघडल्याची माहिती दिली होती. सुरुवातीला कंपनीकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर प्रतिसाद मिळणे बंद झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. आता त्यांनी संबंधित कंपनीविरोधात ग्राहक न्यायालयात कायदेशीर लढा देण्याचा निर्णय घेतला आहे. तपास सुरू असल्याने क्रीमचे नाव सध्या गोपनीय ठेवण्यात आले आहे.
बाल हक्क संरक्षण आयोगाकडून चौकशी
या प्रकरणाची केरळ राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने आरोग्य सेवा संचालक, राज्य पोलीसप्रमुख, औषध नियंत्रक, केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण आणि संबंधित रुग्णालयाच्या अधीक्षकांकडून अहवाल मागवला आहे. क्रीममधील घटक, विक्रीची पद्धत आणि सोशल मीडियावरील जाहिरातींची भूमिका याबाबत पुढील तपास सुरू आहे.