आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारताचा स्टार युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याची बॅट काही चालली नव्हती. नेपाळ आणि पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याची बॅट शांत राहिली होती. मात्र युएईविरुद्धच्या सामन्यात त्याचा झंझावात पाहायला मिळाला. युएईने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. युएईने 50 षटकात 8 गडी गमवून 249 धावा केल्या. तसेच विजयासाठी 250 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना भारताने आक्रमक सुरूवात केली. वैभव सूर्यवंशीने या सामन्यात मोर्चा सांभाळला होता. समोर जो गोलंदाज येईल त्याला अक्षरश: सोलून काढलं. अभिषेक शर्मा 12. तर प्रभसिमरन सिंग 3 धावा करून बाद झाले. पण एका बाजूने वैभव सूर्यवंशीचा झंझावात सुरूच होता. त्याने अवघ्या 28 चेंडूत शतक पूर्ण केलं. यासह त्याने क्रिकेट इतिहासात एका विक्रमाची नोंद केली आहे. त्याने 14 षटकारांच्या मदतीने शतक ठोकलं.
वैभव सूर्यवंशीने लिस्ट ए मध्ये नोंदवला विक्रम
लिस्ट-ए क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी चेंडूंत शतक झळकावण्याचा विश्वविक्रम आता भारताच्या वैभव सूर्यवंशी याच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्याने अवघ्या 28 चेंडूंत शतक पूर्ण केले. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा जेक फ्रेझर-मॅकगर्क असून, त्याने 2023 मध्ये अॅडलेड येथे दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून खेळताना टास्मानियाविरुद्ध 29 चेंडूंत शतक ठोकले होते. तिसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्स आहे, ज्याने 2015 मध्ये जोहान्सबर्ग येथे वेस्ट इंडिजविरुद्ध 31 चेंडूंत शतकी खेळी साकारली होती. त्यानंतर चौथ्या क्रमांकावर साकिबुल गनी असून, त्याने 2025 मध्ये रांची येथे बिहारकडून अरुणाचल प्रदेशविरुद्ध 32 चेंडूंत शतक केले. तर, पाचव्या स्थानी इशान किशन आहे, ज्याने 2025 मध्येच अहमदाबाद येथे झारखंडकडून खेळताना कर्नाटकविरुद्ध 33 चेंडूंत शतक झळकावले होते.
https://www.prahaar.in/2026/11/24/who-holds-the-world-record-for-bowling-out-opponents-for-under-100-runs-the-highest-number-of-times-in-test-cricket-find-out/
वैभव सूर्यवंशीची विक्रमी शतकी खेळी
व्यावसायिक क्रिकेटमध्ये वैभव सूर्यवंशीने झळकावलेली शतके त्याच्या स्फोटक फलंदाजीची साक्ष देतात. त्याने सर्वात वेगवान शतक 2026 मध्ये दोहा येथे भारत ‘ए’ कडून खेळताना यूएई विरुद्ध अवघ्या 28 चेंडूत ठोकलं. याआधी 2025 मध्ये दोहा येथेच यूएईविरुद्ध टी20 सामन्यात त्याने 32 चेंडूंत शतकी केलं होतं. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने 2025 मध्ये जयपूर येथे गुजरात टायटन्सविरुद्ध 35 चेंडूंत, तर 2026 मध्ये जयपूर येथेच सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 36 चेंडूत टी20 शतक ठोकले. याशिवाय, देशांतर्गत क्रिकेटमध्ये बिहारचे प्रतिनिधित्व करताना त्याने 2025 मध्ये रांची येथे अरुणाचल प्रदेशविरुद्ध 36 चेंडूंत लिस्ट-ए शतक, तर कोलकाता येथे महाराष्ट्राविरुद्ध 58 चेंडूंत टी20 शतक झळकावले आहे.
150 धावा करताना वैभव सूर्यवंशीने स्वत:चा विक्रम मोडला
लिस्ट-ए वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगवान 150 धावा पूर्ण करण्याचे पहिले दोन्ही विश्वविक्रम भारताच्या वैभव सूर्यवंशी याच्या नावावर आहेत. त्याने 2026 मध्ये भारत ‘ए’ संघाकडून खेळताना यूएई विरुद्ध अवघ्या 40 चेंडूंत 150 धावांचा टप्पा गाठत नवा इतिहास रचला. यापूर्वी 2025 मध्ये रांची येथे बिहारकडून अरुणाचल प्रदेशविरुद्ध खेळताना त्याने 59 चेंडूंत 150 धावा फटकावल्या होत्या. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्स असून त्याने 2015 मध्ये जोहान्सबर्ग येथे वेस्ट इंडिजविरुद्ध 64 चेंडूत 150 धावा केल्या होत्या. तर, चौथ्या स्थानी इंग्लंडचा जोस बटलर असन 2022 मध्ये अॅमस्टेलवीन येथे नेदरलँड्सविरुद्ध 65 चेंडूंत 150 धावा पूर्ण केल्या होत्या.