Home ब्रेकिंग न्यूज Mahayuti News : एकमेकांना ‘डॅमेज’ न करण्याची महायुतीत अलिखित आचारसंहिता

Mahayuti News : एकमेकांना ‘डॅमेज’ न करण्याची महायुतीत अलिखित आचारसंहिता

0
Mahayuti News : एकमेकांना ‘डॅमेज’ न करण्याची महायुतीत अलिखित आचारसंहिता
CHANDRASHEKAR BAWANKULE

– चंद्रशेखर बावनकुळे; सुनेत्रा पवार-प्रशांत किशोर भेटीमुळे महायुतीत फूट नाही

मुंबई : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यात नुकतीच मुंबईत खलबते झाली असली तरी यामुळे महायुतीमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षांतर्गत निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, परंतु महायुती म्हणून काम करताना भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात एकमेकांना राजकीयदृष्ट्या ‘डॅमेज’ न करण्याची एक अलिखित आचारसंहिता ठरलेली आहे, अशी भूमिका भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती भक्कम असून या भेटीमुळे आमच्यात कोणत्याही प्रकारची शंका निर्माण होण्याचे कारण नाही, असेही त्यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. (Sunetra Pawar)

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रसाद लाड यांच्यावर केलेल्या टीकेचा बावनकुळे यांनी खरपूस समाचार घेतला. प्रसाद लाड हे भाजपचे महत्त्वाचे नेते असून ते मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजामध्ये समन्वय साधण्याचे जबाबदारीचे काम करत आहेत. लाड हे कधीही असंस्कारी किंवा चुकीचे काम करत नाहीत. त्यामुळे लक्ष्मण हाके यांनी त्यांच्याबद्दल वापरलेली भाषा अत्यंत अयोग्य असून त्यांनी अशी प्रक्षोभक विधाने करणे त्वरित टाळावे, असा इशाराही त्यांनी दिला. (Mahayuti)

https://prahaar.in/2026/08/07/ban-on-114-publications-glorifying-extremist-views/

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रांची वैधता जाणीवपूर्वक नाकारली जात असल्याच्या आरोपांना बावनकुळे यांनी आकडेवारीनिशी उत्तर दिले. जात पडताळणी समिती ही पूर्णपणे स्वायत्त संस्था असून ती उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली पारदर्शकपणे काम करते. या प्रक्रियेत कोणताही नेता किंवा मंत्री अजिबात हस्तक्षेप करू शकत नाही, हे स्पष्ट करत त्यांनी आकडेवारी मांडली. जात पडताळणी समित्यांकडे येणाऱ्या प्रस्तावांपैकी अर्जे फेटाळण्याचे प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. आतापर्यंत मराठा समाजाचे केवळ ३ प्रस्ताव विविध तांत्रिक त्रुटींमुळे रद्द झाले आहेत, तर दुसरीकडे ओबीसी समाजाचे सुमारे ११७ प्रस्ताव समितीने फेटाळले आहेत. यावरून ही समिती कायदेशीर निकषांवर काम करत असून कोणावरही जाणीवपूर्वक अन्याय करत नसल्याचे सिद्ध होते, असे बावनकुळे यांनी नमूद केले. (Political News)

राज ठाकरेंच्या आरोपांना उत्तर

मतदार नोंदणी मोहिमेत भाजपचे कार्यकर्ते सरकारी यंत्रणेत आणि अधिकाऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला होता. या आरोपाचे खंडन करताना बावनकुळे म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक राजकीय पक्षाला आपले ‘बूथ लेव्हल एजंट’ (बीएलए) नेमण्याचा अधिकार आहे. या कार्यकर्त्यांची मुख्य जबाबदारी सरकारी ‘बूथ लेव्हल ऑफिसर’ला (बीएलओ) मदत करणे हीच असते. एखादा मतदार आपल्या भागात सापडत नसेल किंवा त्याचे नाव यादीत समाविष्ट करायचे असेल तर पडताळणीत अधिकाऱ्यांना सहकार्य करणे हे बीएलएचे कायदेशीर काम आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनीही आरोप करण्यापेक्षा आपल्या पक्षाचे बूथ लेव्हल एजंट नेमावेत आणि निवडणूक प्रक्रियेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here