Heavy Rain India : देशातील अनेक राज्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसासोबत वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी जीवितहानी झाली आहे. मंगळवारी झारखंड आणि उत्तर प्रदेशात वीज कोसळून एकूण 16 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. दरम्यान, मुसळधार पावसामुळे अनेक राज्यांतील जनजीवनही विस्कळीत झाले आहे. (Weather Update)
झारखंडमध्ये गिरिडीह, दुमका आणि लातेहार जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्याने 13 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये गिरिडीहमधील 8, दुमकामधील 3 आणि लातेहारमधील 2 जणांचा समावेश आहे. (India Rain Update)
https://prahaar.in/2026/08/05/will-the-intensity-of-rainfall-subside-in-the-state-el-ninos-influence-set-to-increase-however-a-heavy-rainfall-warning-has-been-issued-for-the-ghat-regions/
खोरिमहुआचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमरेंद्र कुमार यांनी सांगितले की, गिरिडीह जिल्ह्यातील विविध भागांत वीज कोसळून सात जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. याशिवाय बागोदर परिसरात आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. (Heavy Rain Alert)
दुमका जिल्ह्यातील रामगढ भागात वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला, तर एका मुलासह चार जण जखमी झाले. लातेहार जिल्ह्यातही दोन जणांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
उत्तर प्रदेशातही वीज आणि विजेच्या धक्क्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला. देवरिया जिल्ह्यात घरात मोबाईल चार्ज करत असताना विजेचा धक्का लागून आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. एटा जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मरच्या संपर्कात आल्याने 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तर लखनऊमध्ये मंदिरातील विजेच्या संपर्कात आल्याने 65 वर्षीय पुजाऱ्याचा मृत्यू झाला. एटा येथील आणखी एका घटनेत सार्वजनिक वॉटर कूलरला स्पर्श केल्याने सहा वर्षीय चिमुरडीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. (IMD Alert)
दरम्यान, देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. डोंगराळ भागांत भूस्खलनाच्या घटना घडल्या असून अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि खराब हवामानात सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे.